सणासुदीत पुणेकरांना दिलासा
स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती
पुणे, ता. २९ : दिवाळीच्या सणासुदीत पुणेकरांची पाण्यासाठी गैरसोय होऊ नये, यासाठी दर गुरुवारी करण्यात येणारी पाणी कपात दिवाळीच्या काळात रद्द करण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे दिवाळीत गुरुवारीही शहराचा पाणीपुरवठा सुरू राहणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन महापालिकेने पाणी बचतीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पाण्याचा काटकसरीने वापर करून उपलब्ध साठ्याचे नियोजन करण्यावर प्रशासनाचा भर आहे.
मात्र, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घरांची स्वच्छता, फराळाची तयारी, पाहुण्यांची वर्दळ आणि इतर कारणांमुळे पाण्याची मागणी वाढते. अशा परिस्थितीत गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहिल्यास नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता होती. त्यामुळे दिवाळीच्या काळात गुरुवारची पाणी कपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

