दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थिनींना शैक्षणिक शिष्यवृत्ती; आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला दिवाळीची साडी-चोळी भेट
पुणे, दि. ७ नोव्हेंबर : राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या ऐतिहासिक लाल महालात सलग अकराव्या वर्षी दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दीपोत्सवाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थिनींना शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. तसेच जुन्नर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी स्मृतीशेष तानाजी मिंधे यांच्या कुटुंबातील सदस्यांना दिवाळीनिमित्त साडी-चोळी भेट देऊन त्यांच्या दुःखात सहभागी होत मदतीचा आणि आपुलकीचा हात पुढे करण्यात आला.
अखिल भारतीय शिवमहोत्सव समिती, राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशन, अखिल शिवाजीनगर गावठाण शिवमहोत्सव समिती आणि समस्त शिवप्रेमी नागरिकांच्या संयुक्त विद्यमाने या दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
दीपोत्सवाच्या निमित्ताने ऐतिहासिक लाल महाल परिसरात महात्मा फुले यांच्या 200 व्या जयंती निमित्ताने त्यांना अभिवादन करणारी रांगोळी नानासाहेब कदम व ज्योती कदम या दाम्पत्याने तसेच सौ. शीतल संदीप भावसार आणि कु. श्रुती संदीप भावसार या मायलेकींनी आकर्षक व सुबक रांगोळी साकारून दीपोत्सवाची शोभा वाढवली. त्यांच्या कलात्मक योगदानामुळे संपूर्ण लाल महालात उत्सवी आणि प्रसन्न वातावरण निर्माण झाले.
दीपोत्सवाच्या माध्यमातून केवळ ऐतिहासिक वास्तूला दीपप्रज्वलनाने उजळविणे एवढाच उद्देश न ठेवता, समाजातील गरजू घटकांच्या जीवनात शिक्षण आणि माणुसकीचा प्रकाश पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थिनींच्या शिक्षणाला आर्थिक हातभार लावून त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला प्रोत्साहन देण्यात आले. तर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला दिवाळी भेट देत सामाजिक संवेदनशीलतेचे दर्शन घडविण्यात आले.
या कार्यक्रमाला ॲड मिलिंद पवार सर, विरोधी पक्ष नेते निलेश निकम, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते विकास पासलकर, दुबई येथील उद्योजक आयुब भाई, अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीचे विराज तावरे, संभाजी ब्रिगेडचे प्रशांत धुमाळ, राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनचे कैलास वडघुले,इतिहास संशोधक डॉ श्रीमंत कोकाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सचिन जोशी, निखिल भसमारे जयंत गायकवाड आणि सचिन कदम यांनी विशेष परिश्रम घेतले.
इतिहासाचा अभिमान, संस्कृतीचा सन्मान आणि सामाजिक बांधिलकीचा वसा जपत लाल महाल दीपोत्सवाने यंदाही माणुसकीचा दीप प्रज्वलित केला.

