पुणे : राज्य नाट्य स्पर्धेत ११ पारितोषिके मिळविणाऱ्या संगीत पद्माराणीने भरत नाट्य संशोधन मंदिराच्या ३४व्या वासंतिक संगीत नाट्य महोत्सवाला मंगळवारी (दि. ५) सुरुवात झाली. दि. १० मेपर्यंत आयोजित महोत्सवात सहा नाटकांचे सादरीकरण होणार आहे.
यंदाच्या महोत्सवाचे उद्घाटन खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी दीपप्रज्वलन, नटराज पूजन आणि तिसरी घंटा देऊन केले. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, भारती विद्यापीठ संस्थेच्या प्रमुख संचालक विजयमाला कदम, सनदी लेखापाल विजयकांत कुलकर्णी, भरत नाट्य संशोधन मंदिराचे अध्यक्ष पंडित पांडुरंग मुखडे, उपाध्यक्ष भाग्यश्री देसाई, कार्याध्यक्ष अभय जबडे मंचावर होते.
प्रास्ताविकात अभय जबडे म्हणाले, १८९४ पासून अखंडितपणे कार्यरत असणारी भरत नाट्य संशोधन मंदिर ही पुण्यातील एकमेव नाट्यसंस्था असून दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या वासंतिक नाट्य महोत्सवाला रसिकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभतो. संगीत नाटकांविषयी उल्लेखनिय कार्य करणाऱ्या कलाकार, तंत्रज्ञांना भरत नाट्य संशोधन मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त गौरविण्यात येते. या कार्याकरिता जबडे यांनी एक लाख रुपयांची देणगी संस्थेकडे सुपूर्द केली.
भरत नाट्य संशोधन मंदिराशी प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या असलेल्या स्नेहाविषयी कृतज्ञता व्यक्त करून पांडुरंग मुखडे यांनी पुण्यातील संगीत नाट्य संस्थानी एकत्र येऊन संगीत नाटकांचा महोत्सव करण्याचा मानस असल्याचे सांगितले.
उद्घाटनपर मनोगत व्यक्त करताना प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, मराठी नाट्यसृष्टीचा गाभा म्हणजे संगीत नाटक आहे. संगीत नाटकांमधून समाज प्रेरीत होतो, जनजागृती होते तसेच सामाजिक परिवर्तनही घडते. आत्मपरिक्षण करण्याची ताकद संगीत नाटकांमधून मिळत असून भविष्यात आजच्या सामाजिक विषयांवर संगीत नाटकांची निर्मिती व्हावी, ज्या योगे युवा पिढी संगीत रंगभूमीशी जोडली जाईल. भरत नाट्य मंदिर निर्मित संगीत नाटकांच्या माध्यमातून नव्या दमाचे कलाकार रसिकांसमोर येत आहेत, याबद्दल त्यांनी कौतुक केले.
मोहन जोशी यांनी उपक्रमास शुभेच्छा दिल्या. विजयकांत कुलकर्णी म्हणाले, संगीत नाटकांची अभिजात परंपरा टिकवून ठेवण्यासाठी भरत नाट्य संशोधन मंदिर सातत्याने प्रयत्नशील आहे. संगीत नाटके कोहिनूर हिरा आहेत; परंतु त्याला रसिक मायबाप प्रेक्षकांचे कोंदण मिळणे आवश्यक आहे.
संगीत पद्माराणी नाटकाचे संगीत दिग्दर्शक आशिष केसकर यांचा विशेष सन्मान प्रा.डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. संगीत पद्माराणीचे दिग्दर्शक संजय डोळे आणि संगीत दिग्दर्शक आशिष केसकर यांची वृंदा पांगारकर हिने रेखाटलेली चित्रे त्यांना भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका डोळे यांनी केले.

