पुणे, दि. 4 – कोरोना, रशिया-युक्रेनचे युद्ध, वाढती महागाई, चीनमधील ताळेबंदी अशा जागतिक महासंकटात अमेरिका, चीनसह युरोपीय देशांची अर्थव्यवस्था मंदीच्या सावटाखाली असताना भारतीय अर्थव्यवस्था संतुलित, स्थिरता देणारी, गतीमान, महागाईचा दर कमी करणारी आणि उच्च दर्जाच्या रोजगारांच्या संधी निर्माण करून देणारी असल्याचा विश्वास मत माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी व्यक्त केला.
बीजेपी इन्फ्रास्क्चर आणि बीजेपी बीझनेस सेल यांच्या वतीने केंद्रीय अर्थसंकल्प 2023 या विषयावरील चर्चा सत्रानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परीषदेत सिन्हा बोलत होते. शहर भाजपचे संघटन चिटणीस, दीपक नागरपुरे, मंदार देवगावकर, अमृता देवगावकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
सिन्हा पुढे म्हणाले, ”सध्या भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पनाच्या (जीडीपी) 7 टक्के इतका आहे. जागतिक मंदीचे संकट लक्षात घेवून, पुढील सहा महिन्यांत तो साडे सहा टक्क्यांवर येईल असा अंदाज व्यक्त केला जातो. मात्र वेगाने वाढत असलेल्या भारतीय अर्थ व्यवस्थेचा विचार करता हा दर आठपर्यंतही जाऊ शकतो.”
सिन्हा म्हणाले, ”अमृत काळातील हा अर्थसंकल्प देशाला स्थैर्य देणारा आहे. शिक्षण, संशोधन, विज्ञान, आरोग्य आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. प्रत्यक्ष कराचे सुलभीकरण करण्यात आले आहे. प्राप्तीकर आकारण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कर प्रणालीचा नागरिकांना फायदा होणार आहे. यंदाचा अर्थसंकल्प सर्व घटकांसाठी संतुलित आणि देशाला प्रगतिपथावर नेणारा आहे. शेती, सहकार, वंचित, शोषित, आदिवासी, युवक, लघु व मध्यम उद्योग, हरित विकास, आर्थिक क्षेत्र, रेल्वे महामार्गासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.”