पुणे-पुण्यात भाजपच्या आमदारांनी केलेल्या कामाचे श्रेय अजित पवार गटातील आमदार चेतन तुपे करत असल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. हडपसर येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार चेतन तुपे यांच्यावर तीव्र नाराजी दर्शवण्यासाठी मांजरी उड्डाणपुलाच्या नामफलकास काळे फासत आंदोलन केले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदाराने महायुतीचा धर्म पाळला नसल्याने निषेध व्यक्त करण्यात आला आहे. भाजप आंदोलक पालकमंत्री अजित पवारांना निवेदन देऊन नाराजी व्यक्त करणार असल्याचे शिवराज घुले यांनी सांगितले आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघात पेयजल योजना, रेल्वे उड्डाणपूल व मांजरी नदी उड्डाणपूल यासाठी योगेश टिळेकर यांच्या पाठपुराव्यामुळे निधी मिळाला, मात्र विद्यमान राष्ट्रवादीचे आमदार भाजपच्या पदाधिकाऱ्यांना डावलत श्रेय लाटत आहेत, असा आरोप शिवराज घुले यांनी केला आहे.
मांजरी उड्डाणंपुलासाठी सुमारे 23 कोटी रुपये मंजूर असताना केवळ 14 कोटी 60 लाख रुपये खर्च करून बाकीचा निधी परत पाठवला. विद्यमान आमदाराच्या हस्तक्षेपामुळे पुलाचे रुंदी व उंची कमी झाल्याने भविष्यात वाहतुककोंडीचा धोका निर्माण होईल असा आरोप नगरसेवक बाळासाहेब घुले यांनी केला आहे.
दरम्यान, अजित पवार महायुतीत सामील झाले. वरिष्ठ पातळीवर नेत्यांचे मनोमिलनही झाले. मात्र, स्थानिक पातळीवर अजूनही अजित पवार यांच्या नेत्यांमध्ये आणि भाजप , शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संघर्ष सुरु आहे. आम्ही राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसतो, पण बाहेर आल्यानंतर उलटी येते, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी मंत्री तानाजी सावंत यांनी केले होते. त्यानंतर भाजपच्या तसेच शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी देखील राष्ट्रवादी कॉंग्रेसवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत काय चित्र दिसते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.