मुंबई-होर्डिंग कोसळण्याच्या घटनेनंतर मुंबई पोलिस सोमवारी रात्री भावेश भिडे यांच्या मुंलुंड येथील घरी पोहोचले. पण भावेश किंवा त्याचे कुटुंब तिथे सापडले नाही. त्यानंतर त्यांनी त्याच्या मोबाइलवर संपर्क साधला असता मोबाइल बंद असल्याचे निष्पन्न झाले.मुंबई महापालिकेने काही दिवसांपूर्वीच इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला बेकायदा होर्डिंग काढण्यासंबंधीची नोटीस बजावली होती. कंपनीने आपले 8 बेकायदा होर्डिंग पुढील 10 दिवसांत काढले नाही तर कंपनीचा शहरातील 24 वॉर्डांत होर्डिंग लावण्याचा परवाना रद्द केला जाईल, असा इशारा महापालिकेने या प्रकरणी दिला होता. पण कंपनीने त्याकडे साफ दुर्लक्ष केले होते. आता या कंपनीच्या होर्डिंगमुळेच 14 जणांचा बळी गेल्यामुळे मोठा वाद उत्पन्न झाला आहे.
मुंबईतील घाटकोपर येथे एक बेकायदा होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळून 14 जणांचा बळी गेला. हे होर्डिंग भावेश भिडे नामक व्यक्तीच्या कंपनीचे होते. भिडे सध्या बेपत्ता आहेत. पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी भावेश भिडे यांच्यासह अन्य काही जणांवर भादंवि कलम 304 338, 337 व 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
घाटकोपर येथे द्रुतगती मार्गावरील एका पेट्रोल पंपावर सोमवारी दुपारी वाऱ्यामुळे एका महाकाय होर्डिंग अर्थात जाहिरात फलक कोसळला. त्यात 14 जण ठार, तर अनेकजण जखमी झाले. पोलिसांच्या माहितीनुसार, हे होर्डिंग इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड नामक कंपनीने लावले होते. भावेश भिडे या कंपनीचे संचालक आहेत. त्यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विभागीय पोलिसि उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी ही माहिती दिली आहे.