संस्कृती प्रतिष्ठान, शि. प्र. मंडळीच्या वतीने १८ ते २० जानेवारीला राम कथा कार्यक्रम
पुणे : संस्कृती प्रतिष्ठान व शिक्षण प्रसारक मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अपने अपने राम’ या राम कथा कार्यक्रमस्थळाचे भूमिपूजन व उभारण्यात येणार्या रामनगरीची पायाभरणी शुक्रवारी (दि. १२) करण्यात आली. डॉ. कुमार विश्वास यांच्या अमोघ वाणीतून १८, १९, २० जानेवारी २०२४ अशी तीन दिवस ही राम कथा स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर होत आहे.
शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष ऍड. एस. के. जैन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर कार्यवाह सचिन भोसले, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे, विश्व हिंदू परिषदेचे प्रांत विशेष संपर्कप्रमुख किशोर चव्हाण, पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल यांच्या हस्ते विधिवत पूजा करून, श्रीफळ वाढवून भूमिपूजन व वासा पूजन पार पडले.
यावेळी कार्यक्रमाचे मुख्य संयोजक भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी नगरसेवक अजय खेडेकर, हेमंत हरहरे, मकरंद देशपांडे, धनंजय बर्वे, विनीत कुबेर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सचिन भोसले म्हणाले, “अयोध्येत २२ तारखेला होत असलेल्या प्राणप्रतिष्ठेला सर्वांना जाता येणार नाही. मात्र, मोहोळ यांच्या पुढाकारातून येथे उभारण्यात येणाऱ्या अयोध्येतील राम मंदिराच्या प्रतिकृतीमुळे पुणेकर राम भक्तांना अयोध्येतील सोहळ्याची अनुभूती घेता येणार आहे.”
धीरज घाटे, किशोर चव्हाण यांनीही या भव्यदिव्य कार्यक्रमातून भक्तांना राम कथा ऐकण्याची संधी मिळणार असून, हा कार्यक्रम अतिशय देखणा होईल. हा कार्यक्रम निर्विघ्न पार पाडण्यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचे धीरज घाटे यांनी नमूद केले.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, “डॉ. कुमार विश्वास यांच्या अमोघ वाणीतून रामकथा ऐकण्यासाठी रोज एक लाख लोक बसतील, अशा स्वरूपाची व्यवस्था करण्यात येत आहे. अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती आकर्षण असणार असून, त्याच व्यासपीठावरून डॉ. विश्वास निरूपण करतील.