पुणे :गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहर आणि उपनगरांमध्ये हजेरी लावलेल्या पावसाने बुधवारी (ता. २४) दुपारनंतर काहीशी विश्रांती घेतली. मात्र, ही विश्रांती अल्पकालीन असून पुढील तीन ते चार दिवस पावसाचा जोर पुन्हा वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
या पार्श्वभूमीवर पुढील तीन दिवस पुणे शहरासाठी ‘यलो’, तर घाट परिसरासाठी ‘ऑरेंज’ अलर्ट देण्यात आला आहे.
मंगळवारी रात्री उशिरापर्यंत शहरात जोरदार पाऊस कोसळत होता. बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत पावसाच्या हलक्या सरी सुरू होत्या, त्यानंतर मात्र दिवसभर पावसाने उघडीप दिली आणि शहरात ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. पावसाच्या सलग हजेरीमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, बुधवारी शहराच्या कमाल आणि किमान तापमानात दोन अंश सेल्सिअसची घट नोंदवली गेली.
कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २१.६ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन ते चार दिवस कमाल आणि किमान तापमानात आणखी किंचित घट होण्याची शक्यता आहे. तसेच, शहरात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.
पुणे आणि परिसरात गुरूवारी (ता. २५) कमाल तापमान स्थिर राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस तर २३ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात येणार आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी आणि सायंकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर शुक्रवारपासून (ता. २६) कमाल आणि किमान तापमानात आणखी घट होईल.
कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात येण्याची शक्यता आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी आणि सायंकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

