पुणे- शहरातील कात्रज भागातील गुजरवाडी येथे चोरट्याने भरदिवसा धुमाकूळ घातला असून दोन सोसायटीतील पाच सदनिका फोडून तीन लाख ८३ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली अशी माहिती पोलिसांनी गुरवारी दिली. याप्रकरणी मारुती विष्णू थिटे (वय-५९, रा. मंगलम सोसायटी, गुजरवाडी, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ६ फेब्रुवारी रोजी दुपारी पावणे तीन ते ४ च्या दरम्यान घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी मारुती थिटे यांच्या पत्नी घराच्या टेरेसवर कपडे सुकवण्यासाठी गेल्या होत्या. चोरट्याने याचा फायदा घेत फिर्यादी यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातील १ लाख ४५ हजार २५० रुपयांचे दागिने चोरले. तसेच फिर्यादी राहत असलेल्या बिल्डिंग मधील महेंद्रसिंग परमार यांच्या सदनिकेचा दरवाज्याचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला.
याच बरोबर फिर्यादीयांच्या शेजारी असणाऱ्या बिल्डिंग मधील राकेश मांगीलाल चौधरी, हर्षल अनिकेत ढमाले, दिलीप ज्ञानोबा फणसे यांच्या बंद सदनिकेचे कुलूप तोडले. यातील राकेश चोधरी आणि दिलीप फणसे यांच्या घरातील २ लाख ३७ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली. चोरट्याने दोन सोसायटीतील ३ सदनिकेतून तीन लाख ८३ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता करत आहेत.