घड्याळाला मतदान केले नाही तर पाणी मिळणार नाही, कारखान्याला ऊस जाणार नाही,अशा धमक्यांना घाबरू नका, त्यांना दुरुस्त करण्याची वेळ आता आली आहे,
सुपे येथील सभेत शरद पवार यांना उपस्थितांमधून एक चिठ्ठी देण्यात आली. घड्याळाला मतदान केले नाही तर पाणी मिळणार नाही, कारखान्याला ऊस जाणार नाही, असा मजकूर या चिठ्ठीत होता. शरद पवार यांनी ही चिठ्ठी वाचून दाखवली. अशा धमक्यांना घाबरू नका, त्यांना दुरुस्त करण्याची वेळ आता आली आहे, या शब्दात त्यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे वाभाडे काढले.शरद पवार यांनी आज उंडवडी कडेपठार, कारखेल, देऊळगाव रसाळ, सुपे येथे दौरा केला. उंडवडी व सुपे येथे त्यांची सभा पार पडली. या सभेत त्यांनी जनाई-शिरसाई योजनेच्या कामाची जबाबदारी मी ज्यांच्यावर दिली होती, त्यांनी ती पार पाडली नाही. मी गेली २० वर्षे स्थानिक विषयात लक्ष घालत नव्हतो. परंतु आता लक्ष घालून मी माझी जबाबदारी पार पाडेन, असे स्पष्ट केले. बारामतीच्या जिरायत भागाने नेहमीच मला भरभरून प्रेम दिले आहे. त्यामुळे या माझ्या माणसांचे प्रश्न सोडवणे ही माझीच जबाबदारी असल्याचे पवार म्हणाले.शरद पवार यांनी आज बारामतीच्या जिरायत भागाचा दौरा केला.जनाई-शिरसाई पाणी योजनांसंबंधी शरद पवार यांनी या दौऱ्यात भाष्य केले.जनाई-शिरसाई योजना या बारामती तालुक्याच्या जिरायत भागातील शेती सिंचनासाठी राबविण्यात आल्या. परंतु योजना सुरु झाल्यापासून त्याचे दुखणे सुरु आहे. योजनांचे वीज बिल परवडत नाही. पाणी येत नाही, पोटचाऱ्यांची कामे नाहीत, असे अनेक प्रश्न योजनेसंबंधी आहेत. याच विषयावरून मागील दोन-तीन महिन्यांपूर्वी सुपे येथे उपोषण झाले होते. उपोषणकर्त्यांची खा. सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली होती. त्यानंतर लागलीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही भेट घेतली होती. त्याच कालावधीत काही लोकांनी गोविंदबागेत शरद पवार यांची भेट घेत या विषयात लक्ष घालण्याचे आवाहन केले होते.हा प्रश्न तापतो आहे हे लक्षात येताच अजित पवार यांनी सुप्यात शेतकरी मेळावा घेतला होता. हे काम करायचे झाले तर मीच करू शकतो, कोणीही मायचा लाल हे काम करू शकत नाही, हा दावा त्यांनी केला होता. शरद पवार यांनीही त्याला प्रत्युत्तर म्हणून, ही योजना माझ्या सहीने मार्गी लागल्याचे सांगितले होते. जिरायती भागातील मते या दोन्ही गटासाठी लोकसभा निवडणूकीत निर्णायक आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी थेट मंत्रालयात सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. उपसा सिंचन योजना सौर उर्जेवर चालविण्याचा निर्णय घेतला होता.शिवाय उपोषणकर्त्यांना ठोस आश्वासने देत त्यांचे उपोषण मागे घेण्यात मोठी भूमिका बजावली होती. या सगळ्या घडामोडीनंतर आता शरद पवार जिरायती भागात अॅक्टीव्ह झाले आहेत.त्यामुळे जनाई-शिरसाई योजनांचा श्रेयवाद रंगला आहे.
00:13 / 03:15