नवी दिल्ली-स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी टक्कर एकीकडे भाजपा देत असताना दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे उद्धव ठाकरेंचे भाऊ राज ठाकरे यांच्या मनसेला महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीत घेण्याच्या घडामोडींना कमालीचा वेग आला आहे. यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची येथील शहा यांच्या निवासस्थानी बैठक झाली . त्यांच्यातील बैठक आता संपन्न झाली असून राज ठाकरे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. आता मुंबईत गेल्यावर राज ठाकरे दिल्लीतील भेटीबाबत बोलणार असल्याचे सांगितले जात आहे. दिल्लीत त्यांची भाजपच्या राज्यातील बड्या नेत्यांसह शहांशी चर्चा झाली. त्यामुळे या बैठकीत मनसेच्या महायुतीच्या प्रवेशाचा ठोस निर्णय झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज ठाकरे यांच्या दिल्ली भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. ”राज ठाकरे हे दिल्लीला गेले आहेत. त्यांच्या या भेटीबाबत सर्व माहिती येणाऱ्या काही तासांत स्पष्ट होईल. मात्र राज ठाकरे जो निर्णय घेतील तो राज्याच्या, पक्षाच्या आणि मराठी माणसाच्या हिताचाच असेल. ते जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे काम करणे हे आमचे कर्तव्य असून यापुढेही त्यांच्या आदेशाचे पालन करू”.
एक जागा मनसेच्या बाळा नांदगावकरांना ..
दरम्यान, मनसेने दक्षिण मुंबई, नाशिक किंवा शिर्डी या 3 पैकी किमान 2 लोकसभा मतदारसंघांची मागणी केली. या तिन्ही जागा शिंदेसेनेकडे आहेत. त्यापैकी एक जागा मनसेच्या बाळा नांदगावकरांना देण्याची भाजपने तयारी दर्शवली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची संमतीही घेण्यात आली. मात्र दक्षिण मुंबईची जागा भाजपला हवी आहे. शिंदेसेना नाशिक सोडणार नाही. त्यामुळे राखीव मतदारसंघ असलेल्या शिर्डीतून बाळा नांदगावकरांना उमेदवारी देण्यावर एकमत होऊ शकतेे. यावर दिल्लीच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.