नामदेव शिरगावकर यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव
पुणे,२४ जानेवारी: एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे १७व्या राष्ट्रीय पातळीवरील ‘एमआयटी डब्ल्यूपीयू समिट २०२४’ या क्रीडास्पर्धा सर्वसाधारण विजेतेपद एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेला (११८ गुण) मिळाले, तर उपविजेतेपद भारती विद्यापीठ, पुणे (२० गुण) मिळाले. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या संघाला करंडक व ५१ हजार रुपयांचे रोख बक्षिस देण्यात आले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे दि. १९ ते २३ जानेवारी २०२४ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या १७ व्या राष्ट्रीय पातळीवरील ‘एमआयटी डब्ल्यूपीयू समिट-२०२४’ चा पारितोषिक वितरण समारंभ कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात संपन्न झाला.
स्पर्धेच्या समारोप व पारितोषिक वितरणप्रसंगी भारतीय तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष श्री. नामदेव शिरगावकर हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
याप्रसंगी माईर्स एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरद्चंद्र दराडे-पाटील, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरु डॉ.आर.एम.चिटणीस, प्र-कुलगुरु प्रा.डॉ. मिलिंद पाडे, स्पर्धेचे समन्वयक प्रा.डॉ. पी. जी. धनवे, रोहित बागवडे आणि विलास कथुरे उपस्थित होते. विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.
‘समिट-२०२४’मध्ये देशभरातील ५५ संघांच्या माध्यमातून २५०० विद्यार्थ्यांनी एकूण १६ क्रीडा प्रकारांत सहभाग घेतला होता. विजेत्यांना करंडक, पदके, प्रशस्तीपत्र व रोख १५ लाख रुपये रकमेची पारितोषिके देण्यात आली. क्रिकेट, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, फुटबॉल, बास्केटबॉल, टेबल टेनिस, लॉन टेनिस, कबड्डी, चेस, स्विमिंग, ई स्पोर्ट्स अशा एकूण ११ क्रीडा प्रकारांत या स्पर्धा घेण्यात आल्या. प्रत्येक क्रीडाप्रकारातील विजेत्या संघाला करंडक, सुवर्ण पदक व रुपये ७ हजार ते २५ हजार रोख.याखेरीज उपविजेत्या संघाला करंडक, रौप्य पदक व रोख रक्कम रुपये ४ हजार ते रू.१६ हजार देण्यात आले.
नामदेव शिरगावकर म्हणाले, भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. खेळ हे जीवनाचे अविभाज्य अंग आहे. त्यामध्ये आपली क्षमता व एकाग्रता वाढवून ध्येय साध्य करता आले पाहिजे. कौशल्य, खिलाडीवृत्ती, समर्पण या गुणांबरोबरच खेळामध्ये शिस्तीला खूप महत्व आहे. खेळामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो व त्यातूनच स्वःताला फिट ठेवता येते.
प्रा. डॉ.विश्वनाथ दा. कराड म्हणाले, विद्यार्थ्यांनी शारीरिकदृष्ट्या सक्षम, मानसिकदृष्ट्या सतर्क, बौध्दिकदृष्ट्या चाणाक्ष, आध्यात्मिकदृष्ट्या सजग असावे. शिस्त आणि चरित्र्य या दोन गोष्टींना जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे. मातृ देवो भव, पितृ देवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव याची जाणीव ठेवावी. देशासाठी हे अत्यंत महत्वाच्या असून यातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व बनते.प्रा.डॉ. मिलिंद पांडे यांनी सर्वांचे स्वागत केले.रसेल रॉबिन्सन व पारेवी ब्रह्मभट्ट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. आर.एम.चिटणीस यांनी आभार मानले.