कस्तुरे चौकातील कस्तुरे चौक तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांचा पुढाकार
पुणे : तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत आहे. अनेक तरुण व्यसनाला बळी पडून आपल्या आणि कुटुंबियांच्या जीवनाची दुर्दशा करीत आहेत. कस्तुरे चौकातील कस्तुरे चौक तरुण मंडळाने गणेशोत्सवात प्रबोधनाची परंपरा कायम ठेवत तरुणांमध्ये व्यसनमुक्तीची जनजागृती केली. यावेळी गणेशोत्सव कार्यकर्त्यांनी ‘मी व्यसन करणार नाही, करू देणार नाही’ अशी शपथ घेतली.
कस्तुरे चौक तरुण मंडळ,स्व.वस्ताद जयाभाऊ मानकर मित्र परिवार व भोई प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार, भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रक्तदाते सदाशिव कुंदेन, मंडळाचे अध्यक्ष धनंजय तरडे, कार्याध्यक्ष अभिजीत मानकर, उपाध्यक्ष कैलास कातखडे यावेळी उपस्थित होते.
शशिकांत चव्हाण म्हणाले, अंमली पदार्थाचे दुष्परिणाम फक्त त्याचे सेवन करणाऱ्यालाच सहन करावे लागत नाहीत तर त्याच्याही पेक्षा त्याच्या कुटुंबाला कितीतरी पटीने सहन करावे लागतात. अंमली पदार्थांचे सेवन करण्याने काही वेळी करणाऱ्याची मजा असते परंतु आपल्या कुटुंबाची त्यामुळे दशा होते. आपण करतो त्या गोष्टीची किंमत आपल्या लोकांनी किती चुकवावी याचा विचार आपण करायला पाहिजे.
डाॅ.मिलिंद भोई म्हणाले, गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजात जनजागृती करणे ही पुण्याच्या गणेशोत्सवाची परंपरा आहे. त्याला अनुसरुन कस्तुरे चौक तरुण मंडळाच्या वतीने कार्यकर्त्यांनी व्यसनापासून दूर राहण्याची शपथ घेतली. व्यसनी मित्रांची संगत, व्यसनी पदार्थांचे आकर्षण अशा अनेक कारणांमुळे लहान वयातच व्यसन करण्याचे प्रमाण वाढत आहे. मित्रांनी आपल्या मित्रांना व्यसनाधीन होण्यापासून थांबविले पाहिजे. ते काम गणेशोत्सव कार्यकर्त्यांच्या माध्यमातून होईल.