पुणे -लाडकी बहीण योजनेचा लाभ घेताना सरकारची फसवणूक करणाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खडेबोल सुनावले आहेत. अजित पवार म्हणाले, एका दाम्पत्याने तर लाडकी बहीणसाठी 26 वेळा अर्ज केला अन् लूट केली. आम्ही देतो पण फसवणूक केली तर मग आम्ही तुरुंगात ही टाकतो, मग करा चक्की पिसिंग, असे ते म्हणाले. ते पुण्यात बोलत होते.
अजित पवार म्हणाले, बऱ्याच महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत. त्याच महिला लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेऊ इच्छितात. हे लक्षात घ्या, तुम्हाला एकाच योजनेचा लाभ मिळेल. सगळेच पाहिजे असेल तर सरकारची तिजोरी खाली होईल. मग ब्रह्मदेव आला तरी शक्य नाही. पुढे ते म्हणाले, एका दाम्पत्याने तर लाडकी बहीणसाठी 26 वेळा अर्ज केला अन् लूट केली. आम्ही देतो पण फसवणूक केली तर मग आम्ही तुरुंगात ही टाकतो, मग करा चक्की पिसिंग, असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे.
पुढे बोलताना त्यांनी ज्ञानेश महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर देखील भाष्य केले आहे. समाजाचे ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी. ज्ञानेश महाराजांनी वादग्रस्त आणि अपमानकारक वक्तव्य करून अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. हा अधिकार तुम्हाला कोणी दिला. काही लोक इतर समजाबाबत बोलतात. यात यांच्या मित्र पक्षाचे नेतेही अशी भाषा वापरतात.
अजित पवार म्हणाले, आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी काय शिकवले आणि आपण काय करतोय. समाजात ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी. सर्व धर्म समभाव ही राष्ट्रवादीची विचारधारा आहे आणि यापुढेही राहील, असेही त्यांनी नमूद केले आहे. पुढे ते म्हणाले, ज्ञानेश महाराज यांनी वादग्रस्त विधान केले तेव्हा उपस्थित महत्त्वाच्या व्यक्तींनी का नाही रोखले? माझ्या समोर कोणी चुकीचे बोलत असेल तर त्याला रोखण्याची जबाबदारी माझी आहे. तसेच मी एखाद्या ठिकाणी चुकून आक्षेपार्ह बोललो तर मला मंचवरील इतरांनी थांबवायला हवे.