Home Blog Page 706

मुंबई महानगर प्रदेशाचा आर्थिक मास्टर प्लॅन : एक सविस्तर विश्लेषण

मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) हा भारतातील सर्वात गतिमान आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा प्रदेश आहे. या प्रदेशाच्या भविष्यातील विकासासाठी आणि त्याला जागतिक आर्थिक केंद्र बनवण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी आर्थिक मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. या लेखात या मास्टर प्लॅनचे सविस्तर विश्लेषण ….

१. प्रस्तावना:

मुंबई महानगर प्रदेशाचा आर्थिक मास्टर प्लॅन हा एक दूरदर्शी आणि व्यापक आराखडा आहे जो २०४७ पर्यंत प्रदेशाच्या आर्थिक विकासाचे मार्गदर्शन करेल. हा प्लॅन केवळ आर्थिक वाढीवरच केंद्रित नाही तर राहण्यायोग्यता, शाश्वतता आणि समावेशकतेवर देखील भर देतो.

२. सध्याची परिस्थिती:

सध्या एमएमआर ही $१४० अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था आहे. येथे २५.८ दशलक्ष लोकसंख्या आहे आणि १० दशलक्ष नोकऱ्या आहेत. प्रदेशाचे दरडोई उत्पन्न $५,२४८ आहे, जे राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे.

३. २०४७ साठीचे दृष्टिकोन:

मास्टर प्लॅनमध्ये २०४७ पर्यंत एमएमआरची अर्थव्यवस्था $१.५ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे आजच्या टोकियोच्या अर्थव्यवस्थेच्या बरोबरीचे आहे. दरडोई जीडीपी $३८,००० पर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे, जे सध्याच्या इटलीच्या दरडोई जीडीपीच्या बरोबरीचे आहे.

४. २०३० साठीची लक्ष्ये:

मास्टर प्लॅनमध्ये २०३० पर्यंत साध्य करावयाची काही विशिष्ट लक्ष्ये निश्चित केली आहेत:

* $३०० अब्ज डॉलरचे जीडीपी साध्य करणे
* ९-१०% वास्तविक सीएजीआर दराने वाढ करणे
* २.८-३ दशलक्ष नवीन नोकऱ्या निर्माण करणे, ज्यापैकी १ दशलक्ष नोकऱ्या महिलांसाठी असतील
* $१२५-१३५ अब्ज डॉलरची खासगी गुंतवणूक आकर्षित करणे

ही लक्ष्ये साध्य करण्यासाठी व्यवसायास अनुकूल वातावरण निर्माण करणे, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे आणि आर्थिक वाढीच्या प्रमुख क्षेत्रांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.

५. सात प्रमुख आर्थिक वाढीचे चालक:

मास्टर प्लॅनमध्ये सात प्रमुख आर्थिक वाढीचे चालक ओळखले गेले आहेत:

अ) जागतिक सेवा:
* आयटी, आयटीईएस आणि आर्थिक सेवा क्षेत्रांचा विस्तार करणे
* उच्च मूल्यवर्धित सेवांवर लक्ष केंद्रित करणे
* जागतिक कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी विशेष आर्थिक क्षेत्रे (एसईझेड) विकसित करणे
* स्थानिक कौशल्य विकास कार्यक्रम राबवणे

ब) परवडणारी गृहनिर्माण:
* कमी आणि मध्यम उत्पन्न गटांसाठी परवडणारी घरे बांधणे
* जुन्या इमारतींचे पुनर्विकास प्रकल्प राबवणे
* शहरी गरीब वस्त्यांचे पुनर्वसन करणे
* ग्रीन बिल्डिंग तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे

क) पर्यटन:
* ऐतिहासिक स्थळे आणि सांस्कृतिक वारसा जतन करणे आणि त्यांचा विकास करणे
* समुद्रकिनारे आणि बीच रिसॉर्ट्स विकसित करणे
* व्यावसायिक पर्यटन सुविधा निर्माण करणे
* पर्यावरणपूरक पर्यटनाला प्रोत्साहन देणे

ड) उत्पादन आणि लॉजिस्टिक्स:
* उच्च तंत्रज्ञान उत्पादन क्षेत्रांना प्रोत्साहन देणे
* लॉजिस्टिक पार्क आणि कार्गो हब विकसित करणे
* बंदर आणि विमानतळ जोडणी सुधारणे
* स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे

इ) नियोजित शहरे आणि वाहतूक-केंद्रित विकास:
* नवीन सॅटेलाइट शहरे विकसित करणे
* मेट्रो आणि रेल्वे नेटवर्कचा विस्तार करणे
* मल्टी-मोडल ट्रान्सपोर्ट हब तयार करणे
* पादचारी आणि सायकल मार्ग विकसित करणे

फ) शाश्वतता आणि समावेशकता:
* नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देणे
* शून्य-कचरा व्यवस्थापन प्रणाली विकसित करणे
* महिला सहभाग वाढवण्यासाठी विशेष कार्यक्रम राबवणे
* विकलांग व्यक्तींसाठी रोजगार संधी निर्माण करणे

ग) शहरी पायाभूत सुविधा:
* पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण व्यवस्था सुधारणे
* स्मार्ट सिटी तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे
* शहरी हरित क्षेत्रे आणि मनोरंजन सुविधा विकसित करणे
* ऊर्जा-कार्यक्षम इमारती आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था प्रोत्साहित करणे

६. अंमलबजावणी योजना:

मास्टर प्लॅनच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी एक व्यापक योजना आखली गेली आहे:

अ) ३० विशिष्ट प्रकल्प:
* प्रत्येक वाढीच्या चालकासाठी विशिष्ट प्रकल्प ओळखले गेले आहेत
* या प्रकल्पांची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी केली जाईल
* प्रत्येक प्रकल्पासाठी विस्तृत कृती आराखडा तयार केला जाईल
* नियमित पुनरावलोकन आणि मूल्यांकन यंत्रणा स्थापित केली जाईल

ब) ८ क्षेत्रीय धोरणे:
* व्यवसायास अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी विविध क्षेत्रांसाठी धोरणे विकसित केली जातील
* या धोरणांमध्ये कर प्रोत्साहने, नियामक सुधारणा आणि कौशल्य विकास कार्यक्रम समाविष्ट असतील
* धोरणांची नियमितपणे समीक्षा केली जाईल आणि आवश्यकतेनुसार सुधारणा केल्या जातील

क) ९ संस्थात्मक बदल:
* प्रशासकीय कार्यक्षमता सुधारण्यासाठी संस्थात्मक बदल सुचवले गेले आहेत
* यामध्ये नवीन विभाग स्थापन करणे, अधिकार विकेंद्रीकरण आणि डिजिटलायझेशन समाविष्ट आहे
* या बदलांमुळे निर्णय प्रक्रिया जलद होईल आणि जबाबदारी वाढेल

ड) वॉर रूम आणि संचालन समित्या:
* प्लॅनच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी एक केंद्रीय वॉर रूम स्थापन केली जाईल
* विविध क्षेत्रांसाठी संचालन समित्या स्थापन केल्या जातील
* या समित्या नियमित बैठका घेऊन प्रगतीचे मूल्यांकन करतील आणि आव्हानांवर मात करण्यासाठी धोरणे आखतील

इ) खासगी क्षेत्राचा सहभाग:
* प्रकल्पांच्या अंमलबजावणीत खासगी क्षेत्राचा सक्रिय सहभाग असेल
* सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) मॉडेल्सचा वापर केला जाईल
* गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी विशेष प्रोत्साहन योजना राबवल्या जातील

७. अपेक्षित परिणाम:

मास्टर प्लॅनच्या यशस्वी अंमलबजावणीतून पुढील परिणामांची अपेक्षा आहे:

अ) द्रुत आर्थिक वाढ:
* २०३० पर्यंत $३०० अब्ज जीडीपी साध्य करणे
* उच्च-मूल्य क्षेत्रांमध्ये रोजगार निर्मिती
* स्थानिक उद्योगांची स्पर्धात्मकता वाढवणे
* परकीय थेट गुंतवणुकीत (एफडीआय) वाढ

ब) राहण्यायोग्यतेत सुधारणा:
* परवडणाऱ्या गृहनिर्माण उपलब्धतेत वाढ
* सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा
* पायाभूत सुविधांची गुणवत्ता वाढवणे
* हरित क्षेत्रे आणि मनोरंजन सुविधांचा विस्तार

क) शाश्वतता आणि समावेशकता:
* कार्बन उत्सर्जनात घट
* नवीकरणीय ऊर्जा वापरात वाढ
* महिला कामगार सहभागात वाढ
* समाजातील सर्व वर्गांसाठी समान संधी

ड) रोजगार निर्मिती:
* २.८-३ दशलक्ष नवीन रोजगार निर्माण
* महिलांसाठी १ दशलक्ष रोजगार संधी
* कौशल्य-आधारित रोजगारात वाढ
* स्टार्टअप आणि उद्योजकतेला प्रोत्साहन

इ) जागतिक स्तरावरील प्रतिष्ठा:
* आंतरराष्ट्रीय गुंतवणुकदारांसाठी आकर्षक स्थळ
* जागतिक कंपन्यांचे मुख्यालय आकर्षित करणे
* पर्यटन स्थळ म्हणून ओळख निर्माण करणे
* शिक्षण आणि संशोधन केंद्र म्हणून विकास

मुंबई महानगर प्रदेशाचा आर्थिक मास्टर प्लॅन हा एक महत्त्वाकांक्षी आणि व्यापक आराखडा आहे जो प्रदेशाला जागतिक आर्थिक केंद्र बनवण्याचे स्वप्न पाहतो. या प्लॅनमध्ये केवळ आर्थिक वाढीवरच नव्हे तर सामाजिक विकास, पर्यावरण संरक्षण आणि जीवनमान सुधारणेवरही भर दिला आहे.

या प्लॅनच्या यशस्वी अंमलबजावणीतून मुंबई महानगर प्रदेश केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील एक अग्रगण्य आर्थिक केंद्र म्हणून उदयास येऊ शकेल. त्याचबरोबर हा प्रदेश राहण्यायोग्य, शाश्वत आणि समावेशक शहरी विकासाचे एक आदर्श उदाहरण बनू शकतो.

बजाज आलीयान्झ कंपनीच्या मॅनजरकडून कंपनीची दीड कोंटीची फसवणूक

पुणे-

अनिवासी भारतीय नागरिकांच्या अनक्लेम पॉलिसीची माहिती चोरुन बनावट नावाने बँक खाते तयार करुन, मोबाईल नंबर बदलून बजाज आलीयान्झ लाईफ इन्शोरन्स कंपनीची मॅनजरकडून १ कोटी ४७ लाख ८२ हजार २७ रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. फसवणूकीची रक्कम वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

याप्रकरणी बलराम कुमार पटवा (वय ३२, रा. मानपुरा पटवा टोली, जि.गया बिहार) यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार मनोज जैन (रा. बिर्ला नगर, ग्वालीयर, मध्यप्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. ही घटना २६ मार्च ते १५ एप्रिल २०२४ या दरम्यानच्या काळात ही घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, बजाज आलीयान्झ लाईफ इन्शोरन्स कंपनी मार्फत भारतीय लोकांबरोबर अनिवासी भारतीय नागरिकांना लाईफ इन्शोरन्स दिला जातो. कन्हैया चटलानी यांच्या वडीलांनी २०११ मध्ये काढलेल्या पॉलिसीच्या मॅच्यूरिटी अमाउंट बाबत कंपनीच्या एक्झीक्युटिव्ह यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळी कपंनीमार्फत सांगण्यात आले की, पॉलिसी मॅच्युअर झाल्यावर उत्तरप्रदेशच्या मैनपुरी येथील बँक ऑफ इंडियाच्या खात्यावर ९१ लाख ३ हजार १८२ रुपये पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र कन्हैया चटलानी यांनी त्यांचे उत्तरप्रदेश येथे कुठलेही बँक खाते काढले नसून त्यांना कुठलीही रक्कम मिळाले नसल्याचे सांगितले.

यानंतर कंपनीच्या वतीने तपास केला असता कंपनीच्या लाईफ पोर्टलवर लॉगइन करुन पॉलिसी काढतांना दिलेला मोबाईल नंबर बदलून दुसरा नंबर ऍड केल्याचे दिसून आले. तसेच फोनच्या मदतीने बँक खाते सुद्धा बदलण्यात आल्याचे लक्षात आले. कंपनीच्या अंतर्गत तपासात मॅनेजर मनोज जैन याने कंपनीच्या लॅपटॉप मधुन चटलानीच्या इशोरन्स पॉलिस मध्ये १९ ऑक्टोबर २०२० पासून ७३ वेळा लॉग इन केले असल्याचे दिसून आले.

यानंतर जैन याने इतरांच्या पॉलिसीमध्ये कुठे लॉग इन केले आहे का याची माहिती घेतली असता तीन जणांच्या पॉलिसीची पैसे इतर ठिकाणी पाठविण्याचे समोर आले आहे. सर्व पॉलिसी होल्डर हे अनिवासी असून जैन यांनी कंपनीची १ कोटी ४७ लाख ८२ हजार २७ रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आहे आहे. तसेच इतर पाच जणांची पॉलिसी मध्ये हेरफार केल्याच समोर आले असून याचा सखोल तपास करण्यात येत आहे. यामुळे फसवणूकीची रक्कम वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलिस करत आहेत.

लाडकी बहीणमध्ये फसवणूक केली तर तुरुंगात टाकेल:अजित पवारांचा सरकारची फसवणूक करणाऱ्यांना इशारा

पुणे -लाडकी बहीण योजनेचा लाभ घेताना सरकारची फसवणूक करणाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खडेबोल सुनावले आहेत. अजित पवार म्हणाले, एका दाम्पत्याने तर लाडकी बहीणसाठी 26 वेळा अर्ज केला अन् लूट केली. आम्ही देतो पण फसवणूक केली तर मग आम्ही तुरुंगात ही टाकतो, मग करा चक्की पिसिंग, असे ते म्हणाले. ते पुण्यात बोलत होते.

अजित पवार म्हणाले, बऱ्याच महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत. त्याच महिला लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेऊ इच्छितात. हे लक्षात घ्या, तुम्हाला एकाच योजनेचा लाभ मिळेल. सगळेच पाहिजे असेल तर सरकारची तिजोरी खाली होईल. मग ब्रह्मदेव आला तरी शक्य नाही. पुढे ते म्हणाले, एका दाम्पत्याने तर लाडकी बहीणसाठी 26 वेळा अर्ज केला अन् लूट केली. आम्ही देतो पण फसवणूक केली तर मग आम्ही तुरुंगात ही टाकतो, मग करा चक्की पिसिंग, असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे.

पुढे बोलताना त्यांनी ज्ञानेश महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर देखील भाष्य केले आहे. समाजाचे ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी. ज्ञानेश महाराजांनी वादग्रस्त आणि अपमानकारक वक्तव्य करून अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. हा अधिकार तुम्हाला कोणी दिला. काही लोक इतर समजाबाबत बोलतात. यात यांच्या मित्र पक्षाचे नेतेही अशी भाषा वापरतात.

अजित पवार म्हणाले, आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी काय शिकवले आणि आपण काय करतोय. समाजात ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी. सर्व धर्म समभाव ही राष्ट्रवादीची विचारधारा आहे आणि यापुढेही राहील, असेही त्यांनी नमूद केले आहे. पुढे ते म्हणाले, ज्ञानेश महाराज यांनी वादग्रस्त विधान केले तेव्हा उपस्थित महत्त्वाच्या व्यक्तींनी का नाही रोखले? माझ्या समोर कोणी चुकीचे बोलत असेल तर त्याला रोखण्याची जबाबदारी माझी आहे. तसेच मी एखाद्या ठिकाणी चुकून आक्षेपार्ह बोललो तर मला मंचवरील इतरांनी थांबवायला हवे.

‘भारत होणार नागरी हवाई वाहतुकीची सर्वात मोठी बाजारपेठ’

0
  • केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा दावा
  • आशिया-पॅसिफिक नागरी हवाई वाहतूक परिषेदेत मोहोळ यांनी केले भारताचे प्रतिनिधित्व

नवी दिल्ली (प्रतिनिधी)

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात साकार होत असलेल्या विकसित भारताच्या ध्येयपूर्तीमध्ये हवाई वाहतूक क्षेत्राचे योगदान महत्वपूर्ण असणार आहे. त्यामुळे भारताला जगातील सर्वात मोठी हवाई वाहतूक बाजारपेठ बनवण्याच्या दृष्टीने नवीन विमानतळे, नवे हवाई रस्ते निर्माण करण्याचे आणि नागरी हवाई वाहतूक क्षेत्राचा श्वाश्वत विकास करण्याचे काम प्रगतीपथावर आहे, असे केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

नवी दिल्ली येथील भारत मंडपम् येथे २९ देशांच्या नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांचा सहभाग असलेल्या आशिया-पॅसिफिक नागरी हवाई वाहतूक परिषदेच्या सत्रात केंद्रीय मंत्री मोहोळ बोलत होते. यावेळी २९ देशाच्या नागरी हवाई वाहतूक मंत्र्यासह केंद्रीय मंत्री राममोहन नायडू आणि आंतरराष्ट्रीय नागरी हवाई वाहतूक संघटनेचे अध्यक्ष साल्वाटोर स्कियाचितानो आदी उपस्थित होते.

या परिषदेत भारताच्या शिष्टमंडळाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मोहोळ यांना मिळाली असता ते भारताच्या वतीने भूमिका मांडत होते. या परिषदेस, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड, फिलिपिन्स, इंडोनेशिया, मलेशिया समवेत जगभरातील २९ देशांचे विमान वाहतूक मंत्री, राजदूत व अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाने या परिषदेचा समारोप झाला,

भारत लवकरच नागरी हवाई क्षेत्रात जगातील सर्वात मोठी बाजारपेठ होईल, असा दावा करत मोहोळ पुढे म्हणाले, ‘नागरी हवाई वाहतूक क्षेत्रातील महिलांचा सहभाग वाढवणे हे भारत सरकारचे धोरण आहे. याच अनुषंगाने २०२५ पर्यंत भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात कार्यरत एकूण मनुष्यबळात २५% वाटा महिलांचा असावा हे आमचे ध्येय आहे. तसेच विमानन क्षेत्रास पर्यावरणपूरक बनविण्यासाठी विमान इंधनात शाश्वत पर्याय उपलब्ध केले जाणार असून नवी विमानतळे पूर्णतः पर्यावरपूरक उभारली जात आहेत.’

‘गेल्या १० वर्षांत प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात हवाई सेवांमध्ये झालेली कमालीची प्रगती झाली असून विकसित भारताच्या संकल्पपूर्तीत नागरी हवाई वाहतूक क्षेत्राचे योगदान मोठे असणार आहे. तसेच उडान योजनेमुळे सर्वसामान्यांनाही विमानसेवा उपलब्ध होत असून डीजी यात्रा सुविधांमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर आणि सहज होत आहे’, असेही मोहोळ म्हणाले.

मोहोळांना मिळाली भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी !

आशिया-पॅसिफिक या जागतिक परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व पुण्याचे खासदार आणि केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाची राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या मुरलीधर मोहोळ यांना मिळाली. मंत्रिपदी निवड झाल्यानंतर झालेल्या पहिल्याच जागतिक परिषदेत मोहोळ यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. पुण्यासाठी ही निश्तितच गौरवाची बाब आहे.

आगामी १०० वर्षाचा विचार करुन नवीन मध्यवर्ती इमारतीचे काम करा- उपमुख्यमंत्री अजित पवार

खेड तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन
पुणे, दि. १२: नागरिकांना सोई-सुविधा उपलब्ध करुन त्यांचे जीवनमान अधिक सुखकर करण्याकरीता शासन कटिबद्ध आहे; त्यादृष्टीने आगामी १०० वर्षाचा विचार करुन नवीन मध्यवर्ती इमारतीचे काम करा, याकरीता लागणारा अतिरिक्त निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉ.विलास वाहणे, उप विभागीय अधिकारी अनिल दौंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, तहसीलदार ज्योती देवरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, गट विकास अधिकारी विशाल शिंदे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, सत्यशील राजगुरु, प्रशांत राजगुरु आदी उपस्थित होते.

श्री. पवार यांच्या हस्ते चांडोली ते हुतात्मा राजगुरुवाडा स्मारक पूल, प्राथमिक आरोग्य केंद्र, राजगुरूनगर शहरातील मुख्य रस्ता वाडारोडचे लोकार्पण तसेच हुतात्मा शिवराम हरी राजगुरु वाडा स्मारक, नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कडूस खेड गुळाणी वाफेगाव लोणी रस्ता सुधारणा करणे, आरबुजवाडी ते वडगाव पाटोळे पुलाचे भूमिपूजन करण्यात आले.

श्री. पवार म्हणाले, हुतात्मा शिवराम हरी राजगुरु जन्मस्थळ परिसर विकासाकरीता १०४ कोटी १२ लाख रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. स्मारक आणि परिसरातील विकास कामे करताना नदीचा विचार करुन कामे करावीत. याकरीता निधीची कमतरता पडू देणार नाही. नवीन प्रशासकीय इमारत तसेच हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे जन्मस्थळ या राजगुरूनगरच्या वैभवात भर घालणाऱ्या वास्तू आहेत, याची दक्षता घेऊनच कामे करावीत. सार्वजनिक विकासकामे करताना ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ करण्यासह वेळेत पूर्ण होतील याकडे लक्ष द्यावे, तालुक्यातील सार्वजनिक कामांकरीता निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही श्री. पवार यावेळी म्हणाले.

हुतात्मा शिवराम हरी राजगुरु वाडा स्मारकाचे भूमिपूजन
पुरातत्व विभागामार्फत विकसित करण्यात येणार असून १०४ कोटी १२ लाख रुपये खर्चाच्या आराखड्यास मान्यता मिळाली असून यापैकी ३६ कोटी ४१ लाख रुपयाच्या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली असून कार्यारंभ आदेश निर्गमित करण्यात आले आहे. यामध्ये जन्मखोली, थोरला वाडा, मुख्य दरवाजा व स्मारकाचा जीर्णोधार, स्मारकातील वाचनालय, कॅफेटेरिया तसेच रामघाट, चांदोली घाट, त्याकडे जाणारा दरवाजा व पायऱ्या, संरक्षित भिंत, वाहनतळ, पदपथ, अंतर्गत रस्ते, जमीन सौंदर्यीकरण (लॅंडस्केप), खुले सभागृह, पुतळे, शिल्पे (म्युरल्स), संपूर्ण स्मारकाचे विद्युतीकरण, प्रकाश व ध्वनी सादरीकरण (लाईट ॲण्ड साऊंड शो) आदी कामांचा समावेश करण्यात आलेला आहे.

नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन
नवीन प्रशासकीय इमारतीचे एकूण जागेचे क्षेत्रफळ ३ हजार ८२४.६० क्षेत्रफळ आहे. या कामासाठी २१ कोटी ८० लाख ७५ हजार रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. शहरात उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, उप कोषागार कार्यालय, लघु पाटबंधारे विभाग,उप अभियंता सार्वजकिन बांधकाम विभाग, निरीक्षक वैधमापन, उपनिबंधक कार्यालय, लेखा परीक्षक कार्यालय आदी शासकीय कार्यालये कार्यरत आहेत. बहुतांश कार्यालयास शासकीय जागा उपलब्ध नसल्याने भाड्याच्या जागेत आहेत तसेच महसूल विभागाच्या कार्यालयास अस्तित्वातील इमारती कमी पडत असून त्या जीर्ण व नादुरुस्त इमारती झाल्या आहेत. नवीन प्रशासकीय इमारतीचे काम पूर्ण झाल्यास सर्व कार्यालये एकाच ठिकाणी येणार असून प्रशासकीय कामात गतिमानता येण्यास मदत होईल.

प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण
बॉश चेसिस सिस्टम्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चाकण यांनी बॉश सोशल एंगेजमेंट इनिशिएटिव्ह अंतर्गत सामाजिक उत्तरदायित्व निधीतून एकूण ७ हजार १३५ चौरस मीटर क्षेत्रफळात अत्याधुनिक नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात आले. याकरीता ५ कोटी ३० लाख रुपये खर्च करण्यात आले आहे. परिसराचा विचार करता आवश्यक वैद्यकीय तसेच इलेक्ट्रिकल उपकरणे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. सर्व सोयीयुक्त प्रसुती कक्ष, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र आंतररुग्ण विभाग, प्रयोगशाळा सुविधा, अत्याधुनिक सुविधायुक्त शस्त्रक्रिया गृहसुविधा, १५ प्रवासी वाहन क्षमता असलेली उद्धवाहन सुविधा आदी सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.

चांडोली ते हुतात्मा राजगुरुवाडा स्मारक पुलाचे लोकार्पण
मौजे चांडोली ते हुतात्मा राजगुरुवाडा दरम्यान भीमा नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम करून आज त्याचे लोकार्पण करण्यात आले. या कामाचे पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण तर दुसरा टप्पा प्रगतीपथावर आहे. या पुलाचे बांधकामामुळे चांडोली गाव, राजगुरूनगर शहर व बाजारपेठ हे प्रमुख जिल्हा मार्ग १५ सोबत जोडले जाणार आहेत. शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. पूलामुळे हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे जन्मस्थळ असलेला राजगुरूवाडा मुख्य रस्त्याची जोडला जाणार असल्याने येथील पर्यटनास चालना मिळणार आहे.

कडुस खेड गुळाणी वाफेगाव लोणी रस्ता सुधारित कामाचे भूमिपूजन
कडुस खेड गुळाणी वाफेगाव लोणी दरम्यान ३०. २० किलोमीटर रस्त्याचे काम करण्यात येणार असून परिसरातील नागरिकांना लाभ होणार असून त्यांचा वेळ व इंधनात बचत होणार आहे.

आरबुजवाडी ते वडगाव पाटोळे पुलाचे भूमिपूजन
आरबुजवाडी ते वडगाव पाटोळे यांना जोडणाऱ्या पुलाचे बांधकाम झाल्यानंतर भीमाशंकरकडे जाणारी वाहतूक तसेच इतर वाहतुकीस खेड शहरात न जाता प्रमुख जिल्हा मार्ग १५ मार्गे रा.मा राष्ट्रीय महामार्गाकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. पूलाच्या बाजूच्या ग्रामीण भाग मुख्य रस्त्याशी जोडला जाऊन या भागाच्या विकासास चालना मिळणार आहे.
0000

१३६ इन्फंट्री बटालियन (टीए) (इको) महारमध्ये सशस्त्र दलातील माजी सैनिकांना भरती होण्याचे आवाहन

पुणे, दि. १२: मराठवाडा पर्यावरण बटालियन अंतर्गत १३६ इन्फंट्री बटालियन (टीए) (इको) महारमध्ये सशस्त्र दलातील माजी सैनिक, पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभाग व राज्य वन विभागाच्या माजी महिला कर्मचाऱ्यांतून एकूण ५३ पदे भरावयाची असून संबंधितांनी भरती रॅलीत भाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या भरतीअंतर्गत उमेदवारांनी छत्रपती संभाजी नगर मिलिटरी कँट, (सर्वत्र स्टेडियम) येथे २३ ते २८ सप्टेंबर २०२४ या कालावधीत शारीरिक पात्रता तपासणीसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे.

या बटालियन मध्ये सोल्जर जीडी (सामान्य कर्तव्य) ४२, लिपिक ६, घरकाम पाहणारी व्यक्ती (हाऊस कीपर), लोहार (ब्लॅकस्मीथ), मेस कीपर, कारागीर (आर्टिसन) तसेच स्टीवार्ड ही प्रत्येकी एक पदे भरण्यात येणार आहे. भरती झालेल्या उमेदवारांना वृक्षारोपण उपक्रमात मराठवाडा विभागात तसेच संपूर्ण देशात कर्तव्य बजावावे लागेल.

या पदासाठीच्या पात्रता पुढीलप्रमाणे आहेत. माजी सैनिक, पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभाग व राज्य वन विभागाच्या माजी महिला कर्मचारी (अकाली सेवानिवृत्तांसह) यांना किमान वयोमर्यादेची अट नाही. माजी सैनिकांचा सेवानिवृत्त झाल्याचा कालावधी हा ५ वर्षांच्या आत असावा. माजी सैनिक (ओआर) वयाच्या ५० वर्षापर्यंत सेवा करू शकतात, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे लेफ्टनंट कर्नल एस. डी. हंगे (नि.) यांनी कळविले आहे.

वनविकास महामंडळामार्फत उत्तम दर्जाचे सागवानी लाकूड विक्रीसाठी उपलब्ध होणार

पुणे, दि. १२ : उत्तम गुणवत्तेचे चंद्रपूर जिल्ह्यातील सागवानी लाकूड महाराष्ट्र वनविकास महामंडळामार्फत पुणे जिल्ह्यात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती महामंडळाच्यावतीने देण्यात आली आहे.

वनमंत्री सुधीर मुनंगटीवार यांच्या पुढाकाराने दिल्ली येथील राम मंदिर, उपराष्ट्रपती भवन, नवीन संसदेपाठोपाठ आता प्रधानमंत्री कार्यालयासाठीही चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान वापरले जाणार असून महामंडळाच्या बल्लारशा डेपोतून हे सागवान दिल्ली येथे पाठवण्यात येणार आहे. याच गुणवत्तेचे सागवानी लाकूड पुण्यातही विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

एक्झिक्युटिव्ह एनक्लेव्ह या नवी दिल्लीमधील पंतप्रधान कार्यालयातील केंद्रीय सचिवालय, राष्ट्रीय सुरक्षा सचिवालय याकरिता लार्सन अँड टुर्बो यांच्याकडून नमुना म्हणून सागवानाची मागणी प्रायोगिक तत्त्वावर प्राप्त झाली होती. त्यांच्याकडून बल्लारशा येथे सागाच्या गोल लाकूड आणि चिराण मालाची गुणवत्ता तपासणी केल्यावर ते उत्तम दर्जाचे आढळले. त्यानुसार या सर्व प्रकल्पाकरिता वनविकास महामंडळाकडे मागणी प्राप्त झाली आहे, अशी माहिती वनविकास महामंडळाचे चंद्रपूर येथील प्रादेशिक व्यवस्थापक तथा डेपो प्रमुख सुमित कुमार यांनी दिली.

सागवानी लाकडाची वैशिष्ट्ये:
सागाचे लाकुड मजबूतीसाठी ओळखले जाते. सागवान लाकडात टेक्टोनिक नावाचे तेल असते. याला नैसर्गिक चमक असल्याने पॉलिश करण्याची गरज नसते. या लाकडाला त्यातील तेलामुळे सुमारे ६०० वर्षे कीड लागत नाही, ऊन किंवा पावसाचा कमी परिणाम होतो. तेल आणि रबराचे प्रमाण अधिक असल्यामुळे सागवान अधिक मजबूत स्थितीत राहते. यातच चंद्रपूर जिल्ह्यातील लाकूड हे सोनेरी छटेत असल्यामुळे आकर्षक दिसते.

सर्वसामान्य ग्राहक तसेच व्यापाऱ्यांना उत्त्तम गुणवत्तेचे सागवानी लाकूड पुण्यात देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी वनविकास महामंडळाअंतर्गत वन प्रकल्प विभागाच्या सहाय्यक व्यवस्थापक विपणन ४ था मजला, वन भवन, भांबुर्डा वन वसाहत, गोखले नगर, पुणे या कार्यालयाशी दूरध्वनी क्र. ०२०- २६८५०७६५, ई-मेल पत्ता – rm.fdcmpune@gmail.com या पत्त्यावर किंवा चंद्रपूर येथील प्रादेशिक व्यवस्थापक यांचा भ्रमणध्वनी क्र. ९४१२९९६७५३ किंवा पुणे येथील सहाय्यक व्यवस्थापक अश्विनी सोनावणे यांच्याशी भ्रमणध्वनी क्र. ८३७८०४१८४३ वर संपर्क साधावा, असे श्रीमती सोनवणे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
00000

‘जागतिक वारसा नामांकनाचे आम्ही साक्षीदार’ मोहिमेचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ

पुणे, दि. १२ : उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राजगुरूनगर (ता. खेड) येथील हुतात्मा शिवराम हरी राजगुरू वाडा स्मारक येथे ‘जागतिक वारसा नामांकनाचे आम्ही साक्षीदार’ या स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, उप विभागीय अधिकारी अनिल दौंडे, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. विलास वाहणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, तहसीलदार ज्योती देवरे, गट विकास अधिकारी विशाल शिंदे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे आदी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले ‘मराठा लष्करी भूप्रदेश’ अंतर्गत जागतिक वारसा नामांकनासाठी प्रस्तावित केले आहेत. यामध्ये जिल्ह्यातील शिवनेरी, लोहगड, राजगड या किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे. नामांकनादरम्यान किल्ल्यांच्या प्रचार-प्रसारासाठी जिल्हा प्रशासन आणि पुरातत्व विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री. पवार यांनी या मोहिमेच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या स्वाक्षरीसाठीच्या फ्लेक्सवर स्वाक्षरी केली. या गड किल्ले जागतिक वारसा स्थळ नामांकन जनजागृती मोहिमेत नागरिकांना सहभागी करुन घेण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असून त्यापैकी हा एक उपक्रम आहे, असे पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. वाहणे यांनी सांगितले.

शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आधार प्रमाणीकरणास १८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

पुणे, दि. १२ : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आधार प्रमाणीकरण न केलेल्या जिल्ह्यातील ६४८ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणासाठी १८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील १ हजार १२१ शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची सुविधा १२ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत उपलब्ध करून देण्यात आली होती. तथापि, जिल्ह्यातील अद्याप ६४८ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले नसल्याने सहकार आयुक्त तथा सहकारी संस्थांचे निबंधक यांच्या सूचनेनुसार ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

योजनेच्या कालावधीत बँकांकडून पीक कर्ज घेऊन, नियमीत कर्ज परतफेड करणाऱ्या काही शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यापूर्वीच, निधन झाल्याने त्यांना प्रोत्साहनपर लाभ रक्कम अदा करता आली नाही, अशा मयत शेतकऱ्यांच्या कर्जखात्याची माहिती योजनेच्या संगणकीय प्रणालीवरुन काढून टाकण्याची सुविधा १७ सप्टेंबर २०२४ पर्यंत उपलब्ध राहील. तसेच वारसांची नोंद संबंधीत कर्जखात्यास करून त्याबाबतची माहिती मयत शेतकऱ्यांच्या संगणकीय प्रणालीवर सादर करण्याची सुविधा दिनांक १८ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर या कालावधीत उपलब्ध राहील.

उर्वरित पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी आपले सरकार केंद्र, सीएसी केंद्र, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आपल्या जवळच्या शाखेत जावून आपले आधार प्रमाणीकरण लवकरात लवकर करून घ्यावे तसेच मयत शेतकऱ्यांच्या वारसांनी त्यांचे कागदपत्रे संबंधित बँकेत विहित कालावधीत सादर करून वारस नोंद करावी, असे आवाहन पुणे ग्रामीणचे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, प्रकाश जगताप यांनी केले आहे.
00000

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या जनजागृतीसाठी फिरत्या रथाचा खेड तालुक्यात शुभारंभ

पुणे, दि. १२ : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने खेड-आळंदी विधानसभा मतदार संघात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) आणि व्हीव्हीपॅटबाबत जनजागृती आणि प्रात्यक्षिक करण्यात येणार असून त्यासाठी तयार करण्यात आलेल्या जनजागृती फिरत्या रथाचा शुभारंभ खेड तहसील कार्यालयाच्या आवारात उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

राजगुरूनगर येथे झालेल्या या कार्यक्रमास आमदार दिलीप मोहिते पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, उप विभागीय अधिकारी अनिल दौंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, तहसीलदार ज्योती देवरे, गट विकास अधिकारी विशाल शिंदे, नगर परिषदेचे मुख्यधिकारी अजिंक्य रणदिवे आदी उपस्थित होते.

मतदार संघातील कर्मचाऱ्यांना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्राचे प्रात्याक्षिकाचे प्रशिक्षण देण्यात आले आहेत. ते सर्व मतदान केंद्रांतर्गत गर्दीच्या ठिकाणी, बाजारपेठ, मॉल आदी ठिकाणी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्राबाबत प्रात्यक्षिके करुन दाखविण्यात येणार आहेत.

अधिकाधिक नागरिकांनी यामध्ये सहभागी होऊन
ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्राची प्रत्यक्ष हाताळणी करावी. यावेळी नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यात येईल. नागरिकांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्राच्या प्रात्यक्षिकांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही तहसील कार्यालयाच्यावतीने करण्यात येत आहे.
00000

आपल्या विधी शिक्षण कार्यासाठी वर्षात एकतरी सामाजिक – राजकीय विषयहाताळावा”.- आ.अॅड निरंजन डावखरे

पुणे (दि.१२) कायदेविषयक शिक्षण घेतांना विद्यार्थ्यांनी . दरवर्षी एकतरी सामाजिक राजकीय विषय हाताळला पाहिजे,यामुळे आपल्याला समाजातील अनेक बाबींचे परस्पर संबंध व अनेक बाबींची माहिती होवून आपले ज्ञान वाढेल व त्याचा आपल्या व्यक्तिमत्व विकासात वाढ होईल असे आ.अॅड निरंजन डावखरे यांनी प्रतिपादन केले.ते डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या श्री नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयात निर्देशन व्याख्यान करतांना ते बोलत होते. श्री नवलमल फिरोदिया महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्रम प्रसंगी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अॅड.अशोक पलांडे,सचिन जामगे,प्राचार्या डॉ.सुनिता आढाव,आदी मान्यवरांच्या बरोबरच विध्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वयक सहाय्यक प्राध्यापक हनुमंत दोडके होते होते. सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापक सौरभ जाधव यांनी केले.

‘मी व्यसन करणार नाही, करू देणार नाही’ गणेशोत्सव कार्यकर्त्यांची शपथ

कस्तुरे चौकातील कस्तुरे चौक तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांचा पुढाकार
पुणे : तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत आहे. अनेक तरुण व्यसनाला बळी पडून आपल्या आणि कुटुंबियांच्या जीवनाची दुर्दशा करीत आहेत. कस्तुरे चौकातील कस्तुरे चौक तरुण मंडळाने गणेशोत्सवात प्रबोधनाची परंपरा कायम ठेवत तरुणांमध्ये व्यसनमुक्तीची जनजागृती केली. यावेळी गणेशोत्सव कार्यकर्त्यांनी ‘मी व्यसन करणार नाही, करू देणार नाही’ अशी शपथ घेतली.
कस्तुरे चौक तरुण मंडळ,स्व.वस्ताद जयाभाऊ मानकर मित्र परिवार व भोई प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार, भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रक्तदाते सदाशिव कुंदेन, मंडळाचे अध्यक्ष धनंजय तरडे, कार्याध्यक्ष अभिजीत मानकर, उपाध्यक्ष कैलास कातखडे यावेळी उपस्थित होते.

शशिकांत चव्हाण म्हणाले, अंमली पदार्थाचे दुष्परिणाम फक्त त्याचे सेवन करणाऱ्यालाच सहन करावे लागत नाहीत तर त्याच्याही पेक्षा त्याच्या कुटुंबाला कितीतरी पटीने सहन करावे लागतात. अंमली पदार्थांचे सेवन करण्याने काही वेळी करणाऱ्याची मजा असते परंतु आपल्या कुटुंबाची त्यामुळे दशा होते. आपण करतो त्या गोष्टीची किंमत आपल्या लोकांनी किती चुकवावी याचा विचार आपण करायला पाहिजे. 
डाॅ.मिलिंद भोई म्हणाले, गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजात जनजागृती करणे ही पुण्याच्या गणेशोत्सवाची परंपरा आहे. त्याला अनुसरुन कस्तुरे चौक तरुण मंडळाच्या वतीने कार्यकर्त्यांनी व्यसनापासून दूर राहण्याची शपथ घेतली. व्यसनी मित्रांची संगत, व्यसनी पदार्थांचे आकर्षण अशा अनेक कारणांमुळे लहान वयातच  व्यसन करण्याचे प्रमाण वाढत आहे. मित्रांनी आपल्या मित्रांना व्यसनाधीन होण्यापासून थांबविले पाहिजे. ते काम गणेशोत्सव कार्यकर्त्यांच्या माध्यमातून होईल.

वैद्यकीय महाविद्यालयांना विद्यार्थ्यांकडून हमीपत्र लिहून घेण्याबाबत कोणतेही निर्देश नाहीत

0

मुंबई, दि.१२ :- शासकीय/महानगरपालिका/अनुदानित/खाजगी विनाअनुदानित आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या सर्व महाविद्यालयांना विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे हमीपत्र लिहून घेण्याबाबत निर्देश देण्यात आले नसल्याचे वैद्यकीय शिक्षण, संशोधन व ‘आयुष’च्या आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

सक्षम प्राधिकाऱ्यांमार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या तसेच, विहित मार्गाने बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या एससी, एसटी ओबीसी, ईडब्ल्यूएस प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना १०० टक्के शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती अनुज्ञेय आहे, त्यांचेकडून प्रवेशाच्यावेळी कोणतेही शिक्षण शुल्क न आकारता त्यांना प्रवेश देण्यात यावा असे निर्देश देण्यात आले आहे.

ज्या विद्यार्थ्यांना ५० टक्के शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती अनुज्ञेय आहे, त्यांचेकडून फक्त ५० टक्के शिक्षण शुल्क घेऊन, त्यांना प्रवेश देण्यात यावा. शैक्षणिक संस्थांनी योजनेबाबतची माहिती सर्व विद्यार्थ्यांना देऊन संबंधित योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलच्या वेळापत्रकानुसार अर्ज भरण्याबाबत कळवावे. सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांविरुद्ध कारवाई करण्यात येईल.

महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याकरिता प्रयत्न करावेत. प्रथम वर्षाशिवाय इतर पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणारे विद्यार्थी शिष्यवृत्तीकरिता पात्र असतील तर त्यांच्याबाबतही याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी, असे संचालनालयामार्फत निर्देश देण्यात आले असल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाने कळविले आहे.

राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देणा-या तरविंदरसिंह मारवा व भाजपाविरोधात काँग्रेसचे शुक्रवारी राज्यभर आंदोलन.

मुंबई, दि. १२ सप्टेंबर २०२४

लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. देशविघातक शक्तींनी महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे बळी घेतले आहेत.आता पुन्हा गांधी संपवण्याची जाहीर धमकी दिली जात आहे व भाजपाचे सरकार मात्र त्यावर काहीही कारवाई करत नाही हे अत्यंत गंभीर व आक्षेपार्ह आहे. राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा भाजप नेता तरविंदरसिंह मारवा आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात उद्या शुक्रवार दि. 13 सप्टेंबर रोजी काँग्रेस पक्ष राज्यभर तीव्र आंदोलन करून भाजपा सरकारचा धिक्कार करणार आहे.

खासदार राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या भाजपाचा माजी आमदार तरविंदरसिंह मारवा व भारतीय जनता पक्षाच्या विरोधात राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयी उद्या सकाळी ११ वाजेपासून तीव्र आंदोलन करुन या विकृत्तीविरोधात निषेध नोंदवाला जाणार आहे. भाजपाचा माजी आमदार तरविंदर सिंह मारवाच्या अटकेची मागणीही केली जाणार आहे अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष, संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी दिली आहे.

१४ सप्टेंबर रोजी जिओ पारसी कार्यशाळेचे आयोजन

0

पारशी समुदायासह केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री साधणार संवाद

मुंबई दि.12 : केंद्र शासनाच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाद्वारे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह मुंबई येथे शनिवार 14 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11.00 ते दु. 3.30 वाजेपर्यंत जिओ पारसी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी केंद्रीय  अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू, राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार हे समुदायाशी संवाद साधणार आहेत.

पारशी  लोकसंख्या स्थिर करण्यासाठी आणि भारतातील पारशी लोकसंख्या वाढवण्याच्या उद्देशाने केंद्राने जिओ पारसी योजना सुरू केली. पारशी जोडप्यांना वैद्यकीय आणि समुदायाचे आरोग्य (HOC) घटकांतर्गत आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येते.  राज्य शासनाद्वारे बायोमेट्रिक प्रमाणीकरण आणि इतर पडताळणीनंतर योजनेतील मदत थेट लाभ हस्तांतरण (DBT) मोडद्वारे नागरिकांना जारी केली जात आहे. योजनेची माहिती समुदायातील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

पारशी मुख्य धर्मोपदेशक उदवाडाचे श्री. दस्तूरजी  आणि राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इकबाल सिंह लालपुरा, उपाध्यक्ष केरसी के.देबू उपस्थित राहणार आहेत. पारशी समुदायातील नागरिकांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन अल्पसंख्याक विकास विभागाने केले आहे.