कुटुंबियांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत दिला धीर; बुधवार दि.६ मे रोजी कासा येथे देणार भेट
मुंबई.५ मे: पालघर जिल्ह्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली एका अल्पवयीन आदिवासी मुलीवर भोंदू बाबाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.विधानपरिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेत, पालघर पोलिस अधीक्षकांना कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत. पॉक्सो कायद्याबरोबरच महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गंभीर कलमे लावण्यात यावीत, असे त्यांनी सांगितले आहे.
डॉ. गोऱ्हे यांनी उप अधीक्षक स्तरावरील अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तपास पूर्ण करण्याचे, भक्कम दोषारोपपत्र तयार करण्याचे, जलदगती न्यायालयात खटला चालवण्याचे आणि विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत.
पीडित मुली व तिच्या कुटुंबीयांना तातडीने पोलीस संरक्षण, वैद्यकीय उपचार, मानसिक समुपदेशन आणि ‘मनोधैर्य’ योजनेअंतर्गत आर्थिक मदत देण्याच्या सूचना देखील डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, डॉ. गोऱ्हे यांनी पीडित कुटुंबियांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांना धीर दिला आहे. त्यांच्याकडून परिस्थिती जाणून घेतली आहे. त्यांना सर्वोत्तपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच या प्रकरणाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून योग्य त्या कार्यवाहीच्या सूचना दिल्या असल्याचे सांगितले.
या प्रकरणाचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी डॉ. गोऱ्हे या उद्या बुधवार दि ६ मे रोजी दुपारी २:०० वाजता कासा उपजिल्हा रुग्णालय येथे व पीडितेच्या कुटुंबियांना भेट देणार आहेत. त्यांच्यासोबत शिवसेना पालघर जिल्हा संपर्क प्रमुख पांडुरंग पाटील हे सोबत असणार आहेत.

