ऍक्युपंक्चर उपचार पद्धतीला जगभरात मान्यता- डॉ. रुमी बेरामजी
स्वास्थ्य संतूलन मेडिकेअरतर्फे ऍक्युपंक्चर समिट
पुणे : “विविध प्रकारच्या आजारांवर ऍक्युपंक्चर उपचार पद्धती प्रभावी ठरत आहे. शारीरिक व्याधींची योग्य ‘नस’ पकडून उपचार करणारे हे शास्त्र आहे. या शास्त्राला जगभरात मान्यता असून, केंद्र सरकारनेही ऍक्युपंक्चरला वैद्यकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी ही वैद्यकीय उपचार पद्धती वरदान ठरेल,” असे प्रतिपादन महाराष्ट्र ऍक्युपंक्चर कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. रुमी बेरामजी यांनी केले.
स्वास्थ्य संतूलन मेडिकेअरतर्फे नीतू मांडके सभागृहात आयोजित झोनल ऍक्युपंक्चर समिटमध्ये ऍक्युपंक्चरला वैद्यकीय मान्यता मिळाल्याबद्दल डॉ. बेरामजी यांच्यासह अन्य सदस्यांचा सत्कार करण्यात आला. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव डॉ. विकास आबनावे, सुमंत घैसास, डॉ. हेमंत ठक्कर, स्वास्थ्य संतुलनच्या प्रमुख आणि समिटच्या संयोजिका डॉ. सुमिता सातारकर, मंधुमिता सुखात्मे आदी उपस्थित होते.
डॉ. रुमी बेरामजी म्हणाले, “ऍक्युपंक्चर शास्त्रात अभ्यास आणि सरावाने आपण पारंगत होऊ. वेदनामुक्ती करणाऱ्या या शास्त्रात भरपूर संधी आहेत. वैद्यकीय मान्यतेमुळे ऍक्युपंक्चरला विश्वासार्हता येईल. विविध आजारांवर हे उपचार प्रभावी ठरावेत, यासाठी संशोधन होत राहणे गरजेचे आहे.”
मुक्ता टिळक म्हणाल्या, “आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ऍक्युपंक्चर उपचार पद्धतीचा वापर व्हावा. दिवसेंदिवस उद्भवणारे नवे आजार ऍक्युपंक्चरने नियंत्रणात येतील का, याचा विचार व्हावा. पालिकेच्या वतीने केलेल्या दंत, नेत्र व हिमोग्लोबिन तपासणीत अनेक गोष्टींचा अभाव जाणवला. अशा आजारांवर ऍक्युपंक्चरने मात करता आली, तर सर्वसामान्यांना परवडेल, अशा दरात उपचार उपलब्ध होतील.”
डॉ. विकास आबनावें म्हणाले, “लोकांचा ऍक्युपंक्चरवर विश्वास आहे. त्यामुळे शासनमान्यता हा औपचारिक भाग आहे. ऍक्युपंक्चर हे भारताचे एक परिपूर्ण शास्त्र आहे. रोग-भोग-योग या त्रिकोणात माणूस अडकतो व व्याधींनी ग्रासतो. त्यावर ऍक्युपंक्चर हा उत्तम उपाय आहे.”
डॉ. सुमिता सातारकर प्रास्ताविकात म्हणाल्या, “ऍक्युपंक्चर, एक्युप्रेशर उपचारपद्धती लोकप्रिय आणि प्रभावी होत आहे. सुरुवातीच्या काळात मला हे शिकताना त्रास झाला. पण चिकाटीने हे शिकून घेतले. कालांतराने लोकांमध्ये जागृती झाली आणि त्याला प्रतिसादही मिळायला लागला. आता मान्यता मिळाल्याने आणखी जोमाने काम करू.”
डॉ. सुमंत घैसास, मधुमिता सुखात्मे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. आनंद बापट यांनी आभार मानले.