मुंबई-अदानींना झेपत नसेल तर धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे टेंडर रद्द करा, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पक्षाच्या संपर्कप्रमुखांची बैठक घेतली. विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू करण्याचे आदेश देण्याबरोबरच ४ ते ११ ऑगस्ट या कालावधीत आपापल्या भागात ‘भगवा दिन’ साजरा करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी पुन्हा एकदा धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मुद्दा उपस्थित करत उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला.
अदानींना झेपत नसेल तर धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे टेंडर रद्द करा, अशी मागणी ठाकरे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. आमचं सरकार आल्यावर अदानींना दिलेलं टेंडर रद्द करण्याचा मुद्दा आहेच, पण आताच या सरकारने अदानींचं टेंडर का रद्द करू नये? हा आमचा प्रश्न आहे. धारावीकरांवर अन्याय करून मुंबईची अदानी सिटी आम्ही होऊ देणार नाही, असा दावा करत ते पुढे म्हणाले की, मुंबईचं नागरी संतुलन बिघडवण्याचा हा डाव आहे. अदानीने टेंडर दिलं त्यावेळी त्यात नसलेल्या गोष्टी ते आज देऊ करतायत. धारावीचा भूखंड ५९० एकरचा आहे. त्यात ३०० एकरवर गृहनिर्माण आहे. उर्वरित भूखंडाच्या जागेवर माहिम नेचर पार्क आणि टाटा पावर स्टेशन आहे. अदानी यांनी अधिकची जागा मागताना पात्र-अपात्रतेचे नंबर एवढे वाढवायचे की, प्रकल्प होऊ शकत नाही. अधिकच्या जागेसाठी दहीसरची मदर डेअरी, मुंबईतील मिठागर, मुलुंड टोलनाका इथल्या जागेवर लक्ष आहे,असा आरोप माजी मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला आहे. धारावी केवळ झोपडपट्टी नसून तिथे एक इंडस्ट्रियल इस्टेट आहे. तिथे प्रत्येक घरात मायक्रोस्केल उद्योग चालतो. त्यात कुंभार आहेत. चामडे उद्योग आहेत. मोदी-शाह मुंबईला अदानी सिटी करणार आहेत. उद्या कदाचित मुंबईचं नावही बदलून अदानी सिटी करतील, पण आम्ही धारावीवासीयांना उद्ध्वस्त करण्याचा डाव यशस्वी होऊ देणार नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं उदाहरण डोळ्यासमोर आहे. हे मुंबईला भिकेला लावण्याचं कारस्थान आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीका केली.
अयोध्यानगरीचा ज्या मतदारसंघात समावेश होतो त्या फैजाबाद लोकसभा मतदारसंघात भाजपचा पराभव करणारे सपचे खा. अवधेशप्रसाद यांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली.

श्रीकृष्ण आयोगाची अंमलबजावणी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेची मागणी करणारे सपाचे आमदार अबू असीम आझमी शनिवारी मातोश्री बंगल्यावर पोहोचले. विशेष म्हणजे, फैजाबाद (अयोध्या) लोकसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे अवधेश प्रसाद भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून खासदार म्हणून निवडून आले आहेत. ठाकरे गट आणि भाजपमध्ये सध्या जोरदार राजकीय संघर्ष सुरू आहे. त्यामुळेच सपा आमदार आझमी खासदार अवधेश प्रसाद आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्री बंगल्यावर गेले होते. या वेळी सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांचे चुलत भाऊ आणि आझमगड मतदारसंघाचे खासदार धर्मेंद्र यादव, भिवंडीचे आमदार रईस शेखही उपस्थित होते.