मुंबई-राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा जोरदार बचाव करत विरोधकांची टीका फेटाळून लावत . छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याची घटना सर्वांनाच कमीपणा आणणारी आहे. सरकार या प्रकरणी योग्य ती कारवाई करेल. पण विरोधकांनी या प्रकरणी राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये, असे म्हटले आहे.देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी भाजप नेते नारायण राणे यांनी जिवे मारण्याविषयी केलेल्या विधानाचाही बचाव केला. नारायण राणे यांची बोलण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. ते बोलताना आक्रमक होतात. पण ते धमक्या देतील असे वाटत नाही, असे ते म्हणाले. उल्लेखनीय बाब म्हणजे नारायण राणे यांनी राजकोट येथील ठाकरे गटासोबतच्या वादानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना घरात घुसून मारून टाकण्याची धमकी दिली होती. त्यांचा या संबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर बोलताना या सरकारला कुठे भ्रष्टाचार करावा याचे तारतम्य नसल्याची टीका केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी त्यांच्यावर पलटवार करत शरद पवारांना असे बोलणे शोभत नसल्याची टीका केली. ते म्हणाले की, शरद पवार राज्यातील ज्येष्ठ नेते आहेत. हा पुतळा राज्य सरकारने नव्हे तर नौदलाने स्थापन केल्याचे त्यांना ठावूक आहे. पण कुठे भ्रष्टाचार करावा याचे तारतम्य बाळगण्याविषयीचे त्यांचे विधान चुकीचे आहे. एखाद्या ठिकाणी भ्रष्टाचाराचे तारतम्य व दुसरीकडे, नको असे कसे म्हणता येईल.
शरद पवार भ्रष्टाचाराचे समर्थन करतात का?भ्रष्टाचार कुठेच नको. भ्रष्टाचाराला सर्वांचाच विरोध असला पाहिजे. शरद पवारांनीही त्याला विरोध करण्याची गरज आहे. पण ते अशा प्रकारचे विधान करत असतील तर ते आश्चर्यकारक आहे. ते इतर ठिकाणी भ्रष्टाचाराचे समर्थन करतात काय? असा प्रश्न या प्रकरणी उपस्थित होतो. अशी विधाने निवडणुका डोळ्यापुढे ठेवून केली जात आहेत. शरद पवारांसारख्या नेत्यांना ते शोभत नाही.
देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याची घटना सर्वांनाच कमीपणा आणणारी आहे. याविषयी कुणीही राजकारण करू नये. या घटनेची विस्तृत चौकशी व्हायला हवी व महाराजांचा भव्य पुतळाही बांधला जावा. नौदलाने या प्रकरणी चौकशी समिती स्थापन केली असून, त्यांची टामही तिथे जाऊन आली आहे. नौदल या प्रकरणी योग्य ती कारवाई करत आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, नौदलाच्या सहाय्याने लवकरच महाराजांचा भव्य पुतळा बांधला जाईल. पण विरोधक प्रत्येक गोष्टीत राजकारण करत आहेत. प्रत्येक घटना निवडणुकीच्या नजरेतून पाहणे चुकीचे आहे. कुणीही एवढ्या खालच्या दर्जाचे राजकारण करू नये. सरकार योग्य ती पाऊले उचलत आहे.