माजी उपमहापौर आबा बागुल यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
पुणे – वाहतूक कोंडीतून पुणेकरांना दिलासा देण्यासाठी विकास आराखड्याची संपूर्ण अंमलबजावणी करण्याची मागणी पालिकेतील काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते व माजी उपमहापौर आबा बागुल यांनी प्रशासक तथा महापालिका आयुक्तांकडे केली आहे. शिवाय शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी ठोस उपायांचा आराखडा तयार असून त्यासाठी बैठक तातडीने घेण्याची अपेक्षाही व्यक्त केली आहे. याबाबत माजी उपमहापौर आबा बागुल यांनी प्रशासक तथा महापालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे कि, दिवसेंदिवस विस्तारणाऱ्या पुणे शहराची वाहतूक समस्या ही पुणेकरांना डोकेदुखी ठरत आहे.सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम करण्यासाठी मेट्रो हा पर्याय असला तरी वाहतूक कोंडीचा मोठा अडसर आहे. पुणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी विकास आराखड्याची संपूर्ण अंमलबजावणी करणे अपरिहार्य आहे. शहराला भेडसावणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पीपीपी तत्वाचा अवलंब तसेच जागतिक बँकेचे कर्ज घ्या ;पण जोपर्यंत रस्तारुंदी होत नाही तोपर्यंत एफएसआय देऊ नये. अस्तित्वातील रस्त्यांनुसारच बांधकाम परवानगी देण्यात यावी. त्यामुळे रस्ता रुंदी होण्याआधी जो वाहनांचा अतिरिक्त भार पडत आहे. तो पडणार नाही आणि वाहतूक समस्या जटिल होणार नाही.उलट ती सुरळीत राहील. याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी अनेक ठोस पर्याय आहेत. ज्यावर लक्ष दिले तर शहराची वाहतूक सुरळीत होईल.शहरात विविध भागात नो – व्हेईकल झोन आवश्यक आहेत. त्याचे नियोजन होण्याची गरज आहे. ज्यातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर नागरिकांनी करणे हा हेतूही व्यापक स्तरावर साध्य होईल. शिवाय खासगी वाहनांच्या संख्येला आळा बसेल आणि प्रदूषणाचे प्रमाणही कमी होईल. मेट्रो आवश्यक आहे,त्याचे जाळे विस्तारण्याकडे आपण लक्ष देत आहोत मात्र सार्वजनिक बस वाहतूक सेवेसाठीही ठोस पाऊले उचलण्याची गरज आहे.त्यासाठी बस मार्गांचे फेरसर्वेक्षण करून ज्या मार्गांवर प्रवाशी जास्त आहेत,तिथे बसची वारंवारिता जास्त ठेवणे. प्रवाशांना एक्सप्रेस बस सेवा देण्यासाठी रेड,ग्रीन,यलो या धर्तीवर एक थांबा (अति जलद),दोन थांब्यानंतर एक थांबा (मध्यम जलद) आणि सर्व थांब्यावर [ सामान्य ] अशी सेवा देण्यासाठी नियोजन करण्याची गरज आहे. लोकांमध्ये सार्वजनिक वाहतूक सेवेबद्दल विश्वास निर्माण व्हावा यासाठी तातडीने उपाययोजनांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.ज्यातून खासगी वाहनांचे रस्त्यावर येण्याचे प्रमाण कमी होईल.त्याचप्रमाणे नवीन वाहन नोंदणी करताना शहराची लोकसंख्या आणि रस्त्यांची मर्यादा याचा विचार होणे गरजेचे आहे. शहरात होत असलेली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अरुंद रस्त्यांसह शहरातील सर्वच रस्त्यांवर सम -विषम संख्येनुसार चार चाकी वाहनांना पार्किंग उपलब्ध करून देणे असे उपाय सुचवले आहेत. तसेच वाहतूक नियोजनासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय स्तरावर तातडीने स्वतंत्र ट्रॅफिक प्लॅनरची नियुक्ती तसेच महापालिकेत त्यासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्याची मागणीही केली आहे. तसेच उपाययोजनांचा एक ठोस आराखडा तयार केलेला असून त्यासाठी आयुक्तांनी तातडीने एक बैठक बोलवावी.सविस्तर मार्गदर्शनास तयार आहोत.असेही आबा बागुल यांनी नमूद केले आहे.