Home Blog Page 714

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

0

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

मुंबई, दि. ९ : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी  लालबाग राजा गणेशोत्सव मंडळ येथे भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी लालबाग राजा गणेशोत्सव ट्रस्टच्या वतीने श्रीगणेश प्रतिमा, पुष्पगुच्छ, श्रीफळ तसेच शाल देऊन  श्री.शहा यांचे स्वागत केले.

यावेळी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार आशिष शेलार, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री विनोद तावडे हे उपस्थित होते.

०००

शरद पवार नात, जावयासह लालबाग राजाच्या दर्शनाला

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी आपले जावई व नातीसह लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. पवारांनी यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना लालबागच्या राजाचे दर्शन घेतले होते. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी ते त्यांच्या चरणी लीन झाले हे विशेष.

राज्यात गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. गणेशभक्त आपल्या बाप्पाच्या भक्तीरसात आकंठ बुडालेत. मुंबईतही विविध गणेश मंडळांच्या गणरायांच्या दर्शनासाठी भाविकांची रिघ लागली आहे. विशेषतः लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी झाली आहे. त्यातच शरद पवार सोमवारी सकाळी आपले जावई सदानंद सुळे व नात रेवती सुळे यांच्यासह लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचले. लालबागचा राजा हा नवसाला पावणारा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे शरद पवारांनी लालबागच्या राजाकडे कोणते साकडे घातले असेल? याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

शरद पवारांनी यापूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना लालबागच्या राजाचे दर्शन घेतले होते. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी ते सोमवारी लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचले. कोरोना महामारीच्या काळात लालबाग राजाच्या मंडळाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यावेळी शरद पवारांनी या शिबिराला भेट दिली होती. पण त्यावर्षी कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे मंडळातर्फे गणपतीची स्थापना करण्यात आली नव्हती. तेव्हा फक्त रक्तदान शिबिर घेण्यात आले होते.

सुरतच्या गणेश मंडपावर दगडफेक, 33 जणांना अटक

0

सुरत-लालगेट भागात गणेश उत्सवादरम्यान रविवारी रात्री उशिरा ६ तरुणांनी मंडपावर दगडफेक केली. याच्या निषेधार्थ हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले.दगडफेक करणाऱ्या सहाही जणांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय दगडफेकीच्या घटनेचे समर्थन करणाऱ्या 27 जणांनाही अटक करण्यात आली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अटक करण्यात आलेले लोक इतर धर्माचे आहेत, लोकांच्या निषेधाला रात्री उशिरा हिंसक वळण लागले. दोन्ही धर्माच्या लोकांमध्ये हाणामारीही झाली. वाहनांची तोडफोड करून जाळपोळ करण्यात आली.शांततेचे आवाहन करण्यासाठी आलेल्या स्थानिक आमदार कांती बलार आणि पोलिसांशीही बाचाबाची झाली. डीसीपी विजय सिंह गुर्जर आणि त्यांच्यासोबत असलेले आणखी एक पोलिस अधिकारी जखमी झाले.रात्री उशिरा पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केला. अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या. सुरतमध्ये सुमारे 1000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी 35 आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

सुझलॉनला भारतातील सर्वात मोठी ११६६ मेगावॅट पवन ऊर्जा ऑर्डर मिळाली

 एनटीपीसीची नूतनीकरणीय ऊर्जा कंपनी एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेडकडून ऑर्डर मिळाल्याची घोषणा

पुणे,: नूतनीकरणीय ऊर्जा सुविधा पुरवणारी भारतातील सर्वात मोठी कंपनी, सुझलॉन ग्रुपने आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या तिमाहीमध्ये दमदार कामगिरी बजावल्यानंतर, आता भारतातील सर्वात मोठी पवन ऊर्जा ऑर्डर मिळाली असल्याची घोषणा केली आहे. ११६६ मेगावॅटची ही ऑर्डर एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेडकडून (भारतातील सर्वात मोठा ऊर्जा उद्योग समूह एनटीपीसी लिमिटेडची नूतनीकरणीय ऊर्जा कंपनी) मिळाली असल्याची घोषणा सुझलॉनने केली आहे. या ऑर्डरनुसार सुझलॉन एस१४४ चे एकूण ३७० विंड टर्बाईन जनरेटर्स (डब्ल्यूटीजी) इन्स्टॉल करेल. त्यासोबत एक हायब्रिड लॅटिस टुब्यूलर (एचएलटी) असेल. गुजरात राज्यामध्ये एनटीपीसी रिन्यूएबल्स एनर्जी लिमिटेडच्या (एनजीईएलची संपूर्ण मालकीची उपकंपनी) दोन प्रकल्पांमध्ये प्रत्येकी आणि इंडियन ऑइल एनटीपीसी ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचा एक प्रकल्प (एनजीईएलची समूह कंपनी) यांची ३.१५ मेगावॅट क्षमता असणार आहे. या ऑर्डरमुळे आता सुझलॉनचे सर्वात मोठे ऑर्डर बुक ३ सप्टेंबर २०२४ रोजी ५ गिगावॅटवर जाऊन पोहोचले आहे.

सुझलॉन ग्रुपचे उपाध्यक्ष श्री गिरीश तंती म्हणाले, देशातील सर्वात मोठी पवन ऊर्जा ओईएम या नात्याने आम्हाला भारतातील सर्वात मोठी ऊर्जा कंपनी एनटीपीसी लिमिटेडची नूतनीकरणीय ऊर्जा कंपनीएनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेडसोबत सहयोग करताना अतिशय आनंद होत आहेहा सहयोग एक महत्त्वाचा टप्पा असून भारतात घडून येत असलेल्या नूतनीकरणीय ऊर्जा परिवर्तनाचा वेग वाढवण्याप्रती आमची बांधिलकी त्यामुळे अधिक दृढ झाली आहेएनजीईएलकडून आम्हाला मिळालेली ही पहिली थेट पवन ऊर्जा ऑर्डर आहेज्यामुळे सुझलॉनने पीएसयू ग्राहक विभागात विजयी पुनरागमन केले आहे.

हा प्रकल्प गुजरात राज्यात एक पीएसयूमार्फत उभारला जात असलेला सर्वात मोठा पवन ऊर्जा उपक्रम ठरणार आहेत्यामुळे नूतनीकरणीय ऊर्जा क्षेत्रात गुजरात राज्याची आघाडी अधिक मजबूत होणार आहेहा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर भविष्यातील प्रकल्पांसाठी एक नवा मापदंड ठरेलभारताच्या ऊर्जा आत्मनिर्भरतेमध्ये लक्षणीय योगदान देईलआर्थिक सुबत्ता आणेल२०३२ सालापर्यंत ६० गिगावॅट नूतनीकरणीय ऊर्जा क्षमता वाढवण्याचे एनजीईएलचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट पूर्ण करण्यात या प्रकल्पाची भूमिका खूप मोलाची असणार आहे.” 

भाजपच्या आमदारांनी केलेल्या कामाचे श्रेय आ.चेतन तुपे लाटत असल्याचा आरोप

पुणे-पुण्यात भाजपच्या आमदारांनी केलेल्या कामाचे श्रेय अजित पवार गटातील आमदार चेतन तुपे करत असल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. हडपसर येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार चेतन तुपे यांच्यावर तीव्र नाराजी दर्शवण्यासाठी मांजरी उड्डाणपुलाच्या नामफलकास काळे फासत आंदोलन केले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदाराने महायुतीचा धर्म पाळला नसल्याने निषेध व्यक्त करण्यात आला आहे. भाजप आंदोलक पालकमंत्री अजित पवारांना निवेदन देऊन नाराजी व्यक्त करणार असल्याचे शिवराज घुले यांनी सांगितले आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघात पेयजल योजना, रेल्वे उड्डाणपूल व मांजरी नदी उड्डाणपूल यासाठी योगेश टिळेकर यांच्या पाठपुराव्यामुळे निधी मिळाला, मात्र विद्यमान राष्ट्रवादीचे आमदार भाजपच्या पदाधिकाऱ्यांना डावलत श्रेय लाटत आहेत, असा आरोप शिवराज घुले यांनी केला आहे.

मांजरी उड्डाणंपुलासाठी सुमारे 23 कोटी रुपये मंजूर असताना केवळ 14 कोटी 60 लाख रुपये खर्च करून बाकीचा निधी परत पाठवला. विद्यमान आमदाराच्या हस्तक्षेपामुळे पुलाचे रुंदी व उंची कमी झाल्याने भविष्यात वाहतुककोंडीचा धोका निर्माण होईल असा आरोप नगरसेवक बाळासाहेब घुले यांनी केला आहे.

दरम्यान, अजित पवार महायुतीत सामील झाले. वरिष्ठ पातळीवर नेत्यांचे मनोमिलनही झाले. मात्र, स्थानिक पातळीवर अजूनही अजित पवार यांच्या नेत्यांमध्ये आणि भाजप , शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संघर्ष सुरु आहे. आम्ही राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसतो, पण बाहेर आल्यानंतर उलटी येते, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी मंत्री तानाजी सावंत यांनी केले होते. त्यानंतर भाजपच्या तसेच शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी देखील राष्ट्रवादी कॉंग्रेसवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत काय चित्र दिसते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारी शाळांमध्ये ५०० रुपये रोजंदारीवर कंत्राटी शिक्षक भरतीच्या निर्णयाला आम आदमी पार्टीचा विरोध.

पुणे-वीस किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये निवृत्त शिक्षक किंवा डीएड, बीएड पात्रताधारकांची दरमहा १५ हजार वेतनावर कंत्राटी नियुक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
या निर्णयामुळे राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळांचे नुकसानच होणार असल्याची टीका आप पालक युनियन व आम आदमी पार्टी ने केली असून, शिक्षण विभागाने तातडीने निर्णय मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

राज्यात सन २०२१-२२च्या आकडेवारीनुसार २०पेक्षा कमी पटसंख्येच्या सुमारे १४ हजार ७८३ शाळा सुरू असून त्यामध्ये १ लाख ८५ हजार विद्यार्थी शिकत आहेत. दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचावी यासाठी सरकारने या शाळा सुरू केल्या होत्या. यातून शिक्षणाचे सार्वत्रीकरण करण्याचा प्रयत्न होता.

परंतु सरकारचा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक आणि सेवानिवृत्त शिक्षक नियुक्तीचा निर्णय हा लाखो पात्रता धारकांसाठी अत्यंत उद्वेगजनक आहे. केवळ १५००० पगारावर म्हणजे ५०० रू रोजंदारीवर या उमेदवारांना काम करायला लावून त्यांचे आर्थिक शोषण केले जाईल. तसेच वयाच्या सत्तरीपर्यंत निवृत्त शिक्षकांना काम देऊन बेरोजगार तरुणांवर अन्याय केला जाणार आहे. त्यामुळे आम्ही याचा विरोध करतो असे आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांनी म्हटले आहे.

तसेच कमी पटसंख्या असलेल्या शाळांना दुर्लक्षित करून ‘ गरिबांना सुविधा पण गरीबच ‘ असे धोरण सरकार अवलंबते आहे. निवृत्त व कंत्राटी शिक्षक हे पटसंख्या वाढवण्यासाठी काम करणार नाहीत. त्यांचे उत्तरदायित्व हे मर्यादित असेल. त्यामुळे महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्राला हे अत्यंत धोकादायक धोरण आहे अशी प्रतिक्रिया मुकुंद किर्दत यांनी दिली आहे

मिळणार ‘बॅक टू स्कूल’च्या आठवणींना उजाळा

शाळा या शब्दाभोवती प्रत्येकाच्या आठवणींचे छोटेसे एक विश्व उभे राहाते. प्रत्येकाला शाळेच्या आठवणी फार प्रिय असतात. पुन्हा एकदा या आठवणींना उजाळा देणारा ‘बॅक टू स्कूल’ हा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी ‘बॅक टू स्कूल’ आता सज्ज झाला आहे. २८ नोव्हेंबरला हा चित्रपट महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या राज्यांसह अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर या देशांमध्येही प्रदर्शित होणार आहे. सौरभ गोखले, निशिगंधा वाड, स्नेहा चव्हाण, सुरेश विश्वकर्मा, श्वेता पगार, आधिश पायगुडे, विपीन बोराटे, चंद्रकांत कुऱ्हाडे, सोमनाथ रसाळ, नितीन बनसोडे, अमृत झांबरे, अभिजित पटणे, रुपाली पाथरे, किरण झांबरे, डॉ परिणिता पावसकर, मोहिनी कुडेकर, श्वेता कामत, सुप्रिया मागाडे, यशा पाळणकर, भूमी दळी आणि ईशा आगरवाल आदी कलाकार असून विराज जाधव, प्रसाद कुलकर्णी, आयुष जगताप,तुषार गायकवाड,यश बिरे, रतनहरी फड, कैवल्य हरिश्चंद्रे, अजिंक्य गायकवाड ,जीवन भंडारी,आर्या घारे, विशाखा अडसूळ,हिमांगी टपळे, प्रगती पिंगळे, शर्वरी साठे,तन्वी गायकवाड,साक्षी शेळके,मौली बिसेन, नंदिनी पाटोळे आर्या कुटे, सार्थक उढाणे व समर्थ जाधव या बाल कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत तर चित्रपटात सोनाली गव्हाणे, मनोज चौधरी, संदीप साकोरे, सुरेश डोळस, मीना गायकवाड,दत्ता उबाळे,सुवर्णा चोथे, सागर जाधव,एकता जाधव,वीणा वैद्य, अर्चना सातव, मिलिंद संगावार यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सतिश महादु फुगे यांनी केले आहे.

शाळा हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. तो वर्ग, घंटानाद, शिक्षक शाळेबाबतच्या या आणि अशा अनेक गोष्टी आपण कितीही मोठे झालो तरी आपल्या आठवणीत असतात. हृदयाच्या अशा जवळच्या विषयावरील चित्रपटाची निर्मिती शुभांगी सतीश फुगे आणि सतिश महादु फुगे यांनी केली आहे. तर सहनिर्माता हनुमंत नाडेकर असून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुदर्शन रणदिवे, अमित बेंद्रे, अमृता पाटील, प्राची फुगे, अमृत झांबरे, किरण झांबरे, दिपक गडदे, सुरेखा पवार यांनी काम पहिले आहे. या चित्रपटाची पटकथा आणि संवाद अमित नंदकुमार बेंद्रे आणि सतीश महादू फुगे यांचे असून छायाचित्रणाची धुरा श्रीनिवास गायकवाड यांनी सांभाळली आहे.

पुन्हा एकदा शाळेची सफर घडवण्यासाठी २८ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.वितरणाची जबाबदारी फिल्मास्त्र स्टुडिओ, मुंबई यांनी घेतली आहे.

’लाईक आणि सबस्क्राईब’मधील ‘लिंबू फिरवलंय’ गाणे प्रदर्शित

काही दिवसांपूर्वी अमेय वाघसोबत पाठमोऱ्या उभ्या असणाऱ्या तरुणीचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. तेव्हापासूनच ही अभिनेत्री कोण आहे, याची सर्वत्र चर्चा रंगली होती. अखेर या गोष्टीवरून पडदा उठला असून ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून महाराष्ट्राची लाडकी नृत्यांगना गौतमी पाटील आहे. नुकतेच तिचे आणि अमेय वाघचे ‘लाईक आणि सबस्क्राईब’ या चित्रपटातील पहिले धमाकेदार गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. क्षितिज पटवर्धन यांचे बोल असणाऱ्या ‘लिंबू फिरवलंय’ या भन्नाट गाण्याला अमितराज यांचे जबरदस्त संगीत लाभले आहे. तर वैशाली सामंत आणि रवींद्र खोमणे यांनी आपल्या ठसकेबाज आवाजात हे गाणे गायले आहे. पॅनारॉमा म्युझिक लेबल असणाऱ्या या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन राहुल ठोंबरे यांनी केले आहे.

प्रत्येकाला ठेका धरायला लावणारे हे गाणे ऐकायला जितके जल्लोषमय आहे, तितकेच ते पाहायलाही कमाल आहे. ‘लिंबू फिरवलंय’ या गाण्याच्या निमित्ताने गौतमी पाटील पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर तिचा जलवा दाखवणार आहे. त्यामुळे आपल्या नखरेल अदाकारांनी घायाळ करणारी गौतमी पाटील या गाण्यातून संपूर्ण महाराष्ट्रावर लिंबू फिरवणार आहे, असे म्हणायला हरकत नाही.

या गाण्याबद्दल दिग्दर्शक अभिषेक मेरुकर म्हणतात, “एक धमाल गाणे असायलाच हवे, असा अट्टाहास असल्याने ‘लिंबू फिरवलंय’ एक दमदार गाणे ‘लाईक आणि सबस्क्राईब’ मधून आम्ही घेऊन आलो आहोत. तुफान वाजणारे हे गाणे अतिशय कमाल चित्रित करण्यात आले आहे. संगीत टीम, नृत्य दिग्दर्शन या सगळ्याच गोष्टी उत्तम जुळून आल्या आहेत. त्यात गौतमी पाटीलचा ठसकेबाज परफॉर्मन्स या गाण्यात अधिकच रंगत आणतो. त्यामुळे पुढे हे गाणे प्रत्येक समारंभात नक्की वाजेल, याची खात्री वाटते.”

नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत, एस. एन. प्रॉडक्शन्स एलएलपी आणि अभिषेक मेरुकर प्रॉडक्शन्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य, अभिषेक मेरूकर निर्माते असून लेखन आणि दिग्दर्शनही अभिषेक मेरूकर यांनी केले आहे. ‘लाईक आणि सबस्क्राईब’मध्ये अमेय वाघ, अमृता खानविलकर, जुई भागवत, शुभंकर तावडे, विठ्ठल काळे यांच्या प्रमुख भूमिका असून येत्या १८ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

वारकरी संप्रदायाकडून समाज घडविण्याचे कार्य- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ह.भ.प मारुती महाराज कुरेकर यांचा ९३ वा आणि ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांचा ७० वा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न

पुणे, दि. ८: वारकरी संप्रदाय हा वारकरी पंथाला आपले संपूर्ण जीवन अर्पण करणारा; राज्याला, देशाला समाज प्रबोधनाची दिशा देणारा, चुकले माकल्यांना सन्मार्गाची दिशा देणारा असून समाज घडविण्याचे काम वारकरी संप्रदाय करतो, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

आळंदी येथे फ्रुट वाले धर्मशाळा येथे झालेल्या ह.भ.प मारोती महाराज कुरेकर यांच्या ९३ व्या व ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांच्या ७० व्या अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते ह.भ.प कुरेकर महाराज यांना शांतीब्रह्म पुरस्कार आणि ह.भ.प. ढोक महाराज यांना तुलसीदास पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच संतपूजन करण्यात आले.

कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम (सार्व. उपक्रम) मंत्री दादाजी भुसे, खासदार श्रीरंग बारणे, म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह. भ. प. संदीपान महाराज शिंदे (हासेगावकर), ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार प्राप्त ह. भ. प. संजय महाराज पाचपोर आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र ही संतांची भूमी असून मोठी संत परंपरा आपल्याला लाभल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, संत परंपरा, वारकरी पंथ हे महाराष्ट्राचे वैभव आहे. राजकीय अधिष्ठानापेक्षा वारकरी पंथाचे अध्यात्मिक आणि धार्मिक अधिष्ठान मोठे आहे. कारण धकाधकीच्या आयुष्यात पांडुरंगाचे नामस्मरण करताना चांगले विचार, चांगले कार्य करण्याचे विचार मनात येतात, दुष्ट विचार दूर जातात. मला काय मिळाले यापेक्षा दुसऱ्याला काय देणार हे महत्त्वाचे आहे. स्वत:साठी जगत असताना दुसऱ्याचे दु:ख वाटून घेण्याचे काम करणाऱ्यांपैकी वारकरी संप्रदाय आहे, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, आजचा कार्यक्रम आपल्या आयुष्यातला आगळा वेगळा कार्यक्रम आहे. संतांचे पूजन करणे यापेक्षा वेगळे भाग्य नाही. ह.भ.प. मारोती महाराज कुरेकर, ह.भ.प. रामराव महाराज ढोक आणि वारकरी संस्थेचे योगदान मोठे आहे. शिकवणाऱ्याला मानधन नाही आणि शिकणाऱ्यालाही शुल्क नाही अशी जगात नसेल अशी ही संस्था आहे. १०७ वर्षे झालेली ही संस्था आपले नाव जपण्याचे काम करत आहे. एक पिढी घडविण्याचे काम ही संस्था करत आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी संस्थेचा आणि ह.भ.प कुरेकर महाराज आणि ह.भ.प. ढोक महाराज यांचा सन्मान केला. वारकरी मंडळ, वसतीगृह यातील तांत्रिक अडचणी लवकरच दूर करण्यात येईल, असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

गेल्या २ वर्षात शासनाने ६०० च्यावर निर्णय घेतले, असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले, आम्ही नियोजन करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. आपणदेखील सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे. आपल्यालाही गरिबी माहिती आहे. सर्वात जास्त अर्थव्यवस्था चोख बजावणारी लाडकी बहीण सगळ्यात हुशार असते. म्हणून ही योजना सुरू केली. माझी लाडकी बहिण योजनेसाठी वर्षभराची तरतूद केली असून दरमहा निश्चित रक्कम मिळणार आहे. या योजनेबरोबरच लेक लाडकी लखपती योजना, मुलींना व्यावसायिक उच्च शिक्षण मोफत करण्याचा निर्णय, एस. टी. प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत, ज्येष्ठांसाठी वयोश्री योजना आदी योजना राबवित आहे.

त्यांनी पुढे सांगितले, शासनाने शेतकऱ्यांना अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ आदीसाठी आतापर्यंत १६ हजार कोटी रुपये नुकसान भरपाई दिली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीला राज्याच्या नमो महासन्मान योजनेची ६ हजार रुपयांची जोड देऊन वर्षाला एकूण १२ हजार रुपये देण्यात येत आहेत. १ रुपयात पीक विमा देणारे हे देशातील पहिले सरकार असून ७.५ एच. पी. पर्यंतच्या शेतीपंपाचे वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य शासनाने एकीकडे बंद पडलेले प्रकल्प सुरू केले. पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर मिसिंग लिंक, अटल सेतू असे विकासाचे प्रकल्प राबवित असून हाताला रोजगार मिळण्याच्या दृष्टीने नवीन उद्योग आणण्याचे काम केले जात आहे. महाराष्ट्र उद्योग, परदेशी गुंतवणूक मध्ये आघाडीचे राज्य असून देशातील एकूणपैकी ५२ टक्के परदेशी गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे, असे ते म्हणाले.

लाडकी बहीण योजनेबरोबर लाडक्या भावांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कार्यक्रम सुरू केला आहे. त्यांना प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी प्रशिक्षण तसेच विद्यावेतनही मिळणार आहे. यात आतापर्यंत १ लाख ५० हजार उमेदवारांनी अर्ज भरले असून त्यांना नियुक्ती पत्रे दिली आहेत. त्यामुळे एकीकडे विकास कार्य आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना अशी सांगड घालण्याचे काम सरकार करत आहे.

सरकार राज्यातील सर्वसामान्यांना सुविधा देण्याचे काम करत आहे. गड किल्ल्यांच्या विकास, तीर्थक्षेत्रांचा विकास करण्याचे धोरण शासनाने हाती घेतले आहे. चंद्रभागा, इंद्रायणी, गोदावरी या नद्यांच्या प्रदूषण मुक्तीचे आराखडे करत आहोत. महाराष्ट्राला शेती, सिंचन, शिक्षण, उद्योग, आरोग्य, पायाभूत सुविधा, माहिती तंत्रज्ञान आदींमध्ये आधुनिक बनविण्याचा प्रयत्न करत आहोत.

मंत्री श्री. भुसे म्हणाले, राज्यात वारकरी महामंडळ स्थापन करण्यात आले आहे. प्रत्येक दिंडीला अनुदान, वारकरी बांधवांसाठी साहित्य याशिवाय येणाऱ्या काळात किर्तनकारांना सन्मान निवृत्तीवेतन योजना सुरू करण्यात येणार आहे. त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून पुढील काम सुरू आहे, असेही ते म्हणाले.

ह.भ.प. मारोती महाराज कुरेकर म्हणाले, संतांच्या शिकवणीचा, वाङमयाचा विसर पडू नये यासाठी काम करणारी ही वारकरी शिक्षण संस्था आहे. वारकऱ्यांना अध्यात्मिक समाधान मिळवून देण्यासाठी संस्था कार्य करत आहे. संस्थेच्या गरजा शासनामार्फत पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ह.भ.प. रामराव महाराज ढोक म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांच्या सन्मान केला. हजारो कीर्तनकार निर्माण करण्याचे काम शंतीब्रह्म ह.भ.प. मारोती महाराज कुरेकर यांनी केले. या संस्थेला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. शासन रस्ता तयार करते, त्यावर कसे चालावे हे वारकरी संप्रदाय शिकवतो, असेही ते म्हणाले.

इतर कार्यक्रमात आयोजकांच्यावतीने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत होते. मात्र या कार्यक्रमात ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान सोहळा होत आहे अशा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तेच ह.भ.प मारुती महाराज कुरेकर, ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांच्यासह वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले, हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.

ह. भ. प. बाळकृष्ण महाराज शिंदे यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी नतूसिंग राजपूत यांनी लिहिलेल्या वारकरी शिक्षण संस्थेच्यावतीने प्रकाशित सार्थ गाथेच्या तृतीय आवृत्तीचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला वारकरी संप्रदायातील मान्यवर, वारकरी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000

सहजीवन गणेश मित्र मंडळातर्फे श्रींची स्थापना

पुणे : सहकारनगरमधील सहजीवन गणेश मित्र मंडळ ट्रस्ट येथे विधिवत आणि मोठ्या भक्तीभावाने श्रींची स्थापना करण्यात आली.
श्रींची प्रतिष्ठापना श्री वासुदेव निवासचे विश्वस्त देविदास जोशी यांच्या हस्ते करण्यात आली. मंडळाचे उत्सव अध्यक्ष विनय कुलकर्णी, ट्रस्टचे अध्यक्ष नितीन पाटील, मंडळाचे सभासद विजय ममदापूकर, प्रसन्न जावडेकर, सोहम कुलकर्णी, अतुल उरणकर, युवराज नातू, रोहन भोसले आदी उपस्थित होते.
सहजीवन गणेश मित्र मंडळ ट्रस्ट आयोजित सांस्कृतिक महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तालवाद्यांचे विविध रंग उलगडून दाखविणारा ताल परिक्रमा हा कार्यक्रम समीर सूर्यवंशी दि. 12 रोजी सायंकाळी 5:30 सादर करणार आहेत. दि. 13 रोजी 21 मान्यवर गायकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. दि. 14 ला विविध गुणदर्शन, दि. 15 ला रांगोळी स्पर्धा तर सायंकाळी 5:30 वाजता नमस्ते बॉलीवूड हा कार्यक्रम राधा मंगेशकर आणि राजेश दातार सादर करणार आहेत. गणेशोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ सोमवार, दि. 16 रोजी सायंकाळी 5:30 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

जकातचोर इतिहास जमा GST चोर मात्र दडूनच… CBI च्या कारवाईत 20 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडला GST चा अधीक्षक

0

GST विभागाचे सहा अधिकारी, एक सनदी लेखापाल आणि इतर व्यक्ती मिळून लाचेची मागणी करत असल्याची तक्रार

मुंबई- बडे बडे जकात चोर महापालिकेच्या कारवाईने पर्दाफाश झाल्याच्या बातम्या इतिहास जमा झाल्या पण त्यानंतर मात्र GST चोरांना वर्षानुवर्षे अभय मिळून ते गब्बर झाले या पार्श्वभूमीवर सीबीआय ने मोठी लक्षवेधी कारवाई केली आहे .६० लाखाच्या लाचेपैकी २० लाखाची लाच घेणाऱ्या GST भरारी पथकाच्या अधीक्षकाला रंगे हाथ पकडले आहे. या कारवाईने आता व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.

केंद्रीय अन्वेषण विभागाने (The Central Bureau of Investigation – CBI) मुंबई पश्चिम आयुक्तालयातील केंद्रीय वस्तू व सेवा कर (करचुकवेगिरी विरोधी) अधीक्षक आणि इतर दोन व्यक्ती मिळून, तीन जणांना लाच घेताना रंगेहाथ पकडले आणि अटक केली. या प्रकरणात मिळालेल्या तक्रारीनंतर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून केलेल्या कारवाई केली. यात अटक केलेल्या व्यक्ती, त्यांनी मागणी केलेल्या एकूण 60 लाख रुपयांच्या लाचेपैकी 20 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडल्या गेल्या. याशिवाय या व्यक्तींनी हवालाच्या माध्यमातून अतिरिक्त 30 लाख रुपये स्विकारले असल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे.

केंद्रीय वस्तू व सेवा कर कार्यालयाचे सहा अधिकारी, एक सनदी लेखापाल आणि इतर व्यक्ती मिळून लाचेची मागणी करत असल्याची तक्रार सीबीआयला प्राप्त झाली होती. त्या तक्रारीनंतर सीबीआयने ही कारवाई केली. या तक्रारीनुसार मुंबईतील सांताक्रूझ इथल्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कार्यालयातील अधिकाऱ्यांनी तक्रारदाराला 4 सप्टेंबर 2024 च्या संध्याकाळी बेकायदेशीररित्या ताब्यात घेतले, आणि  5 सप्टेंबर 2024 पर्यंत थांबवून ठेवले. याच काळात या आरोपींमधील केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधीक्षक असलेल्या व्यक्तीने तक्रारदाराला अटक करण्याची भिती घालत ती टाळण्यासाठी आधी 80 लाख रुपयांच्या लाचेची आणि त्यानंतर ती कमी करून 60  लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

त्यानंतर केंद्रीय वस्तू आणि सेवा कार्यालयातील इतर तीन अधीक्षकांनी तक्रारदारावर लाच देण्यासाठी प्रचंड दबाव आणला, त्यांनी तक्रारदारा विरोधात बळाचा वापर केला, आणि लाच देण्यास भाग पाडले, असे तक्रारदाराने म्हटले आहे. या अधिकाऱ्यांच्या ताब्यात असतानाच तक्रारदाराच्या चुलत भावाशी संपर्क साधून त्याच्याशीही लाचेची मागणी पूर्ण करण्याबाबत बोलले गेल्याचेही तक्रारदाराने म्हटले आहे. त्यानंतर या तक्रारदाराच्या चुलत भावाने आरोपींपैकी सनदी लेखापाल असेलेल्या व्यक्तीसह, त्यांच्या इतर साथीदार व्यक्तींशी संपर्क साधला आणि लाचेच्या रकमेबाबत वाटाघाटी केल्या, यानंतर त्यांच्यात 60 लाख रुपयांवर सहमती झाली. या 60 लाख रुपयांपैकी 30 लाख रुपये तक्रारदाराची सुटका करण्याआधीच हवालाच्या माध्यमातून दिले गेल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे.

या संदर्भातली तक्रार प्राप्त झाल्यावर सीबीआयने सापळा रचला, आणि आरोपी असलेल्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने 20 लाख रुपयांची लाच स्वीकारताना आरोपी सनदी लेखापाल व्यक्तीला रंगेहाथ पकडले. या कारवाई अंतर्गत स्विकारलेली लाच दुसऱ्या एका साथीदार व्यक्तीपर्यंत पोहचवण्याच्या प्रक्रियेचाही समावेश होता, हीच व्यक्ती, त्याला लाच म्हणून मिळालेली रक्कम केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना सोपणार होती. त्यानुसार आरोपींपैकी केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिक्षक असलेली व्यक्ती त्याला पैसे देण्यासाठी आलेल्या व्यक्तीला मुंबईत ओशिवारा इथे भेटून लाचेची रक्कम स्विकारताना सीबीआयने रचलेल्या सापळ्यात अडकली आणि त्यालाही अटक करण्यात आली.

या कारवाईनंतर सीबीआयने अटक केलेल्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिक्षक, सनदी लेखापाल आणि त्यांच्या साथीदार व्यक्तीला मुंबईतल्या सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर केले. त्यानंतर न्यायालयाने केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिक्षक आणि सनदी लेखापालाला 10 सप्टेंबर 2024 पर्यंत सीबीआय कोठडी तर, त्यांच्या साथीदाराला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या कारवाई सोबतच सीबीआयने संबंधित आरोपींच्या कामाची ठिकाणे तसेच निवासाच्या ठिकाणांसह एकूण नऊ ठिकाणी छापे टाकले आणि काही संशयास्पद दस्तऐवजही जप्त केले आहेत.या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे.

सा. विवेकच्या ‘तंजावरचे मराठे’ पुस्तकाचे होणार सरसंघचालकांच्या हस्ते प्रकाशन

  • ९ सप्टेंबर रोजी पुण्यातील बालशिक्षण मंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजन
  • तंजावरचे छ. बाबाजीराजे भोसले, साताऱ्याचे आ. शिवेंद्रराजे भोसले यांचीही उपस्थिती
  • सा. विवेक व श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम

पुणे, दि. ८ सप्टेंबर – महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्याचप्रमाणे दक्षिणेत तंजावर येथे शहाजीराजांचे तिसरे पुत्र व छत्रपती शिवराजांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे यांनीही स्वतंत्र हिंदू राज्याची स्थापना केली. तंजावरच्या या भोसले संस्थानचे योगदान शब्दबद्ध करणाऱ्या साप्ताहिक विवेकच्या ‘तंजावरचे मराठे : दक्षिणेच्या इतिहासातील योगदान’ या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते पुणे येथे येत्या सोमवार, ९ सप्टेंबर रोजी होत आहे.

या प्रकाशन सोहळ्यास तंजावर भोसले संस्थानचे छत्रपती बाबाजीराजे भोसले,महाराणी गायत्रीराजे भोसले तसेच साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले हेदेखील उपस्थित राहणार आहेत.साप्ताहिक विवेक आणि श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा प्रकाशन सोहळा कोथरूड भागातील मयूर कॉलनीतील बालशिक्षण मंदिर सभागृह येथे सोमवार, ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता संपन्न होत आहे. ख्यातनाम इतिहास अभ्यासक,लेखक डॉ. मिलिंद पराडकर यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे.तसेच,ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉ. अरुणचंद्र पाठक यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे. या महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक कार्यक्रमास पुण्यासह राज्यभरातून अनेक इतिहासप्रेमी नागरिक, विद्यार्थी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याने राजकीय स्वातंत्र्याचा वसा घेतला व या स्वराज्याची पुढे ‘अटक ते कटक’ अशा विशाल हिंदवी साम्राज्याकडे वाटचाल झाली. त्याचप्रमाणे तंजावरच्या भोसले राज्याने सांस्कृतिक स्वातंत्र्याचा, उन्नतीचा व संवर्धनाचा वसा घेतला. व्यंकोजीराजांचे पुत्र शहाजीराजे दुसरे यांनी राजकारणासोबतच ज्ञान-संस्कृतीमध्ये आपला ठसा उमटवला. देशभरातील हिंदू विद्वानांना एकत्र आणून शहाजीपुरम नगर वसवले. पुढे याच घराण्यातील सरफोजीराजे दुसरे यांच्या काळात ज्ञान-संस्कृतीच्या क्षेत्रात तंजावरची मोठी भरभराट झाली. विजयनगर हिंदू साम्राज्यातील नायक राज्यकर्त्यांनी बांधलेले सरस्वती महाल ग्रंथालय भोसले राजघराण्याच्या योगदानामुळे जागतिक स्तरावरील ज्ञानकेंद्र बनले. विसाव्या शतकातही तंजावरच्या तत्कालीन भोसले राज्यकर्त्यांनी समाजप्रबोधन व सामाजिक सुधारणा चळवळीत मोठे योगदान दिले. अशा रीतीने तंजावर भोसले संस्थानने भाषा, साहित्य, नाट्य, तत्वज्ञान, आयुर्वेद, कला, भारतीय विज्ञान, स्थापत्यशास्त्र अशा अनेक क्षेत्रांत दिलेले केलेले अतुलनीय कार्य या पुस्तकात सविस्तररित्या शब्दबद्ध करण्यात आले आहे.

साप्ताहिक विवेकद्वारा प्रकाशित होत असलेल्या व डॉ. मिलिंद पराडकर यांनी लिहिलेल्या ‘तंजावरचे मराठे : दक्षिणेच्या इतिहासातील योगदान’ या पुस्तकाच्या माध्यमातून तंजावर संस्थानने जोपासलेल्या या राष्ट्रीय सांस्कृतिक वारशाची ओळख सर्व मराठी भाषिकांना व्हावी तसेच, यानिमित्ताने तंजावर आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक नाते अधिक घट्ट, समृद्ध व्हावे याकरिता महत्वपूर्ण पुढाकार घेण्यात आला आहे. त्यामुळे येत्या सोमवार, ९ सप्टेंबर रोजी होत असलेल्या या ऐतिहासिक सोहळ्यास पुणेकर इतिहासप्रेमी नागरिक, वाचक, विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन साप्ताहिक विवेक आणि श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

रोजगार नसणारा विकास (जॉबलेस ग्रोथ) होणार आहे, त्यामुळे फुकट योजना देणाऱ्या सरकारवर अवलंबून  राहण्याची वेळ येऊ शकते:प्रा.विजय तांबे 

पुणे :रोजगार नसणारा विकास (जॉबलेस ग्रोथ) होणार आहे त्यामुळे फुकट योजना देणाऱ्या सरकारवर अवलंबून  राहण्याची वेळ येऊ शकते.असा इशारा सेवा ग्राम(वर्धा) चे सचिव प्रा.विजय तांबे यांनी येथे बोलताना दिला ‘कृत्रिम बुद्धिमत्ता अतिसुखकारक असली तरी अभिव्यक्तीवर मर्यादा येऊन मानवी प्रवास थिल्लरपणाकडे होईल.संस्कृतीचे सपाटीकरण होईल आणि अस्मिता प्रखर होतील.अशावेळी एआय संस्कृती नको असेल तर नवी संस्कृती निर्माण करावी लागेल आणि तिथे  गांधी विचारांची, कमीत कमी गरजांवर जगू शकणारी ,’मिनिमलिझम’ संस्कृती येऊ शकते का ,याचा शोध घ्यावा लागेल’,असे प्रतिपादन यावेळी प्रा.विजय तांबे यांनी केले. 
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने  गांधी भवन(कोथरूड) येथे रविवारी,८ सप्टेंबर रोजी  दिवसभर आयोजित केलेल्या   ‘गांधी दर्शन’ शिबिरात ते  ‘कृत्रिम बुद्धिमत्ता ‘ या विषयावर बोलत होते. 
वर्धा येथील सेवा ग्राम चे सचिव विजय तांबे (कृत्रिम बुद्धिमत्ता  ),डॉ.कुमार सप्तर्षी  (महात्मा गांधी आणि सरदार पटेल), उल्हास(दादा) पवार  ( मला उमजलेले गांधी ) या  मान्यवरानी  मार्गदर्शन केले. ‘ ‘गांधी दर्शन’ विषयावरचे हे चौदावे शिबीर होते. 

विजय तांबे  म्हणाले,‘कृत्रिम बुद्धिमत्ता ही चौथी औद्योगिक क्रांती आहे.यात मशीन लर्निंग ,आर्टिफिशिअल इंटेलिजन्स पासून अनेक  गोष्टी येतात.कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इंटरनेट शब्द एकत्र आल्याने जग अपुरे पडणार आहे.पूर्वी तंत्रज्ञान अद्ययावत करण्याची सूत्रे मानवी हातात होती.कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्रांतीनंतर ६० टक्के रोजगार जातील अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे,नव्याने फक्त ७ टक्के रोजगार तयार होतील.रोजगार नसणारा विकास (जॉबलेस ग्रोथ) होणार आहे.कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात मेंदूला ताण देण्याची गरज राहणार नाही.अभिव्यक्तीवर मर्यादा येईल.क्रांतीचा वाहक असणारा मध्यमवर्गच नष्ट होणार आहे. फुकट योजना देणाऱ्या सरकारवर अवलंबून  राहण्याची वेळ येऊ शकते.मानवी प्रवास थिल्लरपणाकडे होईल.संस्कृतीचे सपाटीकरण होईल आणि अस्मिता प्रखर होतील.अशावेळी एआय संस्कृती नको असेल तर नवी संस्कृती निर्माण करावी लागेल आणि तिथे  गांधी विचारांची, कमीत कमी गरजांवर जगू शकणारी,’मिनिमलिझम’ संस्कृती येऊ शकते का,याचा शोध घ्यावा लागेल. त्यासाठी कल्पकता आणि गांधीजींसारखी सर्जकता लागेल.त्यांच्या विचाराने माणूसपण टिकवून ठेवावे लागेल’.
डॉ.कुमार सप्तर्षी म्हणाले,’कृत्रिम बुद्धिमत्ता वाढणार असेल तर ती सरकार नावाच्या व्यवस्थेला पर्याय ठरू शकेल का,याचा अभ्यास केला पाहिजे.सर्वच व्यवस्था बदलणार असतील तर कार्यकर्ते,कार्यक्रम आणि क्रांतीची गरज राहणार का,याचेही चिंतन केले पाहिजे.वर्चस्ववादी यंत्रणा तयार केली जात आहे.दुसऱ्या मानवावर वर्चस्व गाजविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली जाणार असेल तर मानवी मूल्ये टिकून राहतील का? कृत्रिम बुद्धिमत्ते विरुद्ध झगडा होणार असेल तर तो मानवी मूल्ये वापरून होणार कि कृत्रिम बुद्धिमत्तेचाच वापर करून होणार,हेही पाहिले पाहिजे’. 
प्रारंभी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.भारत विठ्ठलदास यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाची प्रात्यक्षिके दाखवली.अन्वर राजन,डॉ.प्रवीण सप्तर्षी,अजय भारदे,राजीव तांबे,प्रसन्न मराठे,श्याम तोडकर,अरूणा तिवारी,तेजस भालेराव  इत्यादी मान्यवर उपस्थित होते.एड.स्वप्नील तोंडे यांनी सूत्रसंचालन केले. 

३६व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये  गोल्फ कप स्पर्धा उत्साहात संपन्न

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचाही सहभाग

पुणे-३६व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘पुणे फेस्टिव्हल गोल्फ कप टूर्नामेंटम’ आज संपन्न झाली. पुण्यातील येरवडा येथील ‘पुणे गोल्फ कोर्स’ येथे सकाळी ६.३० वाजता स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धा स्टेबलफोर्ड फॉरमॅटमध्ये गोल्ड व सिल्व्हर अशा डिवीजनमध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत १३० स्पर्धकांनी भाग घेतला होता. यामध्ये पुणे व परीसरातील विविध कंपन्यांचे वरिष्ठ व्यवस्थापक देखील सहभागी होते. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यात सहभाग घेऊन गोल्फ खेळण्याचा आनंद लुटला.  पूना क्लबचे उपाध्यक्ष गौरव घडोक, गोल्फ क्लबचे इकरम खान, अपूर्व कुमार, सलील भार्गव, ऋषी भोसले, इंद्रनील मुजगुले, मोहनीश ठाकूर अशा अनेक नामवंतांनी यात सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा बक्षीस वितरण शनिवार दि. १४ सप्टें. रोजी सायंकाळी  येरवडा गोल्फ क्लब येथे संपन्न होईल. या स्पर्धेचे संयोजन पूना क्लबने केले.

३६व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये १०० हून अधिक चित्रकारांनी१०० हून अधिक चित्रकारांनी रेखाटली गणपतीची पेंटिंग्ज

पुणे-

३६व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये १०० हून अधिक चित्रकारांनी श्री गणपतीची पेंटिंग्ज रंगवून वाह वाह मिळवली. बालगंधर्व कलादालन येथे आज सकाळी पुणे फेस्टिव्हलचे मुख्य समन्वयक अॅड. अभय छाजेड यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने या पेंटिंग प्रदर्शनचे उद्घाटन झाले. याप्रसंगी ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी यांचा वयाची ८५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ, मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटावकर, चित्रकार प्रा. मिलिंद फडके, संयोजक तुलसी आर्ट ग्रुपचे सुरेश लोणकर आणि धनश्री लोणकर मंचावर उपस्थित होते. टाळ्यांचा कडकडाट करून १०० हून अधिक चित्रकारांनी ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी यांना मानवंदना दिली.

गणपती चित्रांचे या प्रदर्शनात अॅक्रेलिक कलर, वॉटर कलर, खडू, पेन्सिल, चारकोल इत्यादी माध्यमांचा चित्रकारांनी वापर केला आहे. यावेळी ज्येष्ठ शिल्पकार रोहन भोसले यांनी गणपतीचे शाडू माती पासून शिल्प बनवून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. पुणे फेस्टिव्हलच्या वतीने त्यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. शिल्पकार विवेक खटावकर यांनी सुमारे ५ फूट उंचीचे फायबरपासून बनवलेले गणपतीचे शिल्प तेथे उभारले. प्रदर्शनाच्या ३ दिवसात नामवंत चित्रकार विविध पेंटिंग्जची प्रात्यक्षिके दाखवणार आहेत. हे प्रदर्शन ९ व १० सप्टेंबर रोजी सकाळी १०.०० ते रात्री ८.०० या वेळेत बालगंधर्व कलादालनात सर्वांसाठी विनामुल्य खुले असणार आहे. याचं बक्षीस वितरण समारंभ दि. १० सप्टेंबर रोजी सायंकाळी संपन्न होईल.