देशभरातील ५ लाखांपेक्षा अधिक मंदिरात कार्यक्रम
पुणे : अयोध्येत नुकत्याच झालेल्या प्रभू श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा आणि श्री रामलला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात देशभरातील विविध सांप्रदायाच्या ४ हजार संत महंतांसह ३ हजार मान्यवरांनी प्रत्यक्षपणे हजेरी लावली. त्यासोबतच हा अलौकिक दिव्य प्रसंग देशभरातील ५ लाखांपेक्षा अधिक मंदिरातून तब्बल ८ कोटी लोकांनी प्रत्यक्षपणे अनुभवला आहे. आता फेब्रुवारी महिन्यात देशभरातून १ लाखापेक्षा अधिक विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते व कारसेवक अयोध्येला दर्शनासाठी जाणार आहेत, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष अॅड.आलोककुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला विश्व हिंंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री संजय मुद्राळे, प्रांत सहमंत्री ऍड. सतिश गोरडे, प्रांताचे प्रचार प्रसिद्ध प्रमुख तुषार कुलकर्णी, विदेश समन्वय प्रमुख कृष्णकांत चांडक, ऍड. सतिश गोरडे आदी उपस्थित होते.
अॅड.आलोककुमार म्हनाले, राष्ट्रीय ऐक्याचा असा धार्मिक प्रसंग गेल्या हजारो वर्षात भारतात घडला नव्हता. जगातील ५५ देशातील हिंदूंनीही हा प्रसंग प्रभू श्रीरामावरील असणाऱ्या श्रद्धायुक्त अंत:करणाने व देश प्रेमाच्या उत्कट भावनेने आपापल्या देशात मोठया उत्साहात साजरा केला. श्रीराम मंदिराच्या निर्मितीनंतर देशात रामराज्य निर्माण व्हावे, असा प्रयत्न विश्व हिंदू परिषद करीत आहे.
ते पुढे म्हणाले, प्रभू श्रीरामचंद्र यांच्या राज्यात कोणी असहाय्य नव्हता, दुर्बल नव्हता. सर्वांच्या मतांचा समान आदर केला जायचा. माता शबरी, माता अहिल्या यांच्याप्रमाणे प्रत्येक स्त्रीचा सन्मान, आदर आपण देखील केला पाहिजे. जगात दहशत माजवणा-या असुरांचा नाश केला पाहिजे, असे सांगताना देशभरातून दिनांक २३ फेब्रुवारी पर्यंत १ लाखापेक्षा जास्त विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते व कारसेवक आयोध्येला प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी जाणार आहेत.
तसेच पुण्यातून देखील १३ फेब्रुवारी रोजी सुमारे २ हजार कार्यकर्ते व कारसेवक अयोध्येला दर्शनासाठी परिषदेच्या वतीने जात आहेत, असे संजय मुद्राळे यांनी सांगितले.