मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी आपले जावई व नातीसह लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. पवारांनी यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना लालबागच्या राजाचे दर्शन घेतले होते. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी ते त्यांच्या चरणी लीन झाले हे विशेष.
राज्यात गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. गणेशभक्त आपल्या बाप्पाच्या भक्तीरसात आकंठ बुडालेत. मुंबईतही विविध गणेश मंडळांच्या गणरायांच्या दर्शनासाठी भाविकांची रिघ लागली आहे. विशेषतः लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी झाली आहे. त्यातच शरद पवार सोमवारी सकाळी आपले जावई सदानंद सुळे व नात रेवती सुळे यांच्यासह लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचले. लालबागचा राजा हा नवसाला पावणारा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे शरद पवारांनी लालबागच्या राजाकडे कोणते साकडे घातले असेल? याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
शरद पवारांनी यापूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना लालबागच्या राजाचे दर्शन घेतले होते. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी ते सोमवारी लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचले. कोरोना महामारीच्या काळात लालबाग राजाच्या मंडळाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यावेळी शरद पवारांनी या शिबिराला भेट दिली होती. पण त्यावर्षी कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे मंडळातर्फे गणपतीची स्थापना करण्यात आली नव्हती. तेव्हा फक्त रक्तदान शिबिर घेण्यात आले होते.