पुणे, दि. २४ : अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात दोन ठिकाणी छापे टाकून ३५ लाख १६ हजार ९२१ रुपये किंमतीचा प्रतिबंधित असलेला तंबाखूजन्य गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी आदींचा साठा जप्त करण्यात आला. पोलीस ठाण्यात प्रथम खबरी अहवाल नोंदविण्यात आला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने दिली आहे.
देहू रोड परिसरातील दांगट पाटील यांचे गोदाम, विकासनगर किवळे या ठिकाणी प्रतिबंधित पदार्थाची साठवणूक व विक्री करण्यात येत असल्याच्या माहितीवरुन मंगळवारी (दि. २३) टाकलेल्या छाप्यानुसार २३ लाख ६८ हजार ५८० रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. तसेच रियाझ अजीज शेख, घर क्र. १२५, देहू मुख्य बाजार, देहू कॅन्टोन्मेंट, देहू बाजार येथे आज टाकलेल्या छाप्यात ११ लाख ४८ हजार ३४१ रुपये किंमतीचा प्रतिबंधित पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. या दोन्ही प्रकरणात देहूरोड पोलीस ठाण्यात प्रथम खबरी अहवाल नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई सहायक आयुक्त (अन्न) एन. आर. सरकटे, अन्न सुरक्षा अधिकारी शीतल घाटोळ, सायली टाव्हरे, अस्मिता गायकवाड, राहूल खंडागळे, बालाजी शिंदे आणि प्रकाश कचवे यांनी केली.
नागरिकांचे जनहित व जनआरोग्याच्या दृष्टिकोनातून १८ जुलै २०२३ च्या आदेशानुसार राज्यात गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाकु, सुगंधित सुपारी इत्यादी तंबाखु जन्य पदार्थावर उत्पादक, साठा, वितरण व विक्री यावर १ वर्षाकरिता बंदी घातलेली आहे. प्रतिबंधीत गुटखा, पान मसाला इत्यादीच्या विक्रीबाबतची माहिती असल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क साधण्याचे आवाहन पुणे विभागाचे सह आयुक्त (अन्न) अ. गो. भुजबळ यांनी केले आहे.
0000