पुणे :रोजगार नसणारा विकास (जॉबलेस ग्रोथ) होणार आहे त्यामुळे फुकट योजना देणाऱ्या सरकारवर अवलंबून राहण्याची वेळ येऊ शकते.असा इशारा सेवा ग्राम(वर्धा) चे सचिव प्रा.विजय तांबे यांनी येथे बोलताना दिला ‘कृत्रिम बुद्धिमत्ता अतिसुखकारक असली तरी अभिव्यक्तीवर मर्यादा येऊन मानवी प्रवास थिल्लरपणाकडे होईल.संस्कृतीचे सपाटीकरण होईल आणि अस्मिता प्रखर होतील.अशावेळी एआय संस्कृती नको असेल तर नवी संस्कृती निर्माण करावी लागेल आणि तिथे गांधी विचारांची, कमीत कमी गरजांवर जगू शकणारी ,’मिनिमलिझम’ संस्कृती येऊ शकते का ,याचा शोध घ्यावा लागेल’,असे प्रतिपादन यावेळी प्रा.विजय तांबे यांनी केले.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने गांधी भवन(कोथरूड) येथे रविवारी,८ सप्टेंबर रोजी दिवसभर आयोजित केलेल्या ‘गांधी दर्शन’ शिबिरात ते ‘कृत्रिम बुद्धिमत्ता ‘ या विषयावर बोलत होते.
वर्धा येथील सेवा ग्राम चे सचिव विजय तांबे (कृत्रिम बुद्धिमत्ता ),डॉ.कुमार सप्तर्षी (महात्मा गांधी आणि सरदार पटेल), उल्हास(दादा) पवार ( मला उमजलेले गांधी ) या मान्यवरानी मार्गदर्शन केले. ‘ ‘गांधी दर्शन’ विषयावरचे हे चौदावे शिबीर होते.
विजय तांबे म्हणाले,‘कृत्रिम बुद्धिमत्ता ही चौथी औद्योगिक क्रांती आहे.यात मशीन लर्निंग ,आर्टिफिशिअल इंटेलिजन्स पासून अनेक गोष्टी येतात.कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इंटरनेट शब्द एकत्र आल्याने जग अपुरे पडणार आहे.पूर्वी तंत्रज्ञान अद्ययावत करण्याची सूत्रे मानवी हातात होती.कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्रांतीनंतर ६० टक्के रोजगार जातील अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे,नव्याने फक्त ७ टक्के रोजगार तयार होतील.रोजगार नसणारा विकास (जॉबलेस ग्रोथ) होणार आहे.कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात मेंदूला ताण देण्याची गरज राहणार नाही.अभिव्यक्तीवर मर्यादा येईल.क्रांतीचा वाहक असणारा मध्यमवर्गच नष्ट होणार आहे. फुकट योजना देणाऱ्या सरकारवर अवलंबून राहण्याची वेळ येऊ शकते.मानवी प्रवास थिल्लरपणाकडे होईल.संस्कृतीचे सपाटीकरण होईल आणि अस्मिता प्रखर होतील.अशावेळी एआय संस्कृती नको असेल तर नवी संस्कृती निर्माण करावी लागेल आणि तिथे गांधी विचारांची, कमीत कमी गरजांवर जगू शकणारी,’मिनिमलिझम’ संस्कृती येऊ शकते का,याचा शोध घ्यावा लागेल. त्यासाठी कल्पकता आणि गांधीजींसारखी सर्जकता लागेल.त्यांच्या विचाराने माणूसपण टिकवून ठेवावे लागेल’.
डॉ.कुमार सप्तर्षी म्हणाले,’कृत्रिम बुद्धिमत्ता वाढणार असेल तर ती सरकार नावाच्या व्यवस्थेला पर्याय ठरू शकेल का,याचा अभ्यास केला पाहिजे.सर्वच व्यवस्था बदलणार असतील तर कार्यकर्ते,कार्यक्रम आणि क्रांतीची गरज राहणार का,याचेही चिंतन केले पाहिजे.वर्चस्ववादी यंत्रणा तयार केली जात आहे.दुसऱ्या मानवावर वर्चस्व गाजविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली जाणार असेल तर मानवी मूल्ये टिकून राहतील का? कृत्रिम बुद्धिमत्ते विरुद्ध झगडा होणार असेल तर तो मानवी मूल्ये वापरून होणार कि कृत्रिम बुद्धिमत्तेचाच वापर करून होणार,हेही पाहिले पाहिजे’.
प्रारंभी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.भारत विठ्ठलदास यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाची प्रात्यक्षिके दाखवली.अन्वर राजन,डॉ.प्रवीण सप्तर्षी,अजय भारदे,राजीव तांबे,प्रसन्न मराठे,श्याम तोडकर,अरूणा तिवारी,तेजस भालेराव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.एड.स्वप्नील तोंडे यांनी सूत्रसंचालन केले.