अनेक आमदार खासदारही गप्पच ..का बरे ?
पुणे: कल्याणीनगरमध्ये शनिवारी पहा टे झालेल्या अपघातात दोन तरुण अभियंत्यांचा जीव गेला. दारूच्या नशेत अल्पवयीन कारचालकानं नोंदणी नसलेली महागडी पोर्शे कार भरधाव वेगात पळवून दुचाकीला धडक दिली. त्यात दोघांचा बळी गेला. अपघातीआधी अल्पवयीन चालक आणि त्याचे मित्र एका पबमध्ये गेले होते. तिथे त्यांनी मद्यपान केल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचं गांभीर्य अधिक वाढलं. या अपघाताची चर्चा देशभरात झाली. पण पुण्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार अद्याप तरी या विषयावर मौन बाळगून आहेत आणि त्यांनीच काय तर त्यांच्या आता राजकीय प्रतिस्पर्धी बनलेल्या खासदार सुप्रिया सुळे, खासदार वंदना चव्हाण तसेच शहरातील धंगेकर आणि चंद्रकांत पाटील वगळता अन्य आमदार यांनीही याबाबत काहीही वाच्यता केल्याचे ऐकायला आले नसल्याने राजकीय वर्तुळातून कार्यकर्ते आश्चर्य व्यक्त करत आहेत. पुण्याच्या अशा प्रकारे मौन बाळगून असलेल्या लोक प्रतिनिधींवर बोलले जाऊ लागल्याचे समजताच एका खासदाराने नुकतीच फेसबुकवर एकूणच होर्डींग्ज आणि अपघात अशी एकत्रित प्रतिक्रिया नोंदविली आहे.
या अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला अवघ्या १५ तासांत जामीन मंजूर झाला. त्यासाठी त्याच्यासमोर निबंध लिहिण्यासारख्या अतिशय संतापजनक अटी ठेवण्यात आल्या. यानंतर सोशल मीडियावर वातावरण तापलं. जनमानसातून संताप व्यक्त होऊ लागला. लोकांमधील वाढता रोष लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी पुणे गाठलं. गृहमंत्री या नात्यानं त्यांनी पोलिसांची बैठक घेतली. अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. आरोपीला जामीन देण्याच्या निर्णयावर त्यांनी तीव्र नाराजी बोलून दाखवली.पण अजितदादा आणि सुप्रियाताई किंवा वंदना चव्हाण यात कुठेही दिसल्या नाही .
पहाटे लवकर उठून सकाळपासूनच बैठकांचा धडा लावणारे, ग्राऊंडवर जाऊन काम करणारे, अधिकाऱ्यांना सूचना देणारे अजित पवार पुण्याच्या कल्याणीनगर इतकी भयंकर घटना घडल्यानंतरही आहेत कुठे? ते पुण्यात फिरकले का नाहीत? अशी चर्चा आता सुरु झाली आहे. बारामती, शिरुरमधील मतदान झाल्यानंतर अजित पवार फारसे सक्रिय दिसलेले नाहीत. त्यामुळे अजित पवारांना नेमकं झालंय काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे हे या बिल्डरकडे नौकरीला असलेले त्यांचे जुने स्नेही निघाले.आणि संशयाच्या भोवर्यात सापडले.पण कडक शिस्तीचे , सडेतोड पालकमंत्री मात्र या सर्व प्रकरणात गायब असल्याचे अनेकांना जाणवले.