पुणे : “ताणतणाव, भोवळ येणे, एपिलेप्सी, ब्रेन ट्युमर, आल्झयमर, पार्किन्सन डिसिज असे विविध मेंदूचे आजार आहेत. मेंदूच्या विविध आजारासाठी किंवा डिसऑर्डरसाठी औषधे, कॅप्सूल, इंजेक्शन यापेक्षाही नाकावाटे औषधे घेतली तर अधिक परिणामकारक ठरतात. आजार लवकरात लवकर बरा होण्यास मदत होते. त्यामुळे मेंदूशी संबंधित विविध आजारासाठी रुग्णांनी नाकावाटे औषधे घेण्यास प्राधान्य देणे आवश्यक आहे,” असे मत मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी येथील विभागप्रमुख प्रा. डॉ. अविनाश टेकाडे यांनी व्यक्त केले.
मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाच्या वतीने एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या सभागृहामध्ये ‘मज्जासंस्था व आधुनिक उपचारपद्धती’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार सराफ, उपाध्यक्ष डॉ. नीलिमा राजुरकर, विनय र.र, दीपाली अकोलकर, अशोक तातुगडे, डॉ. सुजाता बरगले आदी उपस्थित होते.
डॉ. अविनाश टेकाडे म्हणाले, “मज्जासंस्थेशी संबंधित आजारांवर उपचार करण्यासाठी नवनवीन प्रणाली विकसित होत आहेत. तंत्रज्ञानाचा त्यामध्ये उपयोग होत आहे. नाकावाटे औषधे घेतल्यास अडथळ्याविना थेट केंद्रीय मज्जासंस्थेपर्यंत पोहचतात आणि याचे विपरीत परिणामही होत नाहीत. रुग्ण लवकर बरा होतो. भविष्यात मेंदूचे आजार होऊ नयेत, यासाठी योगा, व्यायाम, चालणे, सायकलिंग आदी गोष्टींचा वापर करणे गरजेचे आहे.”
मज्जासंस्थेशी संबंधित आजारांविषयी डॉ. टेकाडे यांनी माहिती देत उपस्थितांच्या मनातील अनेक शंकाचे निरसन केले. सुत्रसंचलन नीलिमा राजुरकर यांनी केले. डॉ. सुजाता बरगले यांनी आभार मानले.