Home Blog Page 704

परदेशात राहणाऱ्या पुणेकरांना आपत्कालीन सहकार्यासाठी पुण्यातील गणेश मंडळांची “मोरया हेल्पलाईन”

पुणे-

महाराष्ट्राचा सार्वजनिक गणेशोत्सव हा आता महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता ग्लोबल झाला आहे. शेकडो देशांमध्ये हा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होतो. त्याच बरोबर मोठ्या संख्येने आंतरराष्ट्रीय पर्यटक उत्साहाने महाराष्ट्राच्या गणेशोत्सवात सहभागी होतात. म्हणूनच आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा पुणे शहराच्या गणेशोत्सवातील सहभाग अधिक वाढवून पुण्याला आंतरराष्ट्रीय पर्यटनाचे केंद्र बनविणे त्याच बरोबर संपूर्ण जगातील गणेशोत्सवाचे आयोजक एकमेकांशी जोडण्याच्या उद्देशाने ग्लोबल गणेश फेस्टिव्हल ह्या उपक्रमाची सुरुवात झाली आहे.
ह्याच ग्लोबल गणेश फेस्टिव्हल चे औचित्य साधून पुणे शहरातील विविध गणेश मंडळांचा सहभाग असलेल्या ‘जय गणेश व्यासपीठ’ च्या माध्यमातून आणि रेडिओ, स्वदेश सेवा फाऊंडेशन ह्यांच्या सहकार्याने परदेशात राहणाऱ्या पुणेकरांसाठी अत्यंत आवश्यक अशा “मोरया हेल्पलाईन” ची निर्मिती करण्यात आली आहे.

पुणे शहरात समाजिक भान जपणाऱ्या गणेशोत्सव मंडळांचे विस्तिर्ण जाळे पसरले आहे. हे कार्यकर्ते सर्वांना मदतीसाठी चोवीस तास तत्पर असतात हे कोरोना काळात देशाने अनुभवले आहे. त्याच बरोबर पुणे शहरातील लाखो नागरिक हे नोकरी, व्यवसाय, शिक्षण ह्या निमित्ताने परदेशात असतात. त्यांचे कुटुंबिय किंवा त्यांना पुण्यात काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर हक्काच्या लोकांची गरज असते हीच गरज ह्या हेल्पलाईनच्या माध्यनातून गणेश मंडळांचे कार्यकर्ते पूर्ण करणार आहेत.
७७७०००३४१६ ह्या क्रमांकावर तसेच www.globalganeshfestival.com ह्या वेबसाईट वर ही हेल्पलाईन २४ तास सुरु असणार आहे अशी माहिती जय गणेश व्यासपीठचे उदय जगताप, शिरीष मोहिते, पियुष शहा, ग्लोबल गणेश फेस्टिव्हलचे मुख्य आयोजक वैभव वाघ आणि स्वदेश सेवा फाऊंडेशनच्या धनश्री पाटील ह्यांनी दिली.
अधिक माहितीसाठी संपर्क : वैभव वाघ ९८९०७९८९०३
जगभर पसरलेल्या सर्व पुणेकरांपर्यंत ही हेल्पलाईन नक्की पोहचवा… गणपती बाप्पा मोरया !

धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

पुणे, दि .१३ : राज्य शासनाने धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. या मंडळामार्फत ऑटो रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालकांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यात येणार असून संबंधितांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मंडळामार्फत जीवनविमा व अपंगत्च विमा योजना, आरोग्य विषयक लाभ, कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास अर्थसहाय्य, पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, कामगार कौशल्य वृद्धी योजना, ६५ वर्षावरील ऑटो रिक्षा व मिटर्ड टॅक्सी परवानाधारक यांना निवृती सन्मान योजने अंतर्गत सानुग्रह अनुदान, नवीन ऑटो रिक्षा, मिटर्ड टॅक्सी खरेदी, गृह खरेदीसाठी कर्ज आदी योजना राबविण्यात येणार आहेत.

या योजनेंतर्गत नोंदणी प्रक्रिया परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणार आहे. मंडळाच्या सभासदत्वासाठी अर्जदाराकडे राज्यामध्ये नोंदणी असलेल्या ऑटो रिक्षा, मिटर्ड टॅक्सी अनुज्ञप्ती व बॅच असणे बंधनकारक राहील. नोंदणीकृत चालकांना मंडळाच्या जिल्हास्तरीय कार्यालयाकडून ओळखपत्र देण्यात येणार आहेत. चालकांनी योजनांच्या लाभासाठी जिल्हास्तरीय समितीकडे विहीत नमुन्यात अर्ज करणे आवश्यक राहील.

या योजनांची सभासद नोंदणीकरिता ऑनलाईन प्रणाली विकासात करण्यात येत असून, संबधीत प्रणालीदार अर्जदार सभासदाची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्यात येणार आहे. नोंदणी प्रक्रिया, अटी व शर्ती, मंडळाच्या योजना आदींबाबत अधिक माहितीसाठी प्रादेशिक पारिवहन कार्यालय पुणे येथे संपर्क साधावा, असे आवाहनही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी केले आहे.

आरक्षण रद्द करण्याच्या वादग्रस्त विधानावर राहुल गांधींनी माफी मागावी, अन्यथा भाजप स्वस्थ बसणार नाही

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा इशारा

पुणे-आरक्षण रद्द करण्याबाबत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल त्यांनी देशाची आणि देशातील दलित समाजाची माफी मागावी, त्याशिवाय भारतीय जनता पार्टी स्वस्थ बसणार नाही असा इशारा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला.

राहुल गांधी यांनी केलेल्या आरक्षण विरोधी वक्तव्यामुळे दलित समाजात भीती निर्माण झाली असून, या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी प्रदेश भाजपच्या वतीने आज राज्यभर आंदोलने करण्यात आली. याचा भाग म्हणून पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. तेव्हा पाटील बोलत होते.

अनुसूचित जाती मोर्चा भाजपचे प्रदेश अध्यक्ष दिलीप कांबळे, प्रदेश भाजपच्या चिटणीस वर्षा डहाळे, शहर भाजपचे सरचिटणीस पुनीत जोशी, राजू शिळीमकर, राहुल भंडारे, रवी साळेगावकर, महेश पुंडे, अतुल साळवे, किरण कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पाटील म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत भाजपला 400 पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर हे आरक्षण रद्द करतील असा गैरप्रचार काँग्रेसने केला. तो काही ठिकाणी प्रभावी ठरल्याने त्यांना यश मिळाले. परंतु त्यांचा हा खोटेपणा जनतेच्या लक्षात आला असून, त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत मतदार जागा दाखवून देतील.”

पाटील पुढे म्हणाले, “बाबासाहेबांनी तयार केलेली घटना बदलावी लागणार नाही. महिलांना राजकीय आरक्षण मिळावे आणि सहा ते 14 वयोगटातील मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण मिळावे अशा चांगल्या उद्देशाने भाजपने दोनदा घटना दुरुस्ती केली. परंतु काँग्रेसने घटना दुरुस्तीचा गैरवापर केला. देशावर आणीबाणी लादली, 20 लाख नागरिकांना तुरुंगात टाकले, मूलभूत स्वातंत्र्यावर गदा आणली, तब्बल 40 वेळा लोकनियुक्त राज्य सरकारे बरखास्त केली. त्याचा आम्ही निषेध करतो.

राहुल गांधी आणि त्यांचे सहकारी खोटा विमर्श (नरेटीव) निर्माण करण्यात हुशार आहेत. महाराष्ट्रातही मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत त्यांची भूमिका दुटप्पी आहे. आरक्षणाबाबत शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी आपली स्पष्ट भूमिका जाहीर करावी. महाराष्ट्रातील जनता दूधखुळी नाही. या दुटप्पी भूमिकेची शहानिशा केल्याशिवाय राहणार नाही, असे ही पाटील म्हणाले.

महावितरणच्या ‘व्हिजन २०५०’साठी पाठपुरावा करणार

एमएसईबी सूत्रधारी कंपनीच्या संचालक सौ. नीता केळकर यांचे आश्वासन

पुणे,: पुणे जिल्ह्यात प्रामुख्याने घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडून विजेची व नवीन वीजजोडण्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच वेगाने वीजयंत्रणेची सक्षमीकरण व विस्तारीकरण आवश्यक आहे. त्यामुळे महावितरण व महापारेषणच्या पुणे परिमंडल अंतर्गत प्रस्तावित नवीन उपकेंद्र व इतर सर्व पायाभूत यंत्रणेच्या उभारणीसाठी म.रा.वि.मं. सूत्रधारी कंपनीच्या बैठकीमध्ये पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन या कंपनीच्या स्वतंत्र संचालक सौ. नीता केळकर यांनी दिले. तसेच वीजयंत्रणा उभारण्यासाठी जागेचा मोठा अडसर आहे. तो दूर करण्यासाठी इतर शासकीय विभागांकडे पाठपुरावा करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.  

गणेशखिंड येथील ‘प्रकाशभवन’मध्ये शुक्रवारी (दि. १३) आयोजित महावितरण व महापारेषणच्या पुणे परिमंडलातील विविध योजना व अंमलबजावणीचा आढावा घेताना सौ. केळकर बोलत होत्या. यावेळी मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार (महावितरण) व श्री. अनिल कोलप (महापारेषण) यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुणे परिमंडलातील विविध योजना व वीजयंत्रणेच्या आराखड्यांचे सादरीकरण करण्यात आले. संचालक सौ. केळकर यांनी विविध मुद्द्यांवर उपस्थित सर्व मंडल व विभाग कार्यालयप्रमुखांशी थेट संवाद साधला व दर्जेदार ग्राहकसेवेसाठी व्यवस्थापनाकडून असलेल्या अपेक्षा त्यांनी जाणून घेतल्या.

या बैठकीत महावितरणचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी सांगितले की, पुणे परिमंडलामध्ये सन २०५० पर्यंतच्या वीजपुरवठ्यासाठी दर्जेदार व सक्षम वीजयंत्रणा उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये ४ हजार ८३ कोटींच्या पायाभूत आराखड्यातील वीज यंत्रणेचे कामे प्रस्तावित आहेत. सोबतच विजेचे पारेषण करण्यासाठी २१ अतिउच्चदाब उपकेंद्रांची प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्यापैकी ७ उपकेंद्रांना मंजुरी मिळाली आहे. हे उपकेंद्र उभारण्याचे काम महापारेषणकडून करण्यात येणार आहे. तसेच अतिभारित वीजवाहिन्यांच्या विभाजनाचा १३६ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर झाला असून कामांनाही सुरवात झाली आहे. यासोबतच चाकण, तळेगाव, हिंजवडी, भोसरीसह इतर विविध औद्योगिक वसाहतींमध्ये नवीन वीजयंत्रणा उभारण्याचे काम सुरु आहे, अशी माहिती मुख्य अभियंता श्री. पवार यांनी दिली.

महापारेषणचे मुख्य अभियंता श्री. अनिल कोलप यांनी सांगितले की, विजेची पारेषण यंत्रणा आणखी सक्षम करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. विजेची मागणी वाढल्यानंतर अतिभारित अतिउच्चदाबाच्या काही पारेषण वाहिन्या बंद पडण्याचे प्रकार घडतात. ते यापुढे होणार नाही अशी पारेषण क्षमता ६०० मेगावॅटवरून १२०० मेगावॅटपर्यंत करण्याची उपाययोजना पूर्णत्वास आहे. तसेच पर्यायी वीजपुरवठ्यासाठी नवीन अतिउच्चदाबाच्या वाहिन्यांसह इंटरकनेक्टिंग ट्रान्सफॉर्मर (आयसीटी)ची क्षमता दुप्पट करण्यात येत आहे. पारेषण यंत्रणेच्या सक्षमीकरणाच्या कामांमुळे सुमारे ८ ते १० वर्षांपर्यंत मागणीनुसार विजेचे पारेषण करण्यात कोणताही अडचण येणार नाही असे श्री. कोलप यांनी सांगितले. तसेच चाकण येथे नवीन ७६५ केव्ही अतिउच्चदाबाचे उपकेंद्र उभारण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती त्यांनी दिली.

या बैठकीला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, अँग्रीकल्चर मुंबईचे संचालक श्री. रमेश आरवाडे, महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) सौ. माधुरी राऊत, अधीक्षक अभियंता सर्वश्री अरविंद बुलबुले, युवराज जरग, सिंहाजीराव गायकवाड, अमित कुलकर्णी, विठ्ठल भुजबळ, संजीव नेहेते, अनिल घोगरे आदींसह सर्व विभाग कार्यालयप्रमुख कार्यकारी अभियंते व अधिकारी उपस्थित होते.

‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागत

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे उत्सवाचे १३२ वे वर्षे

पुणे : श्री मोरया गोसावी यांनी भाद्रपद महिन्यातील मोरगावला सुरु केलली पालखी परंपरा परतीच्या वेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती उत्सव मंडपात दरवर्षी येते. यावर्षी देखील तब्बल १० दिवसांचा पायी पालखी सोहळा करुन उत्सव मंडपात आलेल्या पालखीचे स्वागत व आरती श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या विश्वस्त व पदाधिका-यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच चिंचवड देवस्थानच्या विश्वस्तांनी श्री दगडूशेठ गणपतीची देखील आरती केली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळा तर्फे उत्सवाच्या १३२ व्या वर्षी चिंचवड देवस्थान ट्रस्ट तर्फे आलेल्या पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, माजी विश्वस्त व श्री मोरया गोसावी यांचे वंशज विश्राम देव, दगडूशेठ गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, मंगेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

श्री मोरया गोसावी विनायकी चतुर्थी ला मोरगावला जात असत. एकदा विनायकी चतुर्थीला गेले असताना मयुरेश्वराने त्यांना दृष्टांत दिला की आता तू वृद्ध झाला आहेस, तुझे कष्ट पाहवत नाहीत. त्यामुळे मीच तुझ्या घरी येईन. त्या दृष्टांताप्रमाणे चिंचवडमधील गणेश कुंडामध्ये क-हा नदीच्या तीरी मयूरेश्वराची मूर्ती सापडेल, असे सांगितले. त्याप्रमाणे प्रति मयुरेश्वर रुपाची मूर्ती सापडली. श्री मोरया गोसावी यांनी ती मूर्ती चिंचवडमधील मंगलमूर्ती वाडयात स्थापन केली.

तेव्हापासून दर माघ व भाद्रपद महिन्यात श्री मंगलमूर्ती (प्रति मयुरेश्वर) पालखीतून मोरगावला श्री मयुरेश्वराच्या भेटीला जाते. ही पालखी चिंचवड ते मोरगाव अशी माघ महिन्यात रथातून आणि भाद्रपद महिन्यात युवा कार्यकर्ते खांद्यावर पालखी घेऊन जातात. या दोन्ही वेळेला मोरगावला दिवाळीसारखे वातावरण असते. दर तृतीयेला पालखी मोरगावला पोहोचते. तेथे चतुर्थीला पूजा, आवर्तने, छबिना, पंचमीला अन्नदान असे कार्यक्रम झाल्यावर षष्टीला पालखी परतीच्या प्रवासाला निघते.

त्यानंतर पुण्यात श्री दगडूशेठ गणपती मांडवात आल्यावर दगडूशेठ गणपती ट्रस्टचे विश्वस्त व व्यवस्थापनामार्फत पालखीचे स्वागत व आरती केली जाते. तर चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव हे श्री दगडूशेठ गणपतीची आरती करतात. हा सोहळा अनुभविण्यासारखा असतो. मोरगावला जाताना श्री कसबा गणपतीला देखील पालखीचे स्वागत होते आणि परतीच्या प्रवासात शेवटी दगडूशेठ गणपतीला पालखी येते.

गंगा नेबुला सोसायटीच्या वतीने गणेशोत्सव उत्साहात साजरा

पुणे-विमान नगर येथील गंगा नेब्युला सोसायटीमध्ये गणेशोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात सुरू झाला असून हा वार्षिक उत्सव रहिवाशांना अनोख्या आणि प्रेमळ पद्धतीने एकत्र आणून त्यांच्या हृदयात विशेष स्थान आहे. दरवर्षी हा उत्सव अत्यंत उत्साहात रहिवाशांमध्ये प्रचलित असलेल्या उत्सवाच्या मूडसह आणि गणेशोत्सव उत्सवादरम्यान सामुदायिक बंधनाच्या जबरदस्त भावनेसह होतो.

या उत्सवाची सुरुवात एका भव्य मिरवणुकीने झाली जिथे सुंदर रचलेल्या गणेशाची मूर्ती सोसायटीच्या रस्त्यावरून आनंदी रहिवासी आणि पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. रहिवासी विविध सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांमध्ये भाग घेतात आणि सभासदांनी प्रार्थना करून आणि भगवान गणेशाचा आशीर्वाद घेत दररोज आरत्या केल्या जातात.

सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य सादरीकरण आणि इतर स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि संपूर्ण रहिवासी, विशेषतः लहान मुले मोठ्या उत्साहाने या उपक्रमांमध्ये सहभागी होतात. शिवाजी महाराजांनी अफझलखानाच्या वधाचा ऐतिहासिक क्षण दाखवणारे सोसायटीतील मुलांनी सादर केलेले स्किट मन मंत्रमुग्ध करणारे होते.

याव्यतिरिक्त, सोसायटी पर्यावरणास अनुकूल उत्सवांना प्रोत्साहन देते, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी शाश्वत पद्धतींचा प्रचार करते.

गणेशोत्सव उत्सव केवळ तेथील रहिवाशांमधील बंध दृढ करत नाही तर समाजाने एकत्र येण्यासाठी त्यांची श्रद्धा, संस्कृती आणि चांगल्या समाजासाठी बांधिलकी जपण्याचे एक सुंदर उदाहरण देखील आहे.

स्मृती इराणी म्हणाल्या, “जामीन मिळणे ही आनंदाची गोष्ट नाही; ते निर्दोष सुटले नाही.

“माझा असाही विश्वास आहे की न्यायालयात ज्या तथ्यांच्या आधारे एजन्सीने त्याच्याविरुद्ध खटला दाखल केला आहे, ती धक्कादायक आहे.”

नवी दिल्ली, 13 सप्टेंबर 2024: “दिल्लीच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच एखादा विद्यमान मुख्यमंत्री तुरुंगात गेला आहे आणि त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. मात्र, त्यांच्यावरील आरोप वगळण्यात आलेले नाहीत. ही बाब नाही. उत्सव,” अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्याबद्दल भाजप सदस्या स्मृती इराणी यांनी व्यक्त केले त्या एबीपी न्यूजच्या शिखर संमेलनात बोलत होत्या.

“माझा असाही विश्वास आहे की ज्याच्या आधारे एजन्सीने त्याच्याविरुद्ध खटला दाखल केला आहे त्या न्यायालयात समोर आलेली तथ्ये धक्कादायक आहेत. अरविंद केजरीवाल यांनी राजकारणात प्रवेश केला तेव्हा ते कार्यकर्ते म्हणून आले आणि स्वच्छ राजकारणाचे वचन दिले होते, हे विडंबनात्मक आहे,” स्मृती इराणी म्हणाल्या.

नुकत्याच झालेल्या वादाबद्दल बोलताना स्मृती इराणी म्हणाल्या , “विरोधकांकडून रोज एक नवीन सापळा तयार केला जात आहे. काल, पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताच्या सरन्यायाधीशांसह भगवान गणेशाच्या प्रार्थनेला उपस्थित होते, त्यामुळे याचा अर्थ सरन्यायाधीशांवर प्रश्नचिन्ह आहे. हे तेच लोक आहेत जे आज केजरीवाल प्रकरणातील न्यायपालिकेच्या निर्णयावर खूश आहेत.

स्मृती इराणी यांनी केजरीवाल यांच्यावर आणखी टीका करताना म्हटले आहे की, “जसे ते राजकीय शिडीवर चढले, तेव्हा ते देशाच्या तिजोरीची लूट सुरू करतील याची कल्पनाही केली नव्हती. मला वाटते की सध्या सुरू असलेला तपास आणि न्यायालयाचा अंतिम निर्णय अरविंद केजरीवाल यांच्या राजकीय योगदानाचा इतिहास लिहील.”

हरियाणा विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्याने राज्यातील राजकारण आणि राजकारण चांगलेच तापले आहे. अराजकतेपासून अर्थपूर्ण वेगळे करून, एबीपी न्यूजने शिखर संमेलन – हरियाणा आगामी राज्य विधानसभा निवडणुका २०२४ च्या आधी आयोजित केले. शिकार संमेलनात प्रमुख राजकीय व्यक्ती आणि विचारवंत नेते या प्रदेशाच्या सध्याच्या राजकीय परिदृश्यावर अंतर्दृष्टीपूर्ण वादविवादासाठी उपस्थित आहेत.

प्रशासकीय आव्हाने आणि वाढीच्या संभावनांवर लक्ष केंद्रित करून, एबीपी न्यूजचे उद्दिष्ट आहे की प्रभावशाली नेत्यांमध्ये सहयोगी समस्या सोडवण्यास प्रोत्साहन देणारे व्यासपीठ प्रदान करणे. शिखर संमेलनातील चर्चेचा उद्देश हरियाणातील नेतृत्व आणि धोरणांची भविष्यातील दिशा ठरवणे आहे. उत्तरदायित्व आणि कारभारातील पारदर्शकतेचा प्रदीर्घ पुरस्कर्ता म्हणून, ABP News ‘शिखर संमेलन’ सारख्या उपक्रमांद्वारे नागरिकांना ज्ञान आणि अंतर्दृष्टीने सक्षम बनवत आहे, या महत्त्वपूर्ण राज्य निवडणुकीपूर्वी माहितीपूर्ण निर्णयांची खात्री करून घेत आहे.

गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात काश्मीरमधील सार्वजनिक गणेशोत्सवाची सांगता

पाच दिवसांच्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप :

पुणे-काश्मीर खोऱ्यात पाच दिवसांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची भव्य विसर्जन मिरवणुकीने बुधवारी सांगता झाली. यावेळी बाप्पाला जड अंतःकरणाने भावपूर्ण निरोप देण्यात आला. विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबर इतरही अनेक उपक्रम या उत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये काश्मीरमधील स्थानिक नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला.

भारताचे नंदनवन असलेल्या काश्मीर खोऱ्यात ३४ वर्ष गणेशोत्सव साजरा केला जात नव्हता, ही बाब लक्षात घेऊन काश्मीरमध्ये पुन्हा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’चे उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांनी पुढाकार घेतला. पुण्यातील मानाच्या सात गणपती मंडळांनी एकत्र येत त्यासाठी पाऊल टाकले आणि गतवर्षी काश्मीरमधील लाल चौकात दीड दिवसांचा गणपती उत्सव साजरा झाला.

यावर्षी कुपवाडा व अनंतनाग या आणखी दोन ठिकाणी पाच दिवसांचा गणेशोत्सव साजरा झाला. बुधवारी या दोन्ही ठिकाणच्या गणरायाचे भव्य अशा मिरवणुकीने विसर्जन करण्यात आले.
त्यामधील पहिली मिरवणुक गणपतीयार मंदिर ते हबा कडल येथील झेलम नदीपर्यंत आणि दुसरी मिरवणुक वेसू केपी कॉलनी ते संगम अनंतनाग पर्यंत असा तब्बल ११ कि.मी. अंतरापर्यंत निघाली. या दोन्ही मिरवणुकीत स्थानिक संगीत वाद्य वाजविण्यात आली. त्यात स्थानिक काश्मीरी नागरिक मोठ्या भक्ती भावाने सहभागी झाले होते.

बाप्पाला गोड पोळीचा नैवद्य
काश्मीरमधील गणेशोत्सवामधील महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे बाप्पाची होणारी पन्ना पूजा. ज्यामध्ये श्रीगणेशाला गोड पोळीचा नैवद्य अर्पण केला जातो. ही पुजा म्हणजे एकता आणि सामुदायिक सौहार्दाचे प्रतीक मानले जाते.

“काश्मीरमध्ये सलग दुसऱ्या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडला. पुण्यातील सातही प्रमुख गणेश मंडळांनी त्यासाठी पुढाकार घेतला. आगामी काळात हा उत्सव आणखी भव्य स्वरूपात साजरा व्हावा यासाठी आमचे प्रयत्न राहतील. काश्मीर खोऱ्यातील सर्व गणेश मंडळाचा आणि नागरिकांचे आम्ही आभारी आहोत.”

पुनीत बालन
उत्सव प्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती.

खडकवासल्यातून सचिन दोडकेंना आव्हान बाळा धनकवडेंचे..

शरद पवारांच्या गटातून पुण्यातील ४१ जणांना हवीय आमदारकी

पुणे- महाविकास आघाडीच्या उमेदवारी वाटपात शरद पवारांच्या NCP च्या वाट्याला पुण्यातील ८ पैकी किती मतदार संघ येतील ते आताच काही स्पष्ट झालेले नसले तरी आठही मतदार संघातून पक्षाला अर्ज फी च्या नावाने फंड देत एकूण ४१ जणांनी आमदारकी मिळावी अशी इछ्या व्यक्त केली आहे. खडकवासला विधानसभा मतदार संघातून गेल्यावेळी प्रचार यंत्रणेतील थोडक्या चुकांमुळे विजयापासून दूर राहून ज्यांना पराभव चाखावा लागला ते सचिन दोडके जरी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नजीकच कायम दिसून आले त्यांनी आणि जनतेच्या कामाच्या व्यापात राहून कायम जनसंपर्कात व्यस्त राहिलेले बाळाभाऊ धनकवडे यांनी या दोहोंनी खडकवासल्यात उमेदवारी मिळविण्यात चुरस निर्माण केल्याचे दिसते आहे. या शिवाय खडकवासल्यातून सोपान उर्फ काका चव्हाण यांनीही उमेदवारीसाठी अर्ज केला आहे.या मतदार संघातून एकूण ९ उमेदवारांनी पक्षाकडे इच्छुक म्हणून अर्ज दाखल केले असले तरी निवडून येण्याची क्षमता असलेल्यांमध्ये बाळाभाऊ धनकवडे यांचे नाव अग्रभागी घेण्यात येते आहे. दोडके यांचा करिष्मा जो गेल्या निवडणुकीत दिसला तो दिसेल कि नाही याबाबत शंका व्यक्त होते आहे. आणि यावेळी आता पक्षातून अजित पवारांचे समर्थक अलिप्त झालेले आहेत.विद्यमान आमदार भाजपचे असले तरी एकूणच प्राबल्य यावेळी येथून कमी झाल्याचे चित्र आहे. शरद पवारांच्या गटाला माविआतून हा मतदार संघ सोडला जाईल असे स्पष्ट चित्र असताना येथून उमेदवार देण्यासाठीच पक्षाचे कसब दिसून येणार आहे.त्यात पक्षाने बाजी मारली तर हा मतदार संघ भाजपकडून शरद पवारांच्या गटाला लीलया मिळू शकतो असा दावा करण्यात येतो आहे. दरम्यान हडपसर विधानसभा मतदार संघातून शहर अध्यक्ष आणि माजी महापौर प्रशांत जगताप यांच्या सह ५ जणांनी उमेदवारी मागितली आहे तर वडगाव शेरी येथून ७ जणांनी आणि शिवाजी नगर मधून ८ जणांनी उमेदवारी मागितली आहे.पुणे कॅन्टोनमेंट विधानसभा मतदार संघातून ४ जणांनी आणि पर्वती विधानसभा मतदार संघातून अश्विनी कदम,नितीन कदम या दाम्पत्यासह चौघांनीच उमेदवारी मागितली आहे. तर कसबा विधानसभा मतदार संघातून रवींद्र माळवदकर हे माजी नगरसेवक एकमेव इच्छुक आहेत. त्यांचा एकमेव अर्ज येथून आला आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने १० तारखेपर्यंत इच्छुक उमेदवारांना अर्ज दाखल करण्यास सांगितले होते . दिनांक १० सप्टेंबरपर्यंत शहरातील आठही विधानसभा मतदारसंघातून तब्बल ४१ इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे अर्ज दाखल केल्याची माहिती शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली आहे. लवकरच या सर्व इच्छुक उमेदवारांचा मुलाखत कार्यक्रम जाहीर करण्यात येईल असेही प्रशांत जगताप यांनी सांगितले आहे.

हे आहेत खालील इच्छुक उमेदवार ज्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे…..

हडपसर विधानसभा –

१)श्री. प्रशांत सुदाम जगताप
वानवडी, पुणे -४०
हडपसर
२)श्री. प्रवीण सादबा तुपे
हडपसर, पुणे -२८
हडपसर
३)श्री. योगेश दत्तात्रय ससाणे
ससाणे नगर, हडपसर, पुणे -२८
हडपसर
४)श्री. सुनील उर्फ बंडू गायकवाड
मुंढवा, पुणे -३६
हडपसर
५)श्री. निलेश अशोकराव मगर
सर्व्हे नंबर १३९, मगरपट्टा, हडपसर, पुणे
हडपसर

वडगाव शेरी विधानसभा
६)श्री. रमेश दत्तात्रय आढाव
विमाननगर, पुणे – १४
वडगाव शेरी
७)श्री. सुनील बबन खांदवे
लोहगाव, पुणे – ४५
वडगाव शेरी
८)सौ. नीता गलांडे
सैनिक वाडी, वडगाव शेरी, पुणे – १४
वडगाव शेरी
९)श्री. अर्जुन ज्ञानोबा चव्हाण
खराडी, पुणे – १४
वडगाव शेरी
१०)सौ. मेघा समीर कुलकर्णी
NIBM रोड, कोंढवा, पुणे – ४८
वडगाव शेरी
११)श्री. भीमराव वामनराव गलांडे
सैनिक वाडी, वडगाव शेरी, पुणे १४
वडगाव शेरी
१२)श्री. आशिष ज्ञानदेव माने
क्रांतीनगर, वडगाव शेरी, पुणे – १४
वडगाव शेरी

शिवाजीनगर विधानसभा
१३)श्री. उदय प्रमोद महाले
दीपबंगला चौक, शिवाजीनगर, पुणे -०५
शिवाजीनगर
१४)श्री. किशोर कल्याण कांबळे
कामगार पुतळा, शिवाजीनगर, पुणे – ०५
शिवाजीनगर
१५)श्री. श्रीकांत पाटील
बोपोडी, पुणे – २०
शिवाजीनगर
१६)अॅड. निलेश निकम
गोखलेनगर, पुणे
शिवाजीनगर
१७)अॅड. सुकेश पासलकर
शिवाजीनगर, पुणे – ०५
शिवाजीनगर
१८)अॅड. औदुंबर खुणे पाटील
शिवाजीनगर, पुणे – ०४
शिवाजीनगर
१९)श्री. अरुण पंढरीनाथ शेलार
बोपोडी, पुणे – २०
शिवाजीनगर
२०)डॉ. किसन धोंडीबा गारगोटे
शिवाजीनगर, पुणे – ०५
शिवाजीनगर

खडकवासला विधानसभा –
२१)श्री. राहुल बाबासाहेब घुले
नांदेड सिटी, पुणे – ४१
खडकवासला
२२)सुरेखा रमेश दमिष्ठे
वडगाव धायरी, पुणे – ४१
खडकवासला
२३)सौ. अनिता तुकराम इंगळे
शिवणे, पुणे
खडकवासला
२४)श्री. सोपान उर्फ काका चव्हाण
इंद्रप्रस्थनगर, धायरी, पुणे – ४१
खडकवासला
२५)श्री. कुलदीप गुलाब चरवड
वडगाव बुद्रुक, पुणे – ५२
खडकवासला
२६)श्री. किशोर उर्फ बाळाभाऊ धनकवडे
धनकवडी, पुणे – ४३
खडकवासला
२७)श्री. सचिन दोडके
दोडके बिल्डिंग, वारजे, पुणे ५
खडकवासला
२८)श्री. नवनाथ पारगे
खडकवासला, पुणे
खडकवासला
२९)श्री. खुशल करंजावणे
किरकटवाडी, खडकवासला, पुणे
खडकवासला

पुणे कॅन्टोनमेंट विधानसभा
३०)श्री. किशोर कुमार सरदेसाई
रामबाग कॉलनी, कोथरूड, पुणे-३८
पुणे कॅन्टोनमेंट
३१)श्री. नितीन सुरेश रोकडे
ताडीवाला रोड, पुणे – ०१
पुणे कॅन्टोनमेंट
३२)श्री. कणव वसंतराव चव्हाण
भवानी पेठ, पुणे -४२
पुणे कॅन्टोनमेंट
३३)श्री. नरेश पगडाल्लू
भवानी पेठ, पुणे -४२
पुणे कॅन्टोनमेंट

पर्वती विधानसभा
३४)श्री. सचिन तावरे
पर्वती गाव, पुणे – ०९
पर्वती
३५)श्री. फारुख बाशीर शेख
लक्ष्मीनगर, पर्वती, पुणे -०९
पर्वती
३६)श्री. नितीन मधुकर कदम
अरण्येश्वर दर्शन सोसायटी, पर्वती, पुणे -०९
पर्वती
३७)सौ. अश्विनी नितीन कदम
अरण्येश्वर दर्शन सोसायटी, पर्वती, पुणे -०९
पर्वती

कोथरूड विधानसभा
३८)श्री. किशोर हनमंत कांबळे
कर्वे नगर, पुणे – ५२
कोथरूड
३९)श्री. संदीप बालवडकर
बाणेर, पुणे
कोथरूड
४०)श्री. स्वप्नील देवराम दुधाने
कर्वे नगर, पुणे – ५
कोथरूड

कसबा विधानसभा
४१)श्री. रविंद्र माळवदकर
नाना पेठ, पुणे – ०२
कसवा

सौर कृषिपंपांतून शेतकऱ्यांना वीज विक्रीचे उत्पन्न मिळवून देणार

0

 मुंबई दि. १३ सप्टेंबर २०२४ – कृषिपंपाच्या वीज कनेक्शनसाठी शेतकऱ्यांनी अनेक वर्षे वाट पाहण्यापासून ते मागणीनुसार तत्काळ कृषिपंप अशी राज्याची वाटचाल ‘मागेल त्याला सौर कृषिपंप योजने’मुळे झाली आहे. आगामी काळात सौर कृषिपंपाच्या यंत्रणेतून निर्माण झालेली अतिरिक्त वीज विकून शेतकऱ्याला उत्पन्न मिळण्यासाठी योजना लागू करण्यात येईल, असे प्रतिपादन मा. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले.

मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेत लाभार्थी शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी महावितरणने तयार केलेल्या वेबसाईटचे उद्घाटन मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत झाले, त्यावेळी ते बोलत होते. योजनेची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे व पोस्टरचे प्रकाशनही त्यांनी केले.

यावेळी अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन, महापारेषणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार, मा.उपमुख्यमंत्र्याचे सचिव श्रीकर परदेशी आणि एमएसईबी होल्डिंग कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सौर कृषिपंपाच्या पॅनेल्समधून निर्माण होणारी अतिरिक्त वीज ग्रीडमध्ये पाठवून वीज कंपन्यांना विकता येईल व त्यातून शेतकऱ्याला अतिरिक्त उत्पन्न मिळविता येईल, अशी योजना लागू करण्यात येईल. त्यामुळे शेतकरी हा वीजबिल भरणाऱ्याऐवजी वीज विकून उत्पन्न मिळविणारा होईल.

ते म्हणाले की, राज्यात २०१४ पूर्वी शेतकऱ्यांना पेड पेंडिंगची समस्या तीव्रतेने जाणवत होती. त्यानंतर आपल्या सरकारमध्ये शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देण्यावर भर देण्यात आला. आता मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमुळे शेतकऱ्यांना ९० टक्के सबसिडीसह तत्काळ पंप मिळत आहेत. सौर कृषी पंपामुळे शेतकऱ्यांना दिवसा भरवशाचा वीज पुरवठा होत आहे. सौर पॅनेल्समधून २५ वर्षे वीज निर्मिती होत असल्याने तेवढा काळ वीजबिल येणार नाही. साडेसात एचपी पंपाचा विचार केला तर २५ वर्षांच्या कालावधीत त्या शेतकऱ्याचे वीजबिलाचे दहा लाख रुपये वाचणार आहेत. ही योजना मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुसुम बी योजनेच्या आधारे लागू केली असून आपण मा. पंतप्रधानांचे आभार मानतो.

त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत राज्यात १२ हजार मेगावॅट वीजनिर्मितीचे करार झाले आहेत. आगामी दोन वर्षात त्यातून पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती सुरू होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी शंभर टक्के सौर ऊर्जा मिळेल. शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक हरित ऊर्जा मिळण्यासोबत अनुदान आणि क्रॉस सबसिडीचे पैसे वाचतील. गेल्या अडीच वर्षातील कार्यकाळ हा राज्यातील ऊर्जा क्षेत्रासाठी टर्निंग पॉईंट ठरला आहे. या काळात तीनही वीज कंपन्यांनी मोलाची कामगिरी केली आहे, असे ते म्हणाले.

उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी काही लाभार्थी शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. लाभार्थी शेतकरी या योजनेबद्दल समाधानी असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, मा. उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षात शेतकऱ्यांसाठी नवीकरणीय ऊर्जेचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येत आहे. एके काळी राज्यात साडे आठ लाख शेतकरी वीज कनेक्शनच्या प्रतीक्षेत होते पण आता पेड पेंडिंगची संख्या नगण्य झाली आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमुळे पेड पेंडिंगची समस्या इतिहास बनेल. या योजनेत आगामी तीन वर्षात राज्यात दहा लाख सौर कृषी पंप बसविण्यात येणार आहेत. योजना सुरू झाल्यानंतर अल्पावधीत दोन लाख शेतकऱ्यांची निवड झाली असून त्यापैकी ४५ हजार शेतकऱ्यांच्या शेतात मागील सहा महिन्यात सौर कृषिपंप बसविले आहेत, हा एक विक्रम आहे.महावितरणचे संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांनी आभार प्रदर्शन केले.

गणेश विसर्जन मिरवणूक निमित्त सोमवारी, मंगळवारी पिंपरी कॅम्प सायंकाळी बंद

पिंपरी, पुणे (१३ सप्टेंबर २०२४) सालाबाद प्रमाणे गणपती विसर्जन मिवणुकीसाठी पिंपरी चिंचवड व्यापारी वर्ग देखील सज्ज झालेला आहे. या गणेश उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पिंपरी कॅम्प, मार्केट येथील पिंपरी मर्चंट फेडरेशनचे सर्व व्यापारी सभासद या उत्सवात सहभागी होणार आहेत.
गणपती विसर्जन मिरवणूक निमित्त सोमवारी, मंगळवारी संध्याकाळी मोठी भाविकांची गर्दी होइल. वाहतुकीस अडथळा होऊ नये व सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि व्यापाऱ्यांना देखील या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी सोमवारी आणि मंगळवारी (दि. १६ व १७) सायंकाळी सहा नंतर व्यापारी उस्फूर्तपणे दुकाने बंद ठेवणार आहेत अशी माहिती पिंपरी मर्चंट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवानी यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

समाजभान ठेवून उत्सव साजरे करा – पार्थ पवार

पिंपरी मध्ये वैभवनगर येथे गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम हौद

पिंपरी (दि. १३ सप्टेंबर २०२४) सण, उत्सव हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. यातील गणेश उत्सव महाराष्ट्र बरोबरच जागतिक स्तरावर भक्ती भावाने साजरा केला जातो. असे उत्सव साजरे करीत असताना मांगल्य व पावित्र्य जपत पर्यावरणाचे रक्षण करीत समाजभान ठेवावे असे आवाहन युवा नेते पार्थ पवार यांनी केले.
पिंपरी गावातील वैभवनगर येथे विजय आसवानी यांच्या संकल्पनेतून आसवानी असोसिएटस्‌ आणि ॲस्पीफ्लाय इनव्हायरमेंट या संस्थेच्या वतीने गतवर्षी प्रमाणे खासगी जागेत गणेश मूर्ती विसर्जनासाठी लहान, मोठ्या आकाराचे दोन हौद करण्यात आले आहेत. त्यांचे उद्घाटन पार्थ पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उद्योजक राजूशेठ आसवानी, माजी नगरसेवक हिरानंद उर्फ डब्बू आसवानी, उद्योजक राजू आसवानी, श्रीचंद आसवानी, सतीश आसवानी, अनिल आसवानी, विजय आसवानी, अमर कुकरेजा, हितेश बटवा, हिरो मदयानी, सुनील चूगवानी, हरेश सेवानी, अविनाश इसरानी, फजल शेख आदी उपस्थित होते.
सण, उत्सव साजरे करीत असताना पर्यावरणाचे रक्षण व्हावे व गणेशोत्सव काळात नदी नाल्यांचे प्रदूषण होऊ नये. यासाठी यावर्षी देखील पिंपरी, वैभव नगर येथे कृत्रिम हौद उभारण्यात आले आहेत. येथे गणेश मूर्ती विसर्जित कराव्यात. विसर्जनाच्या वेळी श्रींच्या आरतीसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. महापालिकेच्या वतीने पाणी व निर्माल्यकुंड दिले आहे. संयोजकांच्या वतीने विद्युत व्यवस्था व स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच खासगी अनुभवी जीवरक्षक नेमण्यात आले आहेत. जीवरक्षक विधीवत पध्दतीने या हौदांमध्ये मृर्ती विसर्जन करतात असे संयोजक विजय आसवानी यांनी सांगितले. स्वागत श्रीचंद आसवानी, तर आभार विजय आसवानी यांनी मानले.

राजकारणात येऊन पॉलिसी लेवलवर बदल घडविता येतात-विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोर्‍हे

एमआयटी डब्ल्यूपीयूत मिटसॉगच्या २० व्या बॅचचा शुभारंभ

पुणे, दिः १३ सप्टेंबर: “राजकारणात येतांना सरकार आणि प्रशासन समजावून घ्यावे , न्याय संस्थाचे ज्ञान असावे, शिक्षण व्यवस्था, सांस्कृतिक बदल, जनतेपासून ज्ञान मिळवावे, ऐकण्याची सवय ठेवावी आणि लेजिलेटीव्ह टुल्स सारखेे गुण अंगीकारावे. तसेच समाजाचे कल्याण साधण्यासाठी राजकारणात येऊन पॉलिसी लेवलवर बदल घडविता येतात.” असे उदगार महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोर्‍हे यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हिर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्यावतीने आयोजित ‘मास्टर्स इन पॉलिटिकल लिडरशीप अँड गव्हर्नमेंट’(एमपीजी) २० व्या बॅच च्या शुभारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या.
यावेळी पंजाब विधानसभेचे सभापती कुलतार सिंह संधवान व राजस्थान विधानसभेचे माजी सभापती डॉ. सी.पी.जोशी विशेष सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड होते.
तसेच एमआयटी स्कूल ऑफ गर्व्हमेंटचे संस्थापक व डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल कराड, कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, मिटसॉगचे संचालक डॉ. के. गिरीसन, प्रा. डॉ. परिमल माया सुधाकर व श्रीधर पब्बीशेट्टी हे उपस्थित होते.
यावेळी नॅशनल लॅजिलेटिव्ह कॉन्फरन्सच्या कॉपी टेबल बुकचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ. निलम गोर्‍हे म्हणाल्या,” राजकारणात उतरल्यावर संसदीय कामकाज, वैयक्तिक, सामाजिक, आर्थिक आणि जीवनासंदर्भातील अधिकार व आत्मविश्वास मिळतोहा धागा सर्वांना जोडणार आहे. मानवधिकार संदर्भातील माहिती घ्यावी. देशात आज ही जाती आणि वर्ण भेद आहे त्यातून बाहेर निघण्यासाठी युवकांनी कार्य करावे. बदलत्या राजकारणामुळे खाजगी आणि सार्वजनीक जीवन राहिलेले नाही याचे भान ठेवावे.”
कुलतार सिंह संधवान म्हणाले,”‘सेवा परमोधर्म’ हे सूत्र लक्षात ठेऊन राजकारणाच्या मैदानात उतरावे. जनतेच्या सेवेतूनच सामाजिक समस्या सोडविता येतात. जेव्हा समाजातील प्रत्येक व्यक्तीचा विकास होईल तेव्हाच भारत विश्वगुरू बनेल. समाजावर राजकारणाचा सर्वात जास्त प्रभाव पडतो. या क्षेत्रात येतांना मानव सेवा निःस्वार्थ भावनेने करावी. विचार आणि तलवाराने इतिहास लिहिला जातो. या देशात विविध धर्मांचे लोक असल्याने धर्म विरोधक गोष्टींना कधीही वाव देऊ नका. देशातील संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये कायदे पास होतात त्यावर चर्चा विमर्श होत नाही. त्यामुळे असे आमदार आणि खासदार निर्माण व्हावे जे यावर बोलतील.”
डॉ.सी.पी जोशी म्हणाल्या ” देशात औद्योगिक क्रांती नंतर सूचना क्रांती ही सर्वात मोठी होती. येथील उच्च शिक्षण जरी गुणवत्तापूर्ण असले तरी प्राथमिक शिक्षण व्यवस्थेत मोठी सुधारणेची अपेक्षा आहे. विषम समाजाला एकत्रित आणण्यासाठी राजकारणी मंडळींचे काम आहे. त्याच नुसार प्रत्येक युवकांमधील स्कीलचा वापर मोठ्या प्रमाणात करावा. स्वातंत्र्यपूर्व काळात या देशाचे ज्यांनी नेतृत्व केले ते सर्व बाहेर देशातून उच्च शिक्षण घेऊन आले होते. त्यामुळे आता राजकारण क्षेत्रात योग्य प्रशिक्षणाची गरज आहे. देशात शिक्षित युवा वोटर असल्यास शिक्षक राजकारण येतील.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” भारतीय संस्कृती, तत्वज्ञान आणि परंपरेचे पालन करून मानव सेवेला महत्व दयावे. वसुधैव कुटुम्ब कमची संकल्पना राबविण्यासाठी हिंदू राष्ट्राची नाही तर हिंदवी स्वराज्याची स्थापना करणे गरजेचे आहे. देशाच्या पहिल्या पंतप्रधान पदाची शपथ घेतांना पं. नेहरू यांनी सांगितले होते की मे देशाचा सेवक आहे. अशी भावना ठेऊन प्रत्येकाने कार्य करावे.”
राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,”राजकारणात सुशिक्षित व चांगल्या लोकांनी येणे गरजेचे आहे. देशाची वाढती लोकसंख्या संदर्भात कोणतीही पार्टी विचार करीत नाही. अशा वेळेस राजकारणी मंडळांनी प्रशिक्षण घेतले तर देशाची ब्यूरोक्रॉसी व स्थिती सुधरण्यास वेळ लागणार नाही. त्याच प्रमाणे देशातील कोणत्याही निवडणुकीच्या १ वर्षापूर्वी कोणतीही योजना घोषित करू नये. त्याच प्रमाणे हा पाठ्यक्रम देशातील सर्व विधानसभा व विधान परिषदेत सुरू करण्याची गरज आहे.”
यावेळी डॉ. आर.एम.चिटणीस यांनी विचार मांडले
डॉ. परिमल माया सुधाकर यांनी मिटसॉगच्या स्थापनेची पार्श्वभूमी सांगितली.
यावेळी विद्यार्थी संस्कृती ढोलमा आणि ध्रुव सावजी यांनी विचार मांडले
प्रा.डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.

बारमध्ये गोळीबार:अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकाला अटक

पुणे-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे माजी नगरसेवक विनोद जयवंत नढे व सचिन दत्तु नढे (रा. काळेवाडी,पुणे) यांनी काळेवाडी परिसरात राहुल बार अ‍ॅण्ड खुशबु हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर हॉटेलमध्ये बसलेले असता स्वत:जवळील रिवॉलव्हरने हवेत व लाकडी टेबलवर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपींना वाकड पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत हॉटेलचे मॅनेजर तुषार लक्ष्मीचंद भोजवाणी (वय-२४,रा.काळेवाडी,पुणे) यांनी आरोपी विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम १२५, ३५२,३५१ (२) (३), भारतीय हत्यार कायदा कलम ३० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ सप्टेंबर रोजी रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास राहुल बारमध्ये आरोपी सचिन नढे व विनोद नढे हे दोघे आले होते. त्यावेळी त्यांनी दहशत माजविण्यासाठी त्यांच्याकडील लोखंडी रिव्हॉलवरने हवेत, लाकडी टेबलवर गोळीबार केला. हॉटेलमधील इतर व्यक्तींच्या जिवीतास व व्यक्तीगत सुरक्षितता धोक्यात आणण्याची कृती त्यांनी केल्याने त्यांच्यावर याप्रकरणी आर्म्स अ‍ॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सचिन नढे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीचे सहा गंभीर गुन्हे पिंपरी, सांगवी, वाकड पोलिस ठाण्यात दाखल आहेत. याबाबत पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर करत आहेत.

तुळशीबाग गणपतीच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा खासदार मेधा कुलकर्णींच्या हस्ते सन्मान

मानाचा चौथा श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव ट्रस्ट : उत्सवाचे १२४ वे वर्ष

पुणे : मानाचा चौथा श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव ट्रस्टच्या वतीने ‘तुळशीबाग स्त्रीशक्ती सन्मान’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समाजातील विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान महिलांचा सन्मान यावेळी करण्यात आला.

गणेशोत्सवात ‘एक दिवस महिलांचा’ या उपक्रमांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार मेधा कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्त्या नीलिमा शितोळे, मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, उपाध्यक्ष विनायक कदम, कोषाध्यक्ष नितीन पंडित, डॉ. शैलेश गुजर, महिला विश्वस्त अभिनेत्री वाळके उपस्थित होते.

तुळशीबाग उत्सव मंडपात कार्यक्रम झाला. यावेळी खासदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते महिलांना सन्मानित करण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार, लीना मेहंदळे, अपर्णा आपटे, प्राची महाडकर अगरवाल, मंजुश्री खर्डेकर, रिंकल गायकवाड यांचा सन्मान कार्यक्रमात झाला. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, तुळशीबाग गणपतीची प्रतिमा असे सन्मानाचे स्वरूप होते.

मेधा कुलकर्णी म्हणाल्या, आपापल्या क्षेत्रात काम कशा पद्धतीने करायचे हे महिला त्यांच्या कर्तृत्वाने दाखवून देतात. राजकीय, शासकीय, सामाजिक अश्या सर्व क्षेत्रात महिला आपली मेहनत आणि वचनबद्धतेने आपला ठसा उमटवितात. मानाच्या चौथ्या श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती मंडळात आजही सामाजिक बांधिलकी जपत लोकांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्यामुळे उत्सवाचा हेतू टिकला आहे. खऱ्या अर्थाने समाजाभिमुख असे हे मंडळ आहे.

नीलिमा शितोळे म्हणाल्या, पुण्याच्या गणेशोत्सवाचे तुळशीबाग गणपती हे मध्य आहे. संस्कृती जपण्याचा प्रयत्न महिला करतात आणि आपला समृद्ध वारसा पुढे नेतात. त्यामुळे त्यांचा सन्मान होतोय हे कौतुकास्पद आहे.

नितीन पंडित म्हणाले, तुळशीबाग आणि महिला यांचे अतूट नाते आहे त्या अनुषंगाने गणेशोत्सवात ‘एक दिवस महिलांचा’ उपक्रम मंडळातर्फे केला जातो. या दिवशी उत्सवाचे संपूर्ण व्यवस्थापन महिला सदस्या करतात. या स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुनंदा इप्ते यांनी आभार मानले.