पुणे- मराठा आरक्षणाचा विषय कोर्टात आणि रस्त्यांवर गाजत असताना ,भाजपाने आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मराठी नेत्यांसह मराठी महिला नेत्यांचीही साखळी तयार केली असून आता त्यात पुण्याच्या वर्षा तापकीर यांची भर पडली आहे. बीड च्या प्रीतम मुंडे नाशिकच्या भारती पवार आणि त्यानंतर मुंबईच्या चित्रा वाघ यांच्या नंतर आता पुण्याच्या वर्षा तापकीर अशी साखळी आगामी महापालिका निवडणुकीत भाजपवरील उच्चवर्णीयांचा पक्ष हा ठपका पुसून तमाम मराठी वर्गाला खेचून घेण्यात यशस्वी कामगिरी करेल असा विश्वास भाजपच्या नेतृत्वाला वाटत असावा असे राजकीय समीक्षकांचे म्हणणे आहे.
राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात सातत्याने आपला विजय प्रस्थापित ठेवलेल्या नगरसेविका वर्षा तापकीर यांच्यावर भाजपा प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविल्याने अनेकांना धक्का बसला ,खरे तर त्या महापौर , स्थायी अध्यक्ष अशा पदांच्या शर्यतीत कायम होत्या पण ती पदे त्यांना मिळाली नाही आणि आता थेट भाजपा प्रदेश उपाध्यक्ष पदाची माळ गळ्यात पडल्याने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची पावले अनेकांना समजेनासी झाली आहे. उपाध्यक्ष पदाची माळ यापूर्वी माजी खासदार संजय काकडे यांच्या गळ्यात घातलेली आहेच . अर्थात या निवडी म्हणजे भाजपने आगामी महापालिका निवडणुकीची केलेली सुरुवातच मानली जाते आहे. काकडे आणि तापकीर हे दोघेही मराठा समाजाचे आहेत . काकडे यांनी शहरातील मराठा,बहुजन समाज आपल्याकडे आकर्षित करून ठेवलेला आहे तर आता दक्षिण पुण्यासह तमाम पुणे शहरातील मराठा महिलांचीही मते आकर्षित करण्यासाठी आपले कसब तापकीरांना दाखवावे लागणार आहे. केवळ त्या आता त्यांच्या वार्डापुरत्या मर्यादित राहू शकणार नाहीत तर त्यांच्याकडे प्रामुख्याने दक्षिण पुणे आणि शहरातील महापालिका निवडणुकीत निवडून येणाऱ्या चेहऱ्यांना ओळखून त्यांना उमेदवारी मिळवून देण्याची जबाबदारी देखील असेल असे दिसते आहे .भाजपच्या त्या १४ व्या उपाध्यक्ष असून अनेक मराठी, बहुजन कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यासाठी त्यांची भूमिका महत्वपूर्ण ठरू शकते . प्रदेश उपाध्यक्ष पदावरून च भाजपच्या कोअर कमिटीत समावेश झालेला आहे. त्यामुळे गेली १५ वर्षे नगरसेविका राहिलेल्या तापकीर यांना आगामी महापालिका निवडणुकीत महत्वाची संधी चालून आल्याचे मानले जाते आहे . दक्षिण पुण्यातील कोण कोण भाजपच्या कमळ चिन्हावर निवडून येऊ शकते याबाबत तर त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरू शकणार आहे. एकूण शहरातील महिला आणि मराठा ,बहुजन उमेदवारीबाबत हि त्यांचा रोल महत्वाचा मानला जाऊ शकणार आहे. भाजपच्या आमदारांच्या चढाओढीत तापकीर आणि काकडे या दोहोंचीदेखील भूमिका पक्षाला डावलून चालणार नाही हेच या निवडीमागचे द्योतक मानले जाते आहे.