कर्मवीर भाऊसाहेब हिरे हायस्कूल व आदर्श मित्र मंडळ, रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्टएंड यांच्या संयुक्त विद्यमाने संगीत लायब्ररीचे उद्घाटन
पुणे : मराठी माध्यमातील होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना परिस्थिती अभावी जेमतेम शिक्षण मिळत असते. अशातच अंगी उपजत कला असूनही त्यांना ती कला जोपासता येत नाही. त्यांना योग्य ते मार्गदर्शन घेता येत नाही. ही परिस्थिती ओळखून पुण्यातील कर्मवीर भाऊसाहेब हिरे हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी आता संगीत लायब्ररी उभारण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना संगीत कलेचे शिक्षण यामाध्यमातून घेता येणार आहे. विद्यार्थ्यांना गिटार, हार्मोनियम, तबला, बासरी अशी संगीत साधने शिकण्याची संधी मिळणार आहे.
सहकारनगर भागातील कर्मवीर भाऊसाहेब हिरे हायस्कूल, आदर्श मित्र मंडळ, रोटरी कल्ब ऑफ पुणे वेस्टएंड यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयात संगीत लायब्ररी व क्लासचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा डाॅ. संगीता बर्वे, गायक राजीव बर्वे, पोलीस निरिक्षक नंदकुमार गायकवाड, हिरे हायस्कुल चे मुख्याधापक अजित माने, आदर्श मित्र मंडळाचे उदय जगताप आदी उपस्थित होते.
या उपक्रमात विद्यार्थ्यांना विविध संगीत साधनांचे प्रशिक्षण देण्यात येणार असून विद्यार्थ्यांचा म्युझिकल बॅंड तयार करण्यात येणार आहे . कमवा आणि शिका या उपक्रमांतर्गत त्यांना आर्थिक सहाय्य देखील करण्यात येणार आहे. स्व. भारत भोईटे, महेश भगत, सूर्यकांत मोहिते, शिवाजीराव कदम, गणेश सोनवणे, राधाकृष्ण सोनार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रमिला गायकवाड व मुख्याधापक अजित माने यांनी उपक्रमासाठी मार्गदर्शन केले. संगीत शिक्षक समीर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ग घेण्यात येणार आहे
डाॅ. संगीता बर्वे म्हणाल्या, तुम्ही कोणत्याही गोष्टीचा ध्यास घेतला तर त्या आड परिस्थिती कधीच येत नाही, फक्त तुम्हाला शिकायची आवड असली पाहिजे. अभ्यासाचा ध्यास घ्या आणि तुमचे जगणे सुंदर करा असे ही त्यांनी सांगितले.
नंदकुमार गायकवाड म्हणाले, आज मुलांना सोशल मीडियापासून दुर ठेवणे हे पालकांसमोर मोठे आव्हान आहे. अशावेळी कला ही विद्यार्थ्यांना सोशल मीडियापासून दूर ठेवेलच परंतु संगीत कलेमुळे त्यांच्यातील ताण-तणाव देखील दूर होतील. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील कलेला प्रत्येक पालकांनी वाव दिला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
उदय जगताप म्हणाले, हिरे हायस्कूल मध्ये शिकणारे विद्यार्थी हे खाणकामगार, घरकाम करणाऱ्या महिला, रिक्षा चालक, रोजंदारीवर काम करणाऱ्या पालकांची मुले तर काही अनाथ मुले देखील आहेत. या मुलांमध्ये अनेक कला गुण असतात. त्यांच्यातील हे गुण पाहता विद्यार्थ्यांसाठी विविध खेळांचे प्रक्षिण दिले. त्यावेळी अनेक होतकरू विद्यार्थी राज्यस्तरावर देखील खेळले. याच पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थ्यांची संगीत क्षेत्रातील आवड पाहता संगीत लायब्ररी सुुरू करण्यात आली आहे. तसेच भविष्यात या मुलांचा म्युझिकल बॅंड तयार करून त्यांना पुढे जाण्याची संधी देखील देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.