पुणे, दि. २८ ऑगस्ट, २०२४ : पाचवी ते दहावी इयत्तेत शिकणाऱ्या विमलाबाई गरवारे प्रशालेतील ३२ गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षेणिक शुल्क शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज शाळेकडे सुपूर्त केले आहे. छत्रपती शिवाजीनगर मतदार संघातील काही विद्यार्थी – विद्यार्थिनींची घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्यांना शाळेची फी भरणे शक्य होत नव्हते अशा तब्बल ३२ विद्यार्थ्यांची शाळेची फी भरीत छत्रपती शिवाजीनगर मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी त्यांना मदतीचा हात दिला.
आज महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ. विमलाबाई गरवारे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील या ५ वी ते १० वी च्या वर्गांमध्ये शिकत असलेल्या ३२ विद्यार्थ्यांच्या शालेय शुल्काचा रुपये ७८ हजार ७५०/- रुपये चा धनादेश शिरोळे यांच्या वतीने शाळेस सुपूर्त करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक रोहिदास भारमळ, बाळासाहेब दळवी, किरण ओरसे यांसोबत अनेक विद्यार्थी, पालक, विद्यालयाचे शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
या सर्व विद्यार्थी – विद्यार्थिनींच्या घरची आर्थिक परस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने शाळेची फी भरणे त्यांना शक्य होत नव्हते. आज त्यांना मदत करून खूप आनंद आणि समाधान मिळाले असे सांगत सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, “समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या सद्भावनेतूनच नेहमी माझे कार्य सुरू असते. या शाळेतील विद्यार्थी – विद्यार्थिनी त्यांच्या पुढील आयुष्यात नक्कीच यश मिळवतील फक्त आज त्यांना पाठबळ देण्याची आवश्यकता आहे. माझ्या या लहानश्या मदतीने आज त्याचा शुभारंभ होत आहे.”
आपल्या नियमित कर्तव्याबाहेर जाऊन आपण समाजासाठी काहीतरी करत रहायला हवे, त्यासाठी सेवाभाव हे एक महत्वाचे माध्यम आहे. जनहितासाठी अखंड कार्यरत राहण्याचा व नागरिकांचे हित जोपासण्याचा माझा सदैव प्रयत्न असतो व यातून मिळणारा आनंद माझ्यासाठी लाख मोलाचा आहे. हा आनंद माझ्यासाठी अविरत समाज कार्य करण्याची उमेद ठरतो, असेही शिरोळे यांनी नमूद केले.