नवी दिल्ली, 16 ऑगस्ट 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज बंगळुरू मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या टप्पा- 3 ला मंजुरी दिली. या टप्प्यात 44.65 किमी लांबीच्या दोन उन्नत कॉरिडॉरचा समावेश असून यामध्ये 31 स्थानके असतील. कॉरिडॉर-1: जेपी नगर चौथ्या टप्प्यापासून केंपापुरा (बाह्य रिंगरोडच्या पश्चिम लगत) या 32.15 किमी लांबीच्या मार्गावर 22 स्थानके असतील, आणि कॉरिडॉर-2: होसाहल्ली ते कडबागेरे (मागडी रोड लगत) या 12.50 किमी लांबीच्या मार्गावर 9 स्थानके असतील.
टप्पा -3 कार्यान्वित झाल्यावर, बंगळूरू शहरात 220.20 किमी लांबीचे सक्रिय मेट्रो रेल्वे नेटवर्क असेल.
प्रकल्पासाठी एकूण रु. 15,611 कोटी खर्च अपेक्षित आहे.
प्रकल्पाचे फायदे :
बंगळुरू मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा टप्पा-3 शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकासामधील लक्षणीय प्रगती दर्शवतो. टप्पा-3 शहरातील मेट्रो रेल्वे नेटवर्कचा मोठा विस्तार होण्यासाठी उपयोगी ठरेल.
कनेक्टिव्हिटी (दळणवळण) मध्ये सुधारणा :
टप्पा-3 बंगळूरू शहराच्या आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या पश्चिम भागाला अंदाजे 44.65 किमी. लांबीच्या नव्या मेट्रो मार्गांनी शहराच्या इतर भागाशी जोडेल. टप्पा-3 शहरातील पेन्या औद्योगिक परिसर, बन्नेरघट्टा मार्गावरील आयटी उद्योग आणि आऊटर रिंग रोड, तुमकुरु मार्गावरील वस्त्रोद्योग आणि इंजिनिअरिंग आयटम्स मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आणि ORR, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल), पीईएस विद्यापीठ, आंबेडकर महाविद्यालय , पॉलिटेक्निक महाविद्यालय, केएलई महाविद्यालय, दयानंदसागर विद्यापीठ, आयटीआय यासारख्या प्रमुख शैक्षणिक संस्था, यासारखी प्रमुख स्थाने एकमेकांशी जोडेल. टप्पा-3 कॉरिडॉर शहराच्या दक्षिणेकडील भाग, आऊटर रिंग रोड वेस्ट, मगडी रोड आणि विविध परिसरांना देखील कनेक्टिव्हिटी प्रदान करेल, ज्यामुळे शहरातील एकूण कनेक्टिव्हिटी सुधारेल. व्यावसायिक केंद्रे, औद्योगिक केंद्रे, शैक्षणिक संस्था आणि आरोग्य सेवा सुविधांना जोडणारी मेट्रो सेवा उपलब्ध होईल. त्यामुळे नागरिकांना या ठिकाणी सहज पोहोचता येईल.
वाहतूक कोंडी कमी होईल :
मेट्रो रेल्वे, हा रस्ते वाहतुकीसाठी एक कार्यक्षम पर्याय असून, बंगळूरू शहरातील मेट्रो रेल्वे नेटवर्कचा विस्तार म्हणून टप्पा-3 सुरु झाल्यावर वाहतूक कोंडी कमी होईल अशी अपेक्षा आहे. विशेषतः आऊटर रिंग रोड वेस्ट, मागडी रोड आणि शहरातील मोठी रहदारी असलेल्या इतर प्रमुख रस्त्यांवरील ताण कमी होईल. रस्त्यावरील रहदारी कमी झाल्यामुळे वाहनांची सुरळीत वाहतूक होईल, प्रवासाचा वेळ कमी होईल, आणि एकूणच रस्ते सुरक्षा वाढेल.
पर्यावरणासाठी फायदे:
टप्पा-3 मेट्रो रेल्वे प्रकल्पाची भर पडल्यावर आणि बंगळूरू शहरातील एकूण मेट्रो रेल नेटवर्कमध्ये सुधारणा झाल्यावर, पारंपरिक जीवाश्म इंधन-आधारित वाहतुकीच्या तुलनेत कार्बन उत्सर्जन लक्षणीयरीत्या कमी होईल.
आर्थिक विकास:
प्रवासाचा वेळ कमी होईल, तसेच शहराच्या विविध भागांमध्ये सहज पोहोचता येईल. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी अधिक जलद पोहोचता येईल, आणि पर्यायाने त्यांची उत्पादकता वाढेल. टप्पा-3 चे बांधकाम आणि कार्यान्वयन सुरु झाल्यावर बांधकाम कामगारांपासून, ते व्यवस्थापकीय कर्मचारी, आणि देखभाल कर्मचार्यांपर्यंत, विविध क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. कनेक्टिव्हिटी सुधारल्यामुळे आतापर्यंत ज्या भागात सहज पोहोचता येत नव्हते, त्या भागात स्थानिक व्यवसायांना चालना मिळेल, तसेच गुंतवणूक आणि विकास होईल.
सामाजिक प्रभाव :
बंगळूरू मधील टप्पा-3 मेट्रो रेल्वे नेटवर्कच्या विस्तारामुळे सर्वांसाठी सार्वजनिक वाहतुक उपलब्ध होईल, ज्याचा फायदा विविध सामाजिक-आर्थिक स्तरातील गटांना होईल आणि प्रवासाच्या सुविधांमधील असमानता कमी होईल. तसेच प्रवासाचा वेळ कमी झाल्यामुळे आणि अत्यावश्यक सेवा सहज उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांच्या जीवनाचा दर्जा सुधारेल.
मल्टी-मोडल एकीकरण आणि कानाकोपऱ्या पर्यंत कनेक्टिव्हिटी:
10 ठिकाणी मल्टी-मोडल इंटिग्रेशन म्हणजेच वाहतुकीचे विविध मार्ग एकत्र येणे नियोजित आहे. जेपी नगर चौथा टप्पा, जेपी नगर, कामक्या, म्हैसूर रोड, सुमनहल्ली, पेन्या, बीईएल सर्कल, हेब्बल, केंपापुरा, होसाहल्ली, या दहा ठिकाणी मल्टी-मोडल इंटिग्रेशन नियोजित असून, सध्याची आणि निर्माणाधीन मेट्रो स्टेशन, BMTC बस स्टँड, रेल्वे स्थानके, प्रस्तावित उपनगरीय (K-RIDE) स्थानके या ठिकाणी वाहतूक पर्यायाची अदलाबदल करता येईल.
टप्पा-3 मधील सर्व स्थानके समर्पित बस बे (मार्गिका), पिकअप आणि ड्रॉप ऑफ बे, पादचारी मार्ग, IPT/ऑटो रिक्षा स्टँडसह प्रस्तावित आहेत. बीएमटीसी यापूर्वीच कार्यरत मेट्रो स्थानकांसाठी फीडर बस चालवत असून, फेज-3 स्थानकांसाठी देखील त्याचा विस्तार केला जाईल. 11 महत्त्वाच्या स्थानकांवर पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
टप्पा-1 आणि टप्पा-2 ची सध्याची स्थानके टप्पा-3 च्या प्रस्तावित स्थानकांशी जोडली जातील.
FoBs/Skywalks द्वारे दोन रेल्वे स्थानकांना (लोटेगोल्लाहली आणि हेब्बल) थेट कनेक्टिव्हिटी प्रदान केली जाईल. टप्पा-3 मेट्रो स्थानकांवर, बाईक आणि सायकल शेअरिंगची सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली आहे.