–श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळभैरवनाथ मंदिर कसबा पेठ तर्फे आयोजन ; गुढीपाडव्याच्या निमित्ताने भाविकांना द्राक्षांचा प्रसाद
पुणे : कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात तब्बल ११ हजार १११ द्राक्षांची आकर्षक सजावट करण्यात आली. गुढीपाडव्याच्या निमित्ताने ही आरास मंदिरात करण्यात आली असून भाविकांना द्राक्षांचा प्रसाद देण्यात येणार आहे. काळ्या, हिरव्या व पिवळ्या द्राक्षांनी मंदिराचा गाभारा सजविण्यात आला होता.
श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळ भैरवनाथ मंदिर तर्फे कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ मंदिरात द्राक्षांची व फुलांची आरास करण्यात आली होती. मंदिराचे व्यवस्थापन आजपर्यंत लडकत घराण्याकडे असून वर्षभरात विविध उत्सव केले जातात.
श्री काळभैरवनाथ हे पुण्याचे जागृत ग्रामदैवत असून भैरवनाथ मंदिराचे गर्भगृह आणि मध्यगृह हेमाडपंथी बांधणीचे आहे. कसबे पुणे ही बाराशे वर्षांपूर्वीची पुण्यातील वस्ती. याठिकाणी मुल:, मुक्ता आणि नाग या तीन नद्यांचा पवित्र त्रिवेणी संगम आहे. गाव तेथे मारुती आणि भैरवनाथाचे मंदिर ही आपल्याकडील परंपरा आहे. अशा कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ मंदिरात द्राक्षांची केलेली सजावट पाहण्याकरिता भाविकांनी मोठी गर्दी केली.