पुणे- वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी पुण्यात होऊ घातलेला रिंग रोड अनेक नेत्यांना आणि अधिकाऱ्यांच्या बरोबार बिल्डर दलाल यांना गब्बर करणार आहे , पण प्रत्यक्षात कामामुळे, विकासामुळे होतील ते गब्बर होतीलच ,पण भ्रष्ट कारभाराने कोण कोण गब्बर होतील हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर रिंग रोडच्या कामात हजारो कोटीचा गफला होत असल्याच्या वावड्या उठत असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ठेतच माहिती देऊन पुण्यातील रिंग रोडचे काम सुमारे सहा हजार कोटी रुपये जादा दराने देण्यात आले असल्याचे ठणकाऊन सांगितले आहे. १६ हजार कोटीचे काम २२ हजार कोटींना दिल्याचे त्यांनी स्पष्ट म्हटले आहे.
‘पुण्यातील रिंग रोडचे काम सुमारे सहा हजार कोटी रुपये जादा दराने देण्यात आले असून, ठेकेदार आणि राज्य सरकारमध्ये संगनमत झाले आहे,’ असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार )पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येथे केला.
पक्षाच्या पिंपरी-चिंचवड विभागातर्फे पिंपरीतील नवमहाराष्ट्र महाविद्यालयाच्या मैदानावर विजयी संकल्प मेळावा आयोजित केला होता. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात पाटील यांनी राज्य सरकार भ्रष्टाचाराची बजबजपुरी असल्याचा आरोप करून अनेक कामांची यादी वाचून दाखविली. त्यामध्ये पुण्यातील रिंग रोडच्या निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपाचाही समावेश होता.पाटील म्हणाले, ‘सुमारे १३६ किलोमीटर लांबीचा रिंग रोड पुण्यात होत आहे. या कामासाठी १६ हजार ६१८ कोटी रुपये खर्चाच्या कामाची निविदा तयार करण्यात आली. त्यापेक्षा एकदोन टक्क्यांनी कमी अथवा जास्त दराने ठेकेदाराला काम देणे अपेक्षित होते. मात्र, यासाठी २२ हजार ७९९ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देऊन मेघा इंजिनीअरिंग, नवयुग इंजिनीअरिंग, रोडवे सोल्युशन्स आणि जीआर इन्फो यांना काम देण्याचा निर्णय सरकारने घेतला. जवळपास ३० ते ४५.७२ टक्के जादा दराने काम दिले. कारण, याच कंपन्यांनी भारतीय जनता पक्षाला निवडणूक रोखे दिले आहेत.’ ठेकेदारांकडून भ्रष्टाचार करून घ्यायचा आणि त्याची वसुली टोलच्या माध्यमातून नागरिकांकडून करायची, असा सरकारचा अजब कारभार चालू असल्याचा आरोपही पाटील यांनी या वेळी केला. ‘तुरुंगापेक्षा भाजप बरा’ असे म्हणून सरकारमध्ये मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांची चौकशी का बंद झाली? हे जनतेला माहित आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.