लोकबिरादरी मित्रमंडळ ट्रस्ट पुणे, राष्ट्रीय सेवा योजना, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि स. प. महाविद्यालयातर्फे आयोजन
पुणे : लोकबिरादरी मित्र मंडळ ट्रस्ट, पुणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि शिक्षण प्रसारक मंडळीचे स. प. महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पुन्हा एकदा ‘आठवणींचं पुणं…सायकलींचं पुणं’ या संकल्पनेवर आधारित ‘पुणे सायक्लोथॉन-२’ चे आयोजन करण्यात आले आहे. पुणे सायक्लोथॉनचे हे दुसरे वर्ष असून, रविवार, दि. ७ ऑक्टोबर २०१८ रोजी सकाळी ६.३० ते ९.३० या वेळेत होणार आहे.
टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालयाच्या आवारातून या सायक्लोथॉनला सुरुवात होणार आहे. या रॅलीमध्ये लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसाचे संचालक अनिकेत आमटे व समीक्षा आमटे, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांची विशेष उपस्थिती असणार आहे, अशी माहिती लोकबिरादरी मित्र मंडळ ट्रस्ट पुणेचे अध्यक्ष शिल्पा तांबे व उपाध्यक्ष योगेश कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रोफेशनल आणि हौशी सायकलिंग ग्रुप्स, शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग, पोस्टमन, सीए, डॉक्टर्स, व्यावसायिक व नोकरदार अशा सर्वच वर्गातील लोक या सायक्लोथॉनमध्ये सहभागी होत आहेत. यंदाचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे पुण्यातील अनेक कॉर्पोरेट कंपन्यांनीही सहभागाची तयारी दर्शवलेली आहे. ही सायकल रॅली २१ किलोमीटर, १० किलोमीटर आणि ५ किलोमीटर अशा तीन प्रमुख मार्गांमध्ये विभागण्यात आली आहे.
पहिला मार्ग (२१ किलोमीटर) स. प. महाविद्यालयापासून संभाजी पूल, फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे विद्यापीठ रस्ता, बावधन, चांदणी चौक, पौड रस्ता, कर्वे रस्ता, संभाजी पूल, स. प. महाविद्यालय असा आहे. दुसरा मार्ग (१० किलोमीटर) स. प. महाविद्यालयापासून निघून संभाजी पूल, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता पुणे विद्यापीठ रस्ता, चतुःशृंगी मंदिर, सेनापती बापट रस्ता, लॉ कॉलेज रस्ता, कर्वे रस्ता, संभाजी पूल, स. प. महाविद्यालय असा आहे. तर तिसरा ५ किलोमीटरचा मार्ग स. प. महाविद्यालयापासून निघून संभाजी पूल, भांडारकर रस्ता, लॉ कॉलेज रस्ता, कर्वे रस्ता, स. प. महाविद्यालय असा आहे.
‘सायकलींचे पुणे’ अशी ओळख असलेल्या पुण्यात पुन्हा सायकली धावाव्यात व पर्यावरण रक्षणासाठी आपले योगदान द्यावे, या उद्देशाने शहरातील प्रमुख शाळा-महाविद्यालयातून सर्वच विद्यार्थी यामध्ये सहभागी होत आहेत. विशेष संदेश घेऊन येणारे ग्रुप्स, ज्येष्ठ नागरिक, नोकरदार, सर्वात छोटा सायकलस्वार अथवा सर्वात मोठा गट अश्या काही विशेष सहभागाचे कौतुक यावेळी केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना यामध्ये मोफत सहभागी होता येणार असून, इतरांसाठी रुपये १०० इतके देणगी शुल्क असणार आहे, असे शिल्पा तांबे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत मंडळाचे विश्वस्त नितीन पवार, ऐश्वर्या चपळगावकर, राहुल कुलकर्णी तसेच शिल्पा टेंबेही उपस्थित होते.
अधिक माहितीसाठी शिल्पा तांबे (९२२६९५८८८८) आणि योगेश कुलकर्णी (९८२२२७३५४५) या क्रमांकावर संपर्क करावा. ऑनलाइन नोंदणीसाठी www.lokbiradari.deazzle.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.
लोकबिरादरी मित्रमंडळ ट्रस्ट, पुणेविषयी :
डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी यांच्या सामाजिक कार्यातून प्रेरित झालेले लोकबिरादरी मित्रमंडळ ट्रस्ट, पुणे हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाच्या कामाचा प्रसार करण्याबरोबरच पुणे स्थानिक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये देणे समाजाचे ही भावना निर्माण करीत आहे. २०११ पासून संस्थेने अनेक उपक्रम राबविले आहेत. त्यामध्ये वाहतूक जनजागृती, गरिबांसाठी कपड्यांचे संकलन, प्राण्यांसाठी फन फेअर विथ पॉंज अँड टेल्स, आंबेगाव तालुक्यातील आदिवासी, कातकरी मुलींना प्रशिक्षण असे विविध उपक्रम राबविले जात आहेत. अश्या उपक्रमांच्या निमित्ताने जास्तीत जास्त युवकांच्या सहभगाला प्रोत्साहन देणे, त्यांच्यातील विशेष क्षमतांना व्यासपीठ देणे, युवकांच्या व्यक्तिमत्व विकासाला वाव देणे आणि त्यांच्याच समाजोपयोगी कल्पनांना मूर्त रूप देणे हे लोक बिरादरी मित्रमंडळ पुणे ची उद्दिष्टे आहेत.