पुणे दिनांक १९ जून—एकम टेबल टेनिस अकादमीतर्फे आयोजित केलेल्या यंदाच्या तिसऱ्या जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील पुरुषांच्या एकेरीत नील मुळ्ये याने तर महिलांच्या एकेरीत धनश्री पवार हिने विजेतेपद पटकाविले.
ग्रॅव्हिटी क्रीडा संकुल, डांगी चौक (पिंपरी चिंचवड परिसर) येथे ही स्पर्धा पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील पुरुषांच्या एकेरीत मुळ्ये याने विजेतेपद पटकावताना अमिष आठवले याच्यावर मात केली. चुरशीने झालेला अंतिम सामना त्याने ८-११,११-९,११-८, ११-८, ११-८ असा जिंकला. पहिली गेम अमिषने काउंटर अटॅक पद्धतीचा खेळ करीत घेतली. मात्र नंतर डावखुरा खेळाडू मुळ्ये याने अष्टपैलू खेळ करीत नंतरच्या चारही गेम्स जिंकून अजिंक्यपदावर नाव कोरले. रेडियंट अकादमी तो त्याचे वडील उपेंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. आठवले याने उपांत्य फेरीत अग्रमानांकित संस्कार बसाक याला पराभवाचा धक्का दिला होता मात्र मुळ्ये याने अतिशय सफाईदार खेळ करीत अंतिम फेरीत त्याची अनपेक्षित विजयाची मालिका खंडित केली.
महिलांच्या एकेरीत अग्रमानांकित धनश्री पवार हिला द्वितीय मानांकित नैशा रेवसकर हिच्या विरुद्ध अजिंक्यपद मिळवताना संघर्ष करावा लागला. उत्कंठा पूर्ण झालेला हा सामना तिने ११-९,५-११, ११-७, ८-११,११-९,११-३ असा घेतला आणि अजिंक्यपद पटकाविले. ती मूळची सोलापूरची असून क्रीडा प्रबोधिनीत ईश्वर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. दोन्ही खेळाडूंनी अष्टपैलू खेळ करीत सामना रंगतदार केला. मात्र शेवटच्या गेम मध्ये पवार हिने सुरुवातीपासून खेळावर नियंत्रण मिळवले होते. त्याचाच फायदा तिला झाला.