वेलनेस कोच सोनल देसाई व ब्रायन ट्रेसी लिखित ‘अल्टिमेट सिक्रेट्स ऑफ वेल्थ’ पुस्तकाचे प्रकाशन
पुणे : “जीवनात यशस्वी होण्यात वय नाही, तर स्वतःमधील इच्छाशक्ती, जिद्दीने केलेले प्रयत्न, आप्तस्वकियांचा पाठिंबा गरजेचा असतो. भवतालच्या परिस्थितीतून अनुभव घेत, त्यातून शिकत आपण स्वतःला समृद्ध करत असतो. त्यातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करतो. अशावेळी स्वतःच्या अनुभवांना शब्दांमध्ये बांधत केलेले लेखन इतरांसाठी प्रेरक व प्रभावी असते,” असे मत प्रसिद्ध बॅरिऍट्रिक सर्जन डॉ. शशांक शहा यांनी व्यक्त केले.
होलिस्टिक वेलनेस कोच आणि ब्रेथवर्क फॅसिलिटेटर सोनल देसाई व कॅनडियन-अमेरिकन मोटिवेशनल स्पीकर ब्रायन ट्रेसी यांनी लिहिलेल्या ‘अल्टिमेट सिक्रेट्स ऑफ वेल्थ’ पुस्तकाचे प्रकाशन डॉ. शहा यांच्या हस्ते झाले. कोरेगाव पार्क येथे झालेल्या कार्यक्रमात डॉ. पूनम शहा, उद्योजक चकोर गांधी, लेखिका सोनल देसाई, त्यांचे पती व उद्योजक पंकज देसाई आदी उपस्थित होते. गृहिणी ते वेलनेस गुरु असा सोनल यांचा थक्क करणारा प्रवास यावेळी प्रकाशनाच्या निमित्ताने उलगडला.
सोनल देसाई म्हणाल्या, “माझा हा प्रवास परम योग इन्स्टिट्यूटमधून २०१५ मध्ये योग शिक्षक प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सुरु झाला. माझ्यातील ज्ञानाची आसक्ती व शिकण्याची इच्छा यामुळे २०१७ मध्ये मी तिबेटियन ब्रेथवर्क व मेडिटेशनसाठी कैवल्य योग इन्स्टिट्यूटकडे गेले. तसेच इस्टोनिया येथील माईंडव्हॅली विद्यापीठातुन ‘होलोबॉडी’ अभ्यासक्रम पूर्ण करून प्रमाणित ‘सिल्वा मेथड सिक्स फेज मेडिटेशन फॅसिलिटेटर’ बनले. डॉ. स्नेह देसाई यांच्याकडे ‘ट्रेन द ट्रेनर’ हा कार्यक्रम केला. त्यामुळे माझी खूपच प्रगती झाली.”
“प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्ल्यून्सर स्नेहा देसाई, ज्वेलरी डिझाइनर तन्वी देसाई व सिनेमॅटोग्राफर विराग देसाई यांचे उत्तम संगोपन करताना मला हा मार्ग सापडला आणि ब्रायन ट्रेसी यांच्यासोबत लेखन करण्याची संधी हा माझ्यासाठी आयुष्यातील परमोच्च आनंदाचा क्षण आहे. हे पुस्तक संपत्तीच्या रहस्यांचा अभ्यास करते, वैयक्तिक विकासावरील व्यावहारिक अंतर्दृष्टीसह सर्वांगीण आरोग्य पद्धती एकत्र करते. जीवनात आनंदी, निरोगी व आर्थिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल, असे वाटते,” असे सोनल देसाई यांनी नमूद केले.
स्नेहा देसाई व तन्वी देसाई यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. अतिशय रोमांचक शैलीत दोघीनींही आपल्या आईचा प्रवास उलगडला. विराग देसाई यांनी सर्वांचे आभार मानले.