पुणे -शहरातील रस्त्यावरचा वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी व भविष्यातील रहदारीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार्या उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार [एच. सी. एम. टी. आर] या मार्गाचा मूळ प्रस्ताव बाजूला ठेवून पुणे महापालिकेने केलेल्या फेरबदलास राज्य सरकारने काही अटींवर मान्यता दिली असली तरी काही मूठभर बांधकाम व्यावसायिकांसाठी या मार्गात २६ ठिकाणी बदल सुचविण्यात आला आहे.त्यामुळे एचसीएमटीआर’ च्या या फेरबदलास काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध असून वेळप्रसंगी न्यायालयात दाद मागितली जाईल अशी थेट भूमिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल यांनी मांडली आहे.
बिल्डर लॉबीसाठी असेच ‘विषय’ येणार याचीच मिळाली प्रचिती–पुण्याला भाजपचा खासदार आणि मंत्रिपद मिळताच ‘असेच विषय’ येणार याचीच प्रचिती आता मिळाली आहे. बिल्डर लॉबीसाठी २६ ठिकाणी बदल करून ‘एचसीएमटीआर’ चे वाटोळे केले आहे. असेही आबा बागुल म्हणाले. १९८० मध्ये केलेला ‘एचसीएमटीआर’चा मूळ प्रस्ताव जसाच्या तसा मंजूर करणे. जी निविदा प्रक्रिया झाली होती, ती पुन्हा करणे आणि पुणेकरांना मृत्यूच्या खाईतून बाहेर काढणे याला प्राधान्य द्यावे आणि ‘एचसीएमटीआर’मध्ये २६ ठिकाणी कुणासाठी फेरबदल केले याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणीही आबा बागुल यांनी केली आहे.
आबा बागुल म्हणाले कि, शहरांतर्गत वाहतुकीला गती देण्यासाठी प्रस्तावित उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गाच्या मूळ प्रस्तावात पुणे महापालिकेने [एच. सी. एम. टी. आर] केलेल्या फेरबदलाला राज्य सरकारने मान्यता दिली असली तरी हरकती -सूचना प्रक्रियेत या फेरबदलाला तीव्र हरकत घेतली जाईल आणि मूळ प्रस्तावानुसारच उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार [एच. सी. एम. टी. आर] मार्ग साकारण्यात यावा यासाठी पुन्हा आंदोलनही करण्यात येईल.
वास्तविक शहर हे जीवघेण्या वाहतूकीमुळे नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. कोणत्या उपाययोजना हव्या आणि कोणत्या नको याबाबत प्रशासन यंत्रणेत ताळमेळ नसल्याने आणि काही मूठभर व्यावसायिकांच्या हितासाठी प्रशासन सक्रिय असल्याने वाहतूक व्यवस्थेचे ‘तीन-तेरा ‘ वाजले आहेत. वास्तविक विकास आराखड्यात अनेक उपाययोजना सुचविलेल्या असताना केवळ त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने ही गंभीर स्थिती ओढवली आहे. परिणामी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अपघाती मृत्यू होण्याचे प्रमाणही चिंताजनक बनले आहे.असे असताना लोकसभा निवडणूक पार पडताच उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार [एच. सी. एम. टी. आर] या मार्गामध्ये बांधकाम व्यावसायिकांचे हित जोपासण्यासाठी २६ ठिकाणी फेरबदल करण्यात आले आहे. त्याला राज्यसरकारने तातडीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे ‘एचसीएमटीआर’चा प्रकल्प बाळगणारच हा राज्य सरकारचा हेतू स्पष्ट होत आहे. शिवाय पुणेकरांना जीवघेण्या वाहतुकीत एकप्रकारे मृत्यूच्या खाईत ठेवण्याचाच हा प्रकार आहे. त्यामुळे कोणत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी या मार्गात २६ ठिकाणी बदल करण्यात आले हे प्रशासनासह राज्यसरकारने जाहीर करावे. तसेच नवनिर्वाचित खासदारांनीही भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी आबा बागुल यांनी केली असून १९८७च्या विकास आराखड्यात अंतर्गत प्रलंबित असलेला ‘एचसीएमटीआर’ मार्ग हाच एकमेव शाश्वत पर्याय असून तो मूळ प्रस्तावा व आराखड्यानुसारच अस्तित्वात यावा यासाठी आग्रही राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.