पुणे, दि. १२: मराठवाडा पर्यावरण बटालियन अंतर्गत १३६ इन्फंट्री बटालियन (टीए) (इको) महारमध्ये सशस्त्र दलातील माजी सैनिक, पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभाग व राज्य वन विभागाच्या माजी महिला कर्मचाऱ्यांतून एकूण ५३ पदे भरावयाची असून संबंधितांनी भरती रॅलीत भाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या भरतीअंतर्गत उमेदवारांनी छत्रपती संभाजी नगर मिलिटरी कँट, (सर्वत्र स्टेडियम) येथे २३ ते २८ सप्टेंबर २०२४ या कालावधीत शारीरिक पात्रता तपासणीसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
या बटालियन मध्ये सोल्जर जीडी (सामान्य कर्तव्य) ४२, लिपिक ६, घरकाम पाहणारी व्यक्ती (हाऊस कीपर), लोहार (ब्लॅकस्मीथ), मेस कीपर, कारागीर (आर्टिसन) तसेच स्टीवार्ड ही प्रत्येकी एक पदे भरण्यात येणार आहे. भरती झालेल्या उमेदवारांना वृक्षारोपण उपक्रमात मराठवाडा विभागात तसेच संपूर्ण देशात कर्तव्य बजावावे लागेल.
या पदासाठीच्या पात्रता पुढीलप्रमाणे आहेत. माजी सैनिक, पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभाग व राज्य वन विभागाच्या माजी महिला कर्मचारी (अकाली सेवानिवृत्तांसह) यांना किमान वयोमर्यादेची अट नाही. माजी सैनिकांचा सेवानिवृत्त झाल्याचा कालावधी हा ५ वर्षांच्या आत असावा. माजी सैनिक (ओआर) वयाच्या ५० वर्षापर्यंत सेवा करू शकतात, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे लेफ्टनंट कर्नल एस. डी. हंगे (नि.) यांनी कळविले आहे.