माझी भाषा-भविष्याची भाषा’ पुस्तकाचे प्रकाशन
पुणे-मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी दिले जाणारे ‘मराठी रत्न’ पुरस्कार यंदा श्री. आनंद अंतरकर (हंस, मोहिनी व नवल), श्री. आनंद आगाशे (मेनका, माहेर व जत्रा) आणि श्री. विजय लेले (किर्लोस्कर, स्त्री, अपूर्व, मनोहर, किस्त्रीम व बालवाडी) या संपादकांना देण्यात येणार आहे. गुरुवार, दि. 27 फेब्रुवारी 2020 रोजी सायंकाळी 5.30 वाजता निवारा हॉल, नवी पेठ, पुणे येथे हा कार्यक्रम आयोजिला आहे. पाच हजार रुपये रोख, पुणेरी पगडी, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. तसेच पत्रकार श्री. देविदास देशपांडे यांच्या ‘माझी भाषा भविष्याची भाषा’ या पुस्तकाचे प्रकाशनही याप्रसंगी होईल. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व गांधीवादी विचारवंत श्री. उल्हास पवार कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण प्र. वाळिंबे यांनी दिली.
महाकवी कुसुमाग्रज यांच्या 27 फेब्रुवारी या जन्मदिनी साजरा होणाऱ्या जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठानतर्फे गेली अनेक वर्षे ‘मराठी रत्न’ पुरस्कार साहित्यिक, संपादक, पत्रकार, कवी आदींना दिले जातात. मराठी वाचन संस्कृती कमी होत असतानाही अत्यंत चिकाटीने मराठी मासिक/ दिवाळी अंक/ वार्षिक यांचे सातत्याने प्रकाशन करणाऱ्या संपादकांचा ‘मराठी रत्न’ पुरस्कार देऊन यावर्षी प्रातिनिधीक गौरव करण्यात येणार आहे.
श्री. आनंद अंतरकर (वय 79 वर्षे) वडील कै. अनंत अंतरकर यांच्या ‘हंस प्रकाशन’ या संस्थेत नियतकालिकांच्या संपादनाची उमेदवारी वयाच्या 18 व्या वर्षापासून सुरू केली. वडिलांच्या निधनानंतर वयाच्या 24व्या वर्षापासून ‘हंस’, ‘मोहिनी’ व ‘नवल’ मासिकांचे संपादक म्हणून काम सुरू केले. संपादनाबरोबरच कथा, इंग्रजी कथांचे अनुवाद व ललितलेखन इत्यादींचे लेखन. ‘झुंजुरवेल’ (राज्य पुरस्कार), ‘रत्नकीळ’ (मृण्मयी पुरस्कार), छायानट (राज्य पुरस्कार) व घुमर यांसह आठ पुस्तके प्रकाशित. जी. ए. कुलकर्णी यांच्या पत्रव्यवहारावर आधारित ललितकृती (एक धारवाडी कहाणी) नुकतीच प्रकाशित. पन्नास वर्षांपूर्वी 1970 मध्ये ‘विश्वमोहिनी’ प्रकाशन संस्था काढून आतापर्यंत सुमारे 150 ललित पुस्तकांचे प्रकाशन.
श्री. आनंद आगाशे दहा वर्षांपूर्वी पत्रकारितेतील नोकरी सोडून मीडिया नेक्स्ट प्रा. (लि.) ही कंपनी स्थापन केली. या कंपनीतर्फे मेनका प्रकाशन ही संस्था विकत घेतली. या कंपनीचे ते अध्यक्ष आहेत. माहेर, मेनका आणि जत्रा या मासिकांना नवे रूप देऊन यशस्वी, दमदार वाटचाल सुरू. त्यासोबत विविध विषयांवरच्या अग्रगण्य पुस्तकांचे प्रकाशन. अनेक मराठी व इंग्रजी पुस्तकांचे अनुवाद व प्रकाशन केले. यापूर्वी मराठी आणि इंग्रजी पत्रकारितेत देशातील आघाडीच्या वृत्तपत्रांत 30 हून अधिक वर्षांचा अनुभव. पुणे, मुंबई, दिल्ली आणि गोवा येथे विविध पदांवर काम. त्यामध्ये – सकाळ माध्यम समूहाचे संचालक संपादक, गोमंतक आणि गोमंतक टाईम्सचे मुख्य संपादक, लोकसत्ताचे निवासी संपादक, टाइम्स ऑफ इंडियाचे ब्यूरो चिफ, इंडियन एक्सप्रेसचे विशेष प्रतिनिधी आणि मुख्य वार्ताहर, द इंडिपेंडंटचे विशेष प्रतिनिधी आणि केसरीचे उपसंपादक म्हणून काम पाहिले.
श्री. विजय लेले (वय 68 वर्षे) गेली 20 वर्षे अपूर्व पब्लिकेशन्स (प्रा.) लि. चे व्यवस्थापकीय संचालक व संपादक. किर्लोस्कर, स्त्री, अपूवर्र् मासिक तसेच किस्त्रीम, मनोहर आणि बालवाडी वार्षिक अंकांचे मुख्य संपादक म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांनी दै. तरुण भारत व दै. केसरी मध्ये वार्ताहर व उपसंपादक म्हणून 45 वर्षांपूर्वी पत्रकारितेच्या कारकीर्दीला सुरुवात केली. वास्तू उद्योगचे संपादक, संपदा, पिंपरी उद्योग, प्रगती पंचायत, स्पन पाईप या मासिकांचे कार्यकारी संपादक, हाकारा मासिकाचे मानद संपादक, अपराध, पाठलाग, भावना, धनंजय, योगसिद्धी या मासिकांचे सल्लागार संपादक या जबाबदाऱ्या त्यांनी दीर्घकाळ पार पाडल्या. तसेच नवी दिल्ली, सारणपूर, भोपाळ, अहमदाबाद, पणजी, हैद्राबाद, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर व अकोला येथील प्रमुख दैनिकांच्या व्यापारी प्रतिनिधीपदी यांनी प्रदीर्घकाळ काम पाहिले. पुणे व सोलापूर येथे पत्रकारिता व व्यवस्थापन या क्षेत्रातील विविध संस्थांमध्ये व्याख्याते म्हणून त्यांनी भरीव कामगिरी केली.
पत्रकार श्री. देविदास देशपांडे यांनी दैनिक लोकसत्ताच्या संकेतस्थळावरे भाषिक घडामोडीसंदर्भात सुमारे वर्षभर ब्लॉग लिहिले. मराठी भाषेच्या संदर्भात अन्य भाषांबद्दल केलेल्या या लिखाणासाठी त्यांचा महाराष्ट्र सरकारने मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘सोशल मिडीया पत्रकारिता’ पुरस्कार देऊन गौरव केला. या लेखांसोबतच भाषांच्या संदर्भातील लेखांचा संग्रह असलेले ‘माझी भाषा-भविष्याची भाषा’ हे पुस्तक वाळिंबे प्रकाशनतर्फे प्रकाशित करण्यात येत आहे. यापूर्वी ‘मराठी रत्न’ पुरस्काराने ते सन्मानित झाले आहेत. त्यांना पत्रकारितेतील दीड दशकांहून अधिक अनुभव असून बीबीसी, रेडिफ, याहू तसेच ‘ल मॅग आयटी’ फ्रेंच संकेतस्थळांसाठी काम केले आहे. ते अनुवादक म्हणूनही कार्य करतात आणि त्यांना सहा भारतीय भाषा अवगत आहेत. सध्या ते ‘एकता’ मासिकाचे सहसंपादक आहेत.