‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’
गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत असलेली मालिका म्हणजे कलर्स मराठीवरील ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’. २०१८ साली ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर बाळूमामांच्या जीवनावर आधारित असलेली ही मालिका सुरू झाली होती. खूप कमी कालावधीत ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचली. या मालिकेचा चाहता वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे.
‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या लोकप्रिय मालिकेत आजवर आपण बाळूमामांना वेगवेगळ्या रूपात पाहिले आहे. रसिकांनी बाळूमामांचे लहान वयातील रूप आणि तरूण वयातील रूप पाहिले आणि त्यांच्या उतार वयाच्या टप्प्यावरचे रूप ही अनुभवले. या सर्व रूपात प्रेक्षकांनी बाळूमामावर भरभरून प्रेमही केले आहे. आता प्रेक्षकांना बाळूमामांच्या आयुष्याच्या आठवणीतील आणि भूतकाळातील अशा काही गोष्टी बघायला मिळणार आहेत ज्या आत्तापर्यंत आपल्याला कोणालाच माहीत नव्हत्या.
उतारवयाच्या या टप्प्यावर बाळूमामांना जाणीव व्हायला लागली की, आपण एवढा प्रवास केला लोकांसाठी राबलो, आयुष्यात अनेक लोक आली आणि गेली. आता आपण एकटे पडलो आणि ह्या सगळ्या आठवणींनीमुळे मामा रडायला लागले . मामांचे गुरु मुळे महाराज त्यांनी भेटून त्यांचे सांत्वन केले आणि मग त्या दोघांचा एकत्र प्रवास सुरु होतो. प्रवास करत असताना अक्कोळ गावाजवळ ते आले त्यांना काही माणसे भेटली आणि गावात येण्याची विनंती केली. त्यांनतर मामांना इथून पुढे भूतकाळाचे काही प्रसंग दिसू लागतात. भूतकाळामध्ये गेल्यावर त्यांना छोट्या मामांच्या आयुष्यातील पुढची कथा उलगडायला सुरु होते. जसे चंदूलालचा लोभीपणा,आईचा खाष्टपणा आणि प्रेमळ बायकोची मामावर असलेली माया आपल्याला पाहायला मिळेल.
मामांच्या अशा अनेक चमत्कारिक प्रसंगाची मालिका सुरू होणार असून ती लवकरच प्रेक्षकांसमोर नव्या रूपाने सादर होणार आहे. बाळूमामांच्या चरित्रगाथेत या कथेच्या निमित्ताने समर्थ पाटील ज्याने बालपर्वातील बाळुमामाची लोकप्रिय भूमिका साकार केली होती. तो मालिकेमध्ये पुनरागमन करणार आहे. अष्टपैलू अभिनेते प्रकाश धोत्रे बाळूमामांची मुख्य भूमिका साकारत आहेत. या नव्या टप्प्यावर सुद्धा बाळूमामांच्या अनाकलनीय आणि अवाक करणाऱ्या चरित्रातील अनेक न पाहिलेले प्रसंग रसिकांना पहायला मिळतील.
बाळूमामांच्या आठवणीतला नवा अवतार. येत्या २० तारखेपासून ‘बाळुमामाच्या नावानं चांगभलं ‘ दररोज रात्री ७:३० वाजता कलर्स मराठीवर प्रदर्शित होणार आहे.