नागपूर, 12 फेब्रुवारी 2024
आत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत 4 जी सॅच्युरेशन प्रोजेक्ट मिशन 500 च्या माध्यमातून मोबाईल नेटवर्क नसणाऱ्या देशातल 31 हजार गाव -खेड्यांना 4 जी सेवा देण्याचे काम BSNL वर सोपविले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया मिशन अंतर्गत जलद इंटरनेट सेवा पुरवून केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा जनतेला लाभ मिळावा यासाठी BSNL प्रयत्नशील राहणार असल्याची माहिती BSNL महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळाचे मुख्य महाव्यवस्थापक रोहित शर्मा यांनी आज नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत दिली. केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाच्या अधीन सार्वजनिक उपक्रम असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड-बीएसएनएलच्या नागपूर कार्यालयाद्वारे आजपासून ते 15 फेब्रुवारी दरम्यान 20व्या अखिल भारतीय बीएसएनएल कॅरम आणि कल्चरल टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले असून याचे उद्घाटन आमदार निवास परिसरात रोहित शर्मा यांच्या हस्ते आज झाल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते . याप्रसंगी कोअर नेटवर्क पश्चिम क्षेत्राचे मुख्य महाव्यवस्थापक प्रशांत पाटील , बीएसएनएल नागपूरचे प्रधान महाव्यवस्थापक यश पान्हेकर उपस्थित होते .
महाराष्ट्रातील 5200 नेटवर्क नसलेली खेडी ही 2751 नवीन टॉवर उभारून 4जी मोबाईल नेटवर्क युक्त बनविणार असल्याचे शर्मा यांनी सांगितले.
सी डॉट, टिसीएस, तेजस या संस्थाच्या साहाय्याने स्वदेशी 4जी तंत्रज्ञान विकसित केले असून स्वतःचे मोबाईल नेटवर्क तंत्रज्ञान असणारा भारत हा जगातील 5 वा देश ठरला आहे. स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित ही 4जी सेवा ही 5जी पर्यंत सुद्धा विकसित करता येत असल्याचे त्यांनी सांगितले.
येणाऱ्या काळात BSNL चे सर्व टॉवर हे 4जी मधे रुपांतरीत करणार असून महाराष्ट्रात याची सुरुवात झाली आहे.भारतनेट फेज 2 मार्फत देशातील ग्राम पंचायत आणि ग्रामीण संस्था यांना BSNL मार्फत निरंतर इंटरनेट आणि मोबाईल नेटवर्क पुरवून यांना अजून मजबूत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
VSAT उपग्रहाच्या माध्यमातून अजून उत्कृष्ट आणि दर्जेदार सुविधा देण्यावर BSNL चा भर असून पर्वतीय आणि ग्रामीण प्रदेशात सोलर पॅनल वापरून 4जी सेवा देणार असल्याचे शर्मा यांनी यावेळी स्पष्ट केले .व्यावसायिक ग्राहकांकरिता असलेल्या कॉपर केबलचे पूर्णपणे फायबर ऑप्टिक मध्ये रूपांतर केले जात असून त्याद्वारे बँडविथ आणि अद्यावत नेटवर्क ग्राहकांना मिळत असल्याचे देखील शर्मा यांनी सांगितलं .