मुंबई,
महाराष्ट्र जनगणना संचालन संचालनालयाने आज मुंबईत पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी राज्यातील जनगणना 2027 च्या प्रारंभाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. भारत सरकार आगामी जनगणना 2027 साठी व्यापक तयारी करत आहे. ही भारताची 16 वी जनगणना असून, जनगणना कायदा 1948 च्या तरतुदींनुसार राबवला जाणारा अत्यंत महत्त्वाचा राष्ट्रीय उपक्रम आहे.
महाराष्ट्राच्या मुख्य प्रधान जनगणना अधिकारी, डॉ. निरुपमा जे. डांगे यांनी राज्यातील जनगणनेमधील सर्व वैयक्तिक प्रतिसादकर्त्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी हे महत्त्वाचे कार्य आपली जबाबदारी मानून त्यामध्ये सक्रियपणे सहभागी व्हावे. “16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत जेव्हा प्रगणक तुमच्या घरी भेट देतील, तेव्हा तुम्ही त्यांना संपूर्ण आणि अचूक माहिती द्यावी. तसेच, तुमच्या आजूबाजूच्या लोकांनाही याबाबत अद्ययावत माहिती घेण्यासाठी आणि आपली गणना करून घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावे”, त्या म्हणाल्या. प्रभावी धोरण निर्मितीला पूरक ठरणारा आणि राज्याच्या सर्वांगीण विकासात योगदान देणारा विश्वसनीय डेटा निर्माण करण्यासाठी सक्रिय लोकसहभाग आवश्यक आहे, असे डॉ. डांगे यांनी नमूद केले आणि प्रतिसादकर्त्यांना या प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केले.
सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमांप्रती असलेल्या वचनबद्धतेनुसार, जनगणना 2027 मध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा व्यापक वापर केला जाईल, ज्यामुळे माहितीचे संकलन आणि प्रसार यांची गुणवत्ता, कार्यक्षमता आणि वेळेवर पूर्णत्व वाढण्याची अपेक्षा आहे. अचूकता आणि गती वाढण्याच्या दृष्टीने डिजिटल माध्यमांद्वारे आयोजित केली जाणारी ही देशातील पहिली जनगणना आहे. ती प्रत्यक्ष माहिती संकलनासाठी मोबाईल ॲप्लिकेशन्सचा वापर करणाऱ्या डिजिटल चौकटीकडे होणारे महत्त्वपूर्ण संक्रमण दर्शवते. यासाठी सर्वसमावेशक देखरेख, पर्यवेक्षण आणि माहिती व्यवस्थापनासाठी जनगणना देखरेख व व्यवस्थापन प्रणाली (सीएमएमएस) वेब पोर्टल सक्षम करण्यात आले आहे. ऑनलाइन स्व-गणना करण्याचा पर्याय देखील सुरू करण्यात आला असून यामुळे व्यक्तींना आपल्या कुटुंबासाठी जनगणनेचे वेळापत्रक स्वतंत्रपणे भरणे, पूर्ण करणे आणि सादर करणे शक्य होईल.
महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, जनगणना 2027 च्या पहिल्या टप्प्याचा म्हणजेच घरांची यादी आणि गृहगणना (एच एल ओ) यांचा कालावधी खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आला आहे:
| स्व-गणना | 1 मे ते 15 मे, 2026 |
| घरांची यादी प्रक्रिया | 16 मे ते 14 जून, 2026 |
स्व-गणना ऐच्छिक आहे आणि ती केली असो वा नसो, माहिती गोळा करण्यासाठी आणि नोंदवण्यासाठी प्रगणक 16 मे ते 14 जून 2026 दरम्यान राज्यातील (महाराष्ट्र) प्रत्येक घराला भेट देतील, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. महाराष्ट्र राज्यासाठी स्व-गणना (एस ई) पोर्टल 1 मे ते 15 मे 2026 दरम्यान सक्रिय राहील. कुटुंबातील कोणताही एक सदस्य अंदाजे 15-20 मिनिटांत स्व-गणना प्रक्रिया पूर्ण करून कुटुंबाचा तपशील देऊ शकतो. यशस्वीरित्या माहिती सादर केल्यावर एक स्व-गणना आयडी (एसई आयडी) तयार केला जाईल आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर/ई-मेलवर पाठवला जाईल. स्व-गणना प्रक्रियेदरम्यान कोणतेही दस्तऐवज अपलोड करण्याची आवश्यकता नाही.
राज्यात जनगणना करण्यासाठी 2.64 लाख क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसह त्यांना सर्वंकष प्रशिक्षण देण्याचे काम सुरू
घरांची यादीकरणाचे काम पार पाडण्यासाठी, संपूर्ण महाराष्ट्रात प्रगणक आणि पर्यवेक्षकांसह सुमारे 2.64 लाख क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना (10% राखीव कर्मचाऱ्यासह) प्रशिक्षण देऊन त्यांना या कामासाठी तैनात करण्यात येत आहे. या कामासाठी, भारताचे महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांच्या कार्यालयाने आखून दिलेली संरचित पाच-स्तरीय प्रशिक्षण प्रणाली लागू करण्यात आली आहे. राष्ट्रीय प्रशिक्षकांना विषय तज्ज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांनी पुढे 9 ते 17 मार्च 2026 या कालावधीत पुण्यातील यशदा येथे महाराष्ट्रातील 141 प्रमुख प्रशिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे. या प्रमुख प्रशिक्षकांनी त्यानंतर 6 ते 17 एप्रिल 2026 दरम्यान जिल्हा आणि वैधानिक शहरी मुख्यालयांमधील 3,850 क्षेत्रीय प्रशिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे. अंतिम टप्प्यात, क्षेत्रीय प्रशिक्षकांकडून 23 एप्रिल ते 8 मे 2026 या कालावधीत एचएलओ (HLO) मोबाईल ॲप्लिकेशनचा वापर करून क्षेत्रीय कार्ये पार पाडणार असलेल्या सुमारे 2.64 लाख प्रगणक आणि पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे
भक्कम त्रिस्तरीय सुरक्षा प्रणालीमुळे जनगणनेच्या माहितीचे संकलन आणि त्याची साठवण करण्याचे काम सुरक्षितपणे होईल हे सुनिश्चित
मजबूत डेटा सुरक्षा उपाययोजनांचा अंतर्भाव करण्यात आला असून त्यामध्ये मोबाईल उपकरणे, डेटा ट्रान्समिशन आणि बहु-घटक प्रमाणीकरणाद्वारे सर्व्हर-पातळीवर संरक्षणासह त्रिस्तरीय सुरक्षा प्रणालीचा समावेश आहे. पासवर्ड आणि ओटीपी-आधारित प्रमाणीकरणाचा वापर करून केवळ अधिकृत कर्मचाऱ्यांपुरताच प्रवेश मर्यादित असून सर्व डेटा एनक्रिप्टेड स्वरूपात संग्रहित केला जाईल. स्व-गणनेचा पर्याय निवडणाऱ्या नागरिकांना https://se.census.gov.in या अधिकृत पोर्टलचा वापर करून संवादांची सत्यता पडताळून पाहण्याची सूचना करण्यात आली आहे.


