पुणे: पुण्यातील अनेक भागात आज सुमारे 7 तास विद्युत पुरवठा खंडीत झाला. सुरुवातीला वीजपुरवठा खंडित झाला त्यानंतर जोरदार पाऊस सुरू झाला, तर काही ठिकाणी पाऊस झाल्यावर वीजपुरवठा खंडीत झाला. यामुळे अनेक छोट्या लघु उद्योगांना फटका बसला. लोकांना निवडणूक निकालाच्या बातम्यांची आवश्यक ता असताना वीज पुरवठा खंडीत झाला.
शहरात मान्सूनपूर्व पावसाने अवघ्या तासाभरात शहर जलमय केले. हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार वडगावशेरीत अवघ्या तासाभरात तब्बल ११४ मि.मी. पावसाची नोंद झाली.त्यामुळे धानोरीत मुख्य रस्त्यावर तब्बल चार फुटांपेक्षा अधिक पाणीसाचून तळी साचली होती. तसेच लक्ष्मीनगर येथे डोंगरावरून आलेले पाणी थेट रस्त्यावर आल्याने अनेक दुकानांमध्ये पाणी शिरण्यासह चारचाकी वाहनेही अडकून पडली होती.
शहरात मंगळवारी वडगावशेरीसह स्वारगेट, नगररस्ता, खराडी, कात्रज, धनकवडी, सातारा रस्ता, विठ्ठलवाडी, धायरी, स्वारगेट, गोखलेनगर, शिवाजीनगर, पुणे स्टेशन भागांतही अनेक ठिकाणी रस्त्यावर पाण्याची तळी साचली होती. तर दुसरीकडे अवघ्या काही वेळात इतके पाणी साचले, तरी महापालिकेचे जवळपास सर्वच कर्मचारी लोकसभा निवडणुकीच्या निकालात असल्याने पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणीही उपलब्ध नसल्याने नागरिकांनीच पुढाकर घेत पाण्याला वाट करून दिली.
या पावसाने विश्रांतवाडी, धानोरी रस्ता, कल्याणीनगर, गोकूळ नगर, टिंगरेनगर, विमानननगर, नगररस्ता येरवडा भागाला सर्वाधिक फटका बसला पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने रस्त्यावर वाहने अडकून पडली. तर, नागरिकांनी जीव वाचविण्यासाठी वाहने रस्त्यातच सोडणे पसंत केले. त्यानंतर रात्री उशीरा पर्यंत पाणी निचरा होण्याची वाट पाहण्यात आली. मात्र, ही वाहने अडकून पडल्याने रस्त्यांवर दुर्तफा वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.धानोरीमधील लक्ष्मीनगर येथे सर्वाधिक नुकसान झाले आहे. नागारिक तसेच लोकप्रतिनिधींनी वारंवार मागणी करून या भागात महापालिकेकडून कामेच केली जात नसल्याने ही स्थिती उद्भवली आहे.
शहराच्या अनेक भागात मोठया प्रमाणात पाणी साचल्याने मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. त्यात, हडपसर स्वारगेट रस्ता, स्वारगेट- सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, रूबी हाॅल ते बंडगार्ड, गुंजन चौक नगररस्ता, कर्वे रस्ता अनेक भागात मोठया प्रमाणात रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक मंदावली त्यामुळे या कोंडीने शहराच्या इतर भागात मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे पहायला मिळाले.