मुंबई- घाटकोपर परिसरात सोमवारी वादळी वाऱ्यामुळे 120 फूट उंच लोखंडी होर्डिंग कोसळली. त्यात 14 जणांचा बळी गेला, तर चब्बल 74 जण जखमी झाले. आता या होर्डिंगला देण्यात आलेल्या परवानगीवरून मुंबई महापालिका व रेल्वे प्रशासनात चांगलीच जुंपली आहे. त्यातच या होर्डिंगसाठी 7-8 झाडांवर विषप्रयोग करण्यात आल्याची गंभीर बाबही उजेडात आली आहे. यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीत मुंबईचे राजकारण चांगलेच तापले आहे.दुसरीकडे, मुंबई महापालिकेने या दुर्घटनेप्रकरणी आपले अंग झटकल्यानंतरही मध्य रेल्वेनेही या प्रकरणापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच ही जमीन आपल्या मालकीची नसल्याची पुष्टीही सोबत जोडली आहे. पेट्रोल पंपावर कोसळलेले होर्डिंग रेल्वेच्या जमिनीवर उभे नव्हते. त्यामुळे त्याचा भारतीय रेल्वेशी कोणताही संबंध नाही, असे मध्य रेल्वेने एका ट्विटद्वारे स्पष्ट केले आहे.
मुंबईत सोमवारी दुपारनंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह धुळीचे वादळ उठले होते. या वादळात घाटकोपर भागातील एक महाकाय होर्डिंग पेट्रोल पंपवर कोसळली होती. त्यात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. आता ही होर्डिंग उभी असलेल्या जागेवरून मुंबई महापालिका व भारतीय रेल्वेत वाद सुरू झाला आहे. ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली ती जागा आमची नव्हे तर रेल्वेची आहे असे महापालिकेने सांगितले आहे. तसेच या प्रकरणी आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत रेल्वे व जाहिरात कंपनीविरोधोात गुन्हा दाखल केला जाईल, असेही बीएमसीने म्हटले आहे.
मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार, 7 डिसेंबर 2021 रोजी तत्कालीन जीआरपी आयुक्तांनी हे बेकायदेशीर होर्डिंग लावण्याची परवानगी दिली होती. विषबाधा करून 7 ते 8 झाडे तोडल्यानंतर हे महाकाय होर्डिंग उभारण्यात आले होते. विशेषतः महापालिकेने या प्रकरणी मे 2023 मध्ये पहिला एफआयआरही दाखल केला होता. ‘न्यूज 18’ च्या वृत्तानुसार, महापालिकेने यासंबंधी वारंवार पंत नगर पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. पण त्याचा काहीही फायदा झाला नाही.
महापालिकेच्या ते, अशा संरचनेसाठी परवानगीचा आकार 40 बाय 40 चौरस फूट आहे. पण कोसळलेले होर्डिंग तब्बल 120 बाय 120 चौरस फूट आकाराचे होते. महापालिकेची वैध परवानगी नसल्यामुळे या दुर्घटनेनंतर एन वॉर्डच्या आयुक्तांनी तातडीने संबंधित जाहिरात कंपन्यांना या भागातील बेकायदा होर्डिंग काढण्याचे आदेश दिले आहेत.