सिंधुदुर्ग – छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकोट किल्ल्यावरील पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बुधवारी राजकोट किल्ल्याला भेट देऊन स्थितीचा आढावा घेतला. यावेळी शिवसेनेचा ठाकरे गट व भाजप नेते नारायण राणे यांचे कार्यकर्ते समोरासमोर आले. त्यांच्यात धक्काबुक्की झाली. नारायण राणे यांनी मविआच्या कार्यकर्त्यांना घरात घुसून ठार मारण्याची उघड धमकी दिली. यामुळे येथीली स्थिती चांगलीच चिघळली होती.राणे यांनी यावेळीABP माझाच्या वृत्तवाहिनीच्या पत्रकाराशीही दमदाटी केली. एवढेच नाही तर एकेकाला घरातून खेचून रात्रीतून मारून टाकू, अशी जाहीर धमकीही नारायण राणे यांनी यावेळी दिली.
भाजप नेते तथा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे बुधवारी दुपारी 12 च्या सुमारास राजकोट किल्ल्यावर दाखल झाले. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र नीलेश राणेही उपस्थित होते. त्याचवेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारही उपस्थित होते. त्यांनी नारायण राणे यांच्याशी हस्तांदोलन केले. त्यानंतर राणे पुढे निघाले. त्याचवेळी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे राजकोट किल्ल्यावर पाहणीसाठी पोहोचले. त्यांच्यासोबत विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक आदी नेते उपस्थित होते. शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व महबूब शेखही यावेळी तिथे होते.
आदित्य ठाकरे राजकोट किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी येताच राणे समर्थकांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर ठाकरे समर्थकांनीही प्रत्युत्तरादाखल घोषणाबाजी केली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. यामुळे किल्ल्यावर प्रचंड तणाव निर्माण झाला. या स्थितीतच आदित्य ठाकरे यांनी किल्ल्यावर जाऊन स्थितीची पाहणी केली. यावेळी नीलेश राणे यांनी पोलिसांविरोधात चांगलीच आक्रमक भूमिका घेतली.
नीलेश राणे म्हणाले, पोलिसांनी मला समजावून सांगू नये. आम्ही स्थानिक आहोत. अगोदर त्या आदित्य ठाकरे यांना बाहेर काढा. ते आमच्यानंतर आले. त्यांचा हा रौद्रावतार पाहून ठाकरे कार्यकर्ते व राणे समर्थक यांच्यात बाचाबाची सुरू झाली. यावेळी राणे समर्थकांनी पेंग्विंन -पेंग्विंन अशी धमकी दिली. त्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या समर्थकांनी आ्ही कोंबड्या घेऊन आलो नाहीत असे म्हणत राणे यांना डिवचले.
एकेकाला घरातून खेचून मारून टाकू -दुसरीकडे, नारायण राणे यांनीही यावेळी आक्रमक भूमिका घेतली. आम्ही या भागातील आहोत. बाहेरचे येथे येऊन दादागिरी करत असतील व पोलिस त्यांना संरक्षण देणार असतील तर आम्ही येथून अजिबात हलणार नाही. काय करायचे ते करा. आम्हाला गोळ्या घाला. असे आंडू-पांडू आम्ही खूप पाहिले, असे ते म्हणाले. राणे यांनी यावेळी एका मराठी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराशीही दमदाटी केली. एवढेच नाही तर एकेकाला घरातून खेचून रात्रीतून मारून टाकू, अशी जाहीर धमकीही नारायण राणे यांनी यावेळी दिली.