पदवीधरच्या २६ व्या बाद फेरीनंतर हर्षदा देशमुख-जाधव ८,८७० मतांनी पुढे; विजयाच्या कोट्यासाठी आणखी १,७५० मतांची गरज, शिक्षक मतदारसंघात २७ व्या फेरीअखेर कौस्तुभ गावडे यांना २०,११८ मते
पुणे | माय मराठी वृत्तसेवा
पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असून, दोन्ही मतदारसंघांत पुढील पसंतीच्या मतांची मोजणी महत्त्वपूर्ण ठरत आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या हर्षदा देशमुख-जाधव यांनी आघाडी कायम ठेवली आहे, तर पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे कौस्तुभ गावडे आघाडीवर आहेत.
पुणे पदवीधर : हर्षदा देशमुख-जाधव ८,८७० मतांनी आघाडीवर
पुणे पदवीधर मतदारसंघात प्रथम पसंतीच्या मतांची मोजणी पूर्ण झाल्यानंतरही कोणत्याही उमेदवाराने विजयासाठी आवश्यक असलेला १ लाख १३ हजार ९५ मतांचा कोटा पूर्ण केलेला नाही. त्यामुळे पुढील पसंतीच्या मतांची मोजणी सुरू आहे.
२६ व्या बाद फेरीनंतर हर्षदा देशमुख-जाधव यांना १ लाख ११ हजार ३४९ मते, तर डॉ. स्मिता योगेश जाधव यांना १ लाख २ हजार ४७९ मते मिळाली आहेत.
हर्षदा देशमुख-जाधव यांनी ८ हजार ८७० मतांची आघाडी घेतली असून, विजयासाठी आवश्यक कोटा पूर्ण करण्यासाठी त्यांना आणखी १ हजार ७५० मतांची गरज आहे.
पुणे शिक्षक : कौस्तुभ गावडे आघाडीवर
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात २७ व्या बाद फेरीअखेर भाजपचे कौस्तुभ गावडे यांनी आघाडी घेतली आहे.
२७ व्या फेरीअखेरची मतस्थिती :
१. कौस्तुभ गावडे (भाजपा) – २०,११८ मते
२. सचिन सानप (अपक्ष) – १३,६४२ मते
३. दत्तात्रय सावंत (अपक्ष) – १२,६८७ मते
कौस्तुभ गावडे यांनी सचिन सानप यांच्यावर ६,४७६ मतांची, तर दत्तात्रय सावंत यांच्यावर ७,४३१ मतांची आघाडी घेतली आहे.
अधिकृत निकालाकडे लक्ष
दोन्ही मतदारसंघांतील मतमोजणीच्या पुढील फेऱ्यांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पदवीधर मतदारसंघात हर्षदा देशमुख-जाधव विजयाच्या कोट्याच्या जवळ पोहोचल्या आहेत. शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे आघाडीवर असले, तरी विजयाचा आवश्यक कोटा आणि अंतिम निकाल अद्याप स्पष्ट झालेला नाही.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतरच विजयी उमेदवारांचे चित्र निश्चित होईल.

