राज्यस्तरीय बास्केटबॉल ‘हुप-इट-अप’ २०२४ स्पर्धेचे उद्घाटन
पुणे, २९ ऑगस्टः“बास्केटबॉल हा खेळ अत्यंत गतिमान असल्याने प्रत्येक खेळाडू दक्ष व चपळ असावा लागतो. त्यास सतत धावपळ करावी लागते. खेळाच्या नियमांनुसार खेळाडूंना चेंडू हातात घेऊन एका पावलापेक्षा जास्त पुढे, मागे वा बाजूला जाता येत नाही. या खेळामध्ये मानसिकता ही सर्व काही असते. जर तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा हुशार असाल तर तुम्ही स्वतःला जिंकण्याची जास्त संधी देतात.”असे मत आंतरराष्ट्रीय बॉस्केटबॉल खेळाडू अॅड. अपूर्व सोनटक्के यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय क्रीडा दिन व एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या वाढदिवसानिमित्त एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (डब्ल्यूपीयू) तर्फे राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन सिनियर व ज्यूनियर बास्केटबॉल स्पर्धा ‘हुप-इट-अप’ २०२४ च्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. एमआयटी डब्ल्यूपीयूच्या बॉस्केटबॉल क्रीडा मैदानावर आयोजित या स्पर्धेचे हे ११वे वर्ष आहे.
या प्रसंगी नॉर्थ इस्ट फुटबॉल क्लबचे सीईओ मंदार ताम्हाणे व उद्योजक योगेश नातू हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड हे होते.
तसेच डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, कुलसचिव प्रा. गणेश पोकळे, अधिष्ठाता डॉ. बिपेन्द्र शर्मा, स्पोर्टस विभागाचे संचालक डॉ.पी.जी.धनवे, क्रीडा समन्वयक विलास कथुरे अभय कत्रे व रोहित बागवडे उपस्थित होते.
ही स्पर्धा एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाली.
राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,“विद्यार्थ्यांनी शारीरिक दृष्ट्या तंदुरूस्त, मानसिकदृष्ट्या सतर्क, बौद्धिकदृष्ट्या तीक्ष्ण आणि आध्यात्मिक दृष्ट्या उन्नत असावे. जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळाला अधिक प्राधान्य द्यावे. खेळामध्ये जिंकण्याची जिद्द ठेवावी पण त्यात शिस्त असावी. खेळाडूंचा उत्साह, त्यांच्या चेहर्यावरील आनंद हा नक्कीच त्यांच्यात स्पोर्ट्स ऑफ स्पिरिट जागृत करेल.”
यावेळी उद्घाटन पर मॅच व्हीआयटी, पुणे व १२ आयटी या दोघांमध्ये झाली.
यावेळी डॉ. बिपेन्द्र शर्मा यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
आयोजित स्पर्धेत या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून ६६ टीम ने सहभाग नोंदविला. यात पुणे, छत्रपती संभाजीनगर, बारामती, नागपूर, नवी मुंबई, अहमदनगर व मुंबई येथील खेळाडू आहेत.