मुंबई-धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचे राज्याच्या राजकारणात संतप्त पडसाद उमटत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ढोंगी बागेश्वर बाबाला महाराष्ट्राच्या संत परंपरेशी जोडताना देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे. त्यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा नागपुरात एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते असा दावा केला. त्यांच्या या दाव्यावर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी या विधानाप्रकरणी बागेश्वर बाबा यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यात आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भर पडली आहे. सपकाळ यांनी भोंदू बागेश्वरचा उल्लेख साधू संत असा केल्याप्रकरणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरसंधान साधले आहे.
हर्षवर्धन सपकाळ रविवारी आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले, विकृत धीरेंद्र शास्त्रीने (बागेश्वर बाबा) छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल गरळ ओकली आणि तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच विकृताचा उल्लेख ‘साधू-संत’ असा केला. हा महाराष्ट्राच्या महान संत परंपरेचा अपमानच आहे. संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराजांपासून ते आधुनिक काळातील गाडगे बाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या वाणी आणि लेखणीने समृद्ध केलेल्या संत परंपरेशी या ढोंगी बागेश्वर बाबाला जोडताना देवेंद्र फडणवीसांना लाज वाटली पाहिजे. त्यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच आहे.
भोंदूबाबा धीरेंद्र शास्त्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत असताना मुख्यमंत्री, गडकरी व मोहन भागवत गप्प का? असा सवाल उपस्थित करत हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपतींबद्दल गरळ ओकायला सांगणारा मालक एकच, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. या प्रकरणी त्यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. त्यात धीरेंद्र शास्त्री व महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दिसत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणे हे भाजपा RSS चे राष्ट्रीय धोरण आहे. महाराजांचे विचार व कर्तृत्व त्यांना मान्य नाही. त्यामुळे शिवरायांच्या अवमानाबद्दल धीरेंद्र शास्त्रींसह मुख्यमंत्री फडणवीस, नितीन गडकरी व सरसंघचालकांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणीही सपकाळ यांनी या प्रकरणी केली आहे.
काय म्हणाले होते धीरेंद्र शास्त्री?
धीरेंद्र शास्त्री यांनी नागपूर येथील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांवरही वादग्रस्त विधान केले. ते शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांच्या कथित भेटीवर भाष्य करताना म्हणाले होते, सततच्या युद्धामुळे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा खूप थकले, तेव्हा ते एकेदिवशी रामदास स्वामी यांच्याकडे गेले. तिथे त्यांनी आपला मुकूट काढला आणि म्हणाले, आम्ही खूप युद्ध लढले. आता आम्हाला आणखी लढायचे नाही. आता आमच्यावर एक मोठी दया करा, हा माझा मुकूट तुम्ही सांभाळा. हा राजपाठही तुम्हीच सांभाळा. तुमच्या आज्ञेनेच आम्ही इथपर्यंत वाटचाल केली. आता आम्हाला चालणे अवघड झाले आहे.
आता आम्हाला युद्ध लढणेही होत नाही. आता आम्ही खूप थकलो. आता आम्हाला विश्रांतही हवी आहे. आता आम्हाला आराम करायचा आहे. आता आम्हाला काही दिवस काहीच करायचे नाही, असे शिवाजी महाराज रामदास स्वामींना म्हणाले. त्यावर रामदास स्वामींनी त्यांची समजूत काढली आणि त्यांना उपदेश केला, असे बागेश्वर बाबा म्हणाले. त्यांच्या या विधानावर आता प्रचंड राजकीय वाद होत आहे.

