पुणे- काल सायंकाळी जोरदार आणि बेभान वाऱ्याने हलक्याश्या पावसाने पुण्यातील २१ झाडांची पडझड आणि कित्येक वाहनांची मोडतोड केल्यावर आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास यंदाच्या खऱ्याखुऱ्या पहिल्या पण तडाख्याच्या मुसळधार पावसाने जोरदार वाऱ्याने पुण्याला अक्षरशः झोडपून काढले .
शहर परिसरात शुक्रवारी दुपारी तीननंतर मुसळधार पाऊस सुरू झाला. पावसामुळे कोंढव्यातील शीतल पेट्रोल पंप, धायरी, भवानी पेठ, एरंडवणे अग्निशमन केंद्राच्या परिसरात, येरवड्यातील सादलबाब चौक, लोहियानगर, कोथरूडमधील गिरीजा शंकर सोसायटी, स्वारगेट परिसरातील वेगा सेंटर, स्वारगेट पोलीस वसाहतीत झाडे पडली. येरवड्यात झाड पडल्याने एका मोटारीचे नुकसान झाले.अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने मदतकार्य सुरू केले. रस्त्यात पडलेल्या झाडांच्या फांद्या हटवून रस्ते वाहतुकीस मोकळे करून देण्यात आले. दुपारी पाऊस सुरू झाल्यानंतर तासाभरात दहा ठिकाण झाडे पडण्याच्या घटना घडल्या, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली.
आंबेगावातही वादळी वाऱ्यासह पाउस
आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागातील पारगाव, पेठ गावामध्ये तसेच अवसरी खुर्द, अवसरी बुद्रूक, निरगुडसर गावडेवाडी गावात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला तर काही गावामध्ये मोठ्या प्रमाणात वारे सुटले होते.पावसाचे वातावरण दिसत असल्याने शेतकऱ्यांची काही वेळ एकच धांदल उडाली होती. शेतात काढलेली उन्हाळी बाजरी, कांदा पिक झाकण्यासाठी शेतकऱ्यांची पळापळ झाली.आज दिवसभर हवेत मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत असल्याने दुपारी तीन नंतर आकाशात ढग जमा होऊन पावसाचे वातावरण तयार झाले होते. आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक, गावडेवाडी, मेंगडेवाडी, निरगुडसर, या परिसरात पावसाने हजेरी लावली त्यामुळे काही काळ शेतकऱ्यांची धांदल उडाली होती अनेक शेतकऱ्यांच्या शेतात कांदा काढणी, उन्हाळी बाजरी काढणी सुरू होती ती पिके झाकण्यासाठी धावपळ सुरू होती तर अनेक ठिकाणी जनावरांसाठी साठवलेला चारा कडबा, वैरण झाकण्यासाठी शेतकरी पळत होते. अचानक आलेल्या पावसामुळे एकच तारांबळ उडाली होती मात्र या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने काही काळ उकाडाही कमी झाला होता. पुढील काही दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून त्या दृष्टीने शेतकरी शेतीतील कामे लगबगीने करत असल्याचे चित्र दिसत आहे.आज अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर लग्नाचा मुहूर्त मोठा असल्याने अनेक मंगल कार्यालयात, गावांमध्ये लग्न समारंभ होते. ढगांचा गडगडाट, विजांचा लख लखाट वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे काही काळ वऱ्हाडी मंडळीची एकच तारांबळ उडाली. लग्नासाठी लांबून आलेले वऱ्हाड घरी जाण्यासाठी धावपळ करत असताना दिसून आले.